(Source: ECI/ABP News/ABP Majha)
विधानसभा निवडणुकीआधी भाजप प्रवेशासाठी मंत्रिपदासह 100 कोटींची ऑफर, राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंद यांचा गौप्यस्फोट
भाजपमध्ये प्रवेश केल्यास तुम्हाला मंत्रीपद देतो. तसेच पोटनिवडणुकीत 100 कोटी खर्च करण्याची ऑफरही भाजपने दिली असल्याचं शशिकांत शिंदे यांनी सांगितलं
सातारा : विधानसभा निवडणुकीआधी अनेक नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश केला होता. यामध्ये अनेक बड्या नेत्यांची नावं आहे. तर काहींना मोठ्या ऑफर असल्याचे दावे अनेकांनी केले. राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी असाच दावा केला आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्या मंत्रिपदासह 100 कोटी खर्च करण्याचं आश्वासनही भाजपच्या नेत्यांनी दिलं होतं, असा गौप्यस्फोट शशिकांत शिंद यांनी केला आहे.
भाजप आणि शिवसेना सरकारच्या काळात भाजपने अनेक नेत्यांना पक्ष प्रवेशाच्या ऑफर दिल्या होत्या. तात्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी अनेक माध्यमातून माझ्याशी संपर्क केला होता. सरकारमध्ये मंत्रिपदाच्या जागा शिल्लक आहेत. तुम्ही भाजपमध्ये प्रवेश केल्यास तुम्हाला मंत्रीपद देतो. तसेच राजीनामा दिल्यास पोटनिवडणूक लागल्यास 100 कोटी खर्च करण्याची ऑफरही भाजपने दिली होती, असं शशिकांत शिंदे यांनी सांगितलं.
एकदा ऑफर नाकारल्यानंतर पुन्हा भाजपच्या नेत्यांना माझ्याशी संपर्क साधला होता. मात्र मी पवार साहेबांश एकनिष्ठ आहे. आज जो काही मला मानसन्मान मिळत आहे तो पवार साहेबांमुळे आणि राष्ट्रवादीमुळे मिळात आहे. त्यामुळे राष्ट्रवादी सोडून जाण्याची ऑफर त्यावेळेस मी नाकारली होती आणि यापुढेही नाकारणार असल्याचं शशिकांत शिंदे म्हणाले.
शशिकांत शिंदे यांचं वक्तव्य निराधार आणि बिनबुडाचं- प्रविण दरेकर
शशिकांत शिंदे यांचं वक्तव्य निराधार आणि बिनबुडाचं आहे. महाविकास आघाडी सरकारचं अपयश लपवण्यासाठी आणि जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी अशा प्रकारचे वक्तव्य केले जात आहेत, असं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी म्हटलं आहे.