महात्मा गांधींचं नाव घ्यायचा राहुल गांधींना अधिकार नाही, सत्तेसाठी शिवसेनेने जनतेचा विश्वासघात केला : राम नाईक
राहुल गांधी यांचं फक्त आडनाव गांधी आहे, त्यांचा आणि महात्मा गांधींचा काहीही संबंध नाही. राहुल गांधींनी माहिती न घेता सावरकरांबद्दल वक्तव्य करणे चुकीचे असल्याचं राम नाईक यांनी म्हटलं.
मुंबई : राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल आणि भाजप नेते राम नाईक यांनी टीका केली आहे. महात्मा गांधींचं नाव घ्यायचा राहुल गांधींना अधिकार नाही. सावरकरांच्या मुद्यावरुन राम नाईकांनी राहुल गांधी यांच्यासोबत शिवसेनेच्या भूमिकेवरही टीका केली. सोनिया गांधींकडून सावरकर द्वेषाचा डीएनए राहुल गांधींमध्ये आला आहे. इतिहासाची माहिती न घेता त्यांनी असं वक्तव्य करणे दृष्टपणाचे असल्याचं राम नाईक यांनी म्हटलं.
राहुल गांधी यांचं आडनाव गांधी आहे. त्यांचा आणि महात्मा गांधींचा काहीही संबंध नाही. महात्मा गांधी यांचे नातू गोपालकृष्ण गांधींनी एक लेख प्रसिद्ध केला होता. त्यामध्ये 1920 साली 'यंग इंडिया' साप्ताहिकात स्वतः महात्मा गांधी यांनी सावरकरांबद्दल गौरवोद्गार काढले होते. सावरकरांनी कोणताही हिंसाचार केला नाही. कोणीही सावरकर यांच्या सन्मानाबद्दल, सच्चेपणाबद्दल प्रश्न उपस्थित करु शकत नाही, असं महात्मा गांधी यांनी त्यांच्या लेखात म्हटलं होतं. इंदिरा गांधी यांनी सुद्धा 1980 साली एक पत्र लिहून सावरकर जन्मशताब्दीनिमित्त यांच्या कार्याबद्दल गौरव केला होता. राजकीय मतभेद असू शकतात, मात्र एखाद्या व्यक्तीच्या कार्याबद्दल अशी शंका घेणं चुकीचा असल्याचं राम नाईक म्हणाले.
सोनिया गांधींना सावरकरांबद्दल द्वेष असल्याचं दाखवणारे दोन प्रसंग
सोनिया गांधी यांना सावरकरांबद्दल द्वेष असल्याचं दाखवणारे दोन प्रसंग राम नाईक यांनी सांगितले. मी पेट्रोलियम मंत्री असताना 2003 साली सावरकर यांचं तैलचित्र संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये लावण्यात यावं, असा प्रस्ताव मी सगळ्यांसमोर मांडला होता. माझ्या प्रस्तावाला त्यावेळी सगळ्यांनी पाठिंबा दर्शवला होता. मात्र सोनिया गांधी यांनी राष्ट्रपती यांना पत्र लिहून आम्ही या कार्यक्रमावर बहिष्कार टाकू, असं व्हीप काढलं होतं.
मी पेट्रोलियम मंत्री असताना अंदमान येथे स्वातंत्र्य ज्योत निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले. ज्योत ज्याठिकाणी आहे त्याच्या चारही बाजूला क्रांतिकारकांचे कोटेशन लावले होते. काँग्रेसने त्याठिकाणी सुद्धा वीर सावरकरांचे कोटेशन काढून तेथे महात्मा गांधींचे कोटेशन लावले. त्याविरुद्ध आम्ही उपोषण केलं आणि संताप व्यक्त केला होता, असं राम नाईकांनी सांगितलं.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सामनातून मणिशंकर अय्यर यांना देशद्रोही असं म्हटलं होतं. तर आताचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तेव्हा सावरकर यांच्या स्मृती पुसणाऱ्या काँग्रेसविरोधात आंदोलन छेडणार, अशी भूमिका घेतली होती. मात्र सत्तेच्या लोभापाई आता आपण कुठे आलो आहोत, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.
सत्तेच्या लोभापाई शिवसेनेने जनतेचा विश्वासघात केला
शिवसेनेने सध्या सावरकरांच्या मुद्यावर जी भूमिका मांडली, त्याला भूमिका म्हणता येणार नाही. सत्तेसाठी चिटकून राहण्यासाठी काहीतरी बोलायचं या गोष्टीचा शिवसेनेने विचार करावा. सत्तेच्या हव्यासापोटी महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वासघात शिवसेनेने केला आहे. राहुल गांधींनी सावरकरांबद्दल जे वक्तव्य केलं, त्यावर निषेध अशा शब्दात करणे ही शिवसेनेची सवय नाही. बाळासाहेब अशा वेळी जोड्याने मारलं पाहिजे, अशी भाषा करायचे, याची आठवण राम नाईक यांनी करुन दिली. स्वातंत्र्यवीर सावराकरांचा अपमान फक्त भाजपचा प्रश्न नाही, हा समाजाचा अपमान आहे. शिवसेनेनी आतपार्यंत जी भूमिका ठेवली त्याच भूमिकेने या मुद्यावर पुढे आलं पाहिजे, असं राम नाईकांनी म्हटलं.