(Source: ECI/ABP News/ABP Majha)
... तर सुषमा अंधारेंना मुख्यमंत्री करण्यासाठी उद्धव ठाकरे सर्वस्व पणाला लावतील, माजी मंत्र्यांची टोलेबाजी...
राज्यात महिला मुख्यमंत्री होण्याची वेळ आल्यास सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांना मुख्यमंत्री करण्यासाठी उद्धव ठाकरे सर्वस्व पणाला लावतील , असं भाजप नेते लक्ष्मण ढोबळे (Laxman Dhoble) यांनी म्हटलं.
Pandharpur News Updates: राज्यात जर कधी मुख्यमंत्री पदासाठी (Maharashtra CM) महिला आरक्षण करायची वेळ आल्यास चळवळीत काम केलेल्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) या पहिल्या क्रमांकाची दावेदार असतील आणि आघाडीमधून उद्धव ठाकरे त्यांच्यासाठी पक्ष पणाला लावतील, असं वक्तव्य आहे भाजप नेते आणि माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी केलं आहे. राष्ट्रवादीमध्ये असताना माजी मंत्री आणि सध्याचे भाजप नेते लक्ष्मण ढोबळे यांची मूळ ओळख ही आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते अशीच आहे.
महिला मुख्यमंत्र्याबाबत उद्धव ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्याचा धागा पकडत ढोबळे यांनी ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. महिला मुख्यमंत्र्याबाबत वक्तव्यानंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नावाच्या चर्चेला सुरुवात झाली होती. मात्र ढोबळे यांनी थेट सुषमा अंधारे यांचे नाव पुढे केलं आहे.
ढोबळे म्हणाले की, आंबेडकरी चळवळीतून आलेल्या सुषमा अंधारे यांच्याकडून भाजपवर सातत्याने होत असलेल्या टीकेबाबत आपणास दुःख होते. आम्हीही त्या चळवळीत असताना भाजपवर टीका करायचो. मात्र जेंव्हा आम्ही भाजपात आलो त्यावेळी त्यांची तत्वे आम्हाला पटली. आपल्या देवाला चांगले म्हणायचं अन् दुसऱ्याच्या देवाला नावे ठेवायचे काय कारण असा सवाल ढोबळे यांनी अंधारे यांना विचारला.
उद्धव ठाकरेंच्या देव्हाऱ्यापर्यंत जयभीम नेले
ढोबळे म्हणाले की, उद्धवजींना जय भीम म्हणणे चालत नव्हते त्यांना त्याचे फार वावडे होते. पण या मुलीचे (सुषमा अंधारे) कौतुक यासाठी करायचे कि तिने विचाराच्या प्रभावाने उद्धव ठाकरेंना खिंडीत पकडले आहे. उद्धव ठाकरेंच्या देव्हाऱ्यापर्यंत जयभीम नेले हे आपल्या चळवळीचे यश आहे, अशी जोरदार टोलेबाजी करत ढोबळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला .
'वंचितला आता किंचित राहिलेल्या शिवसेनेशी जोड देण्याच्या कामात देखील अंधारे यांनी यश मिळवलं'
त्यांनी पुढं म्हटलं की, केवळ वंचित आणि किंचित अशी एकत्र येणारी आघाडी असल्याचे सांगताना वंचितला आता किंचित राहिलेल्या शिवसेनेशी जोड देण्याच्या कामात देखील अंधारे यांनी यश मिळविल्याचे टोला लगावला. परंतु हे करताना आपण मागे दिलेल्या शिव्याबाबत मला उपरती झाली तशी अंधारे यांना आपल्या देव देवता किंवा बाळासाहेबांच्यावर केलेल्या विधानांवर उपरती झालेली दिसत नसल्याचा टोलाही ढोबळे यांनी अंधारे यांना लगावला. यातूनच अंधारे देव धर्म आणि वारकऱ्यांना शिव्या देतात असे सांगत आता तरी अंधारे ताईंनी शिवराळपणा सोडून सर्वच महिलांनी वारकरी संप्रदायाला हात जोडावे असे काहीतरी करावे अन्यथा वारकरी संप्रदाय अंधारे ज्या पक्षात असतील त्याकडे पाहायलाही तयार होणार नाहीत असा सल्ला देखील अंधारे यांना दिला.