(Source: ECI/ABP News/ABP Majha)
एकनाथ खडसेंच्या मुलाची हत्या की आत्महत्या? गिरीश महाजनांचा सवाल; खडसे म्हणाले...
Girish Mahajan On Eknath Khadse : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या मुलाची हत्या झाली की आत्महत्या आहे? असा प्रश्न उपस्थित करत मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंना डीवचले आहे.
जळगाव : राष्ट्रवादीचे (NCP) ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे ( Eknath Khadse ) यांच्यावर टीका करताना मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan ) यांनी आज खडसेंना त्यांच्या मुलाच्या मृत्यूची आठवण करून देत जोरदार हल्लाबोल केला आहे. एकनाथ खडसे यांच्या मुलाची हत्या झाली की आत्महत्या आहे? असा प्रश्न उपस्थित करत गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंना डीवचले आहे.
एकनाथ खडसे यांनी या पूर्वी गिरीश महाजन यांच्यावर टीका करताना बरं झालं गिरीश महाजन यांना मुलगा नाही असं वक्तव्य केलं होत. यावरून आज गिरीश महाजन यांनी खडसेंना प्रत्युत्तर दिलं आहे. "मुलगा नसणं हे काही दुर्दैव नाही. मात्र मला दोन मुली आहेत हे माझं सुदैव आहे. एकनाथ खडसे यांना मुलगा होता, त्याचं काय झालं? त्याचं उत्तर खडसे यांनी द्यावं. हा विषय मला बोलायचा नाही. मात्र ते जर माझ्या मुलाबाळांवर जात असतील तर ते वाईट आहे. तुम्हाला एक मुलगा होता त्याचं काय झालं? आत्महत्या झाली की खून झाला हे तपासण्याची गरज आहे असे म्हणत मला जास्त बोलायला लावू नका असा इशारा गिरीश महाजन यांनी यावेळी एकनाथ खडसे यांना दिला आहे.
गिरीश महाजन म्हणाले, "एकनाथ खडसे आजकाल काय बोलत आहेत याचं भान त्यांना नाही. आता ते बेभान झालेले आहेत. कधी रस्त्यावर उभे राहून हातात दगड घेतात, तर कधी मला चावट म्हणतात. तशी बदनामी करा म्हणताहेत वाटेल तसं ते बोलत आहेत. त्यांची आजची परिस्थिती आहे, त्यामुळे त्यांची मानसिक स्थिती बिघडली आहे. भोसरी प्रकरण, जिल्हा दूध संघ प्रकरण यासारख्या अनेक त्यांच्या चौकशा सुरू आहेत. त्यात सबळ पुरावे मिळत आहेत. त्यामुळे खडसे अस्वस्थ झाले आहेत. एकनाथ खडसे हे मुख्य पदाच्या लेव्हलचे आहेत, ज्येष्ठ नेते आहेत. मात्र असं असतानाही ते कमरे खालची भाषा बोलायला लागले आहेत."
दरम्यान, यावर एकनाथ खडसे यांनी देखील यावरून गिरीश महाजन यांच्यावर टीका केलीय. गिरीश महाजन यांना सध्या काय बोलावे हे सुचत नाही. एवढ्या खालच्या पातळीचं राजकारण मी कधी केलं नाही. माझ्या मुलाची हत्या झाली की आत्महत्या झाली हे तपासायला माझी काही हरकत नाही. केंद्रात आणि राज्यात यांचं सरकर आहे. त्यामुळे त्यांनी याचा तपास करावा. परंतु, असे आरोप करणे चुकीचे आहे, असे खडसे यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या