Sachin Vaze | जे अटकेत आहेत तेच अधिकारी चौकशी करत होते, ही बाब गंभीर- देवेंद्र फडणवीस
ही कारवाई म्हणजे फक्त सुरुवात असून, याबाबची आणखी माहितीही समोर येईल असं लक्षवेधी वक्तव्य त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना केलं.
मुंबई : मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली जीप आढळली. नंतर या गाडीच्या मालकाचा मृतदेह मुंब्य्राच्या खाडीत आढळून आला. हे प्रकरण विधानसभेत विरोधकांनी उचलून धरलं. यात नाव समोर आलं ते एन्काऊंटर स्पेशालिस्ट पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचं. ज्यांच्यापुढं यामुळे अडचणी वाढतच गेल्या आणि शनिवारी रात्री उशीरा त्यांना एनआयएकडून अटक करण्यात आली.
सचिन वाझे यांना अटक केल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सदर प्रकरणावर त्यांची प्रतिक्रिया दिली. ही कारवाई म्हणजे फक्त सुरुवात असून, याबाबची आणखी माहितीही समोर येईल असं लक्षवेधी वक्तव्य त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना केलं.
हा विषय मी सातत्यानं मांडत होतो....
वाझेंचं प्रकरण गंभीर असल्यामुळं हाताशी असलेल्या पुराव्यांच्या बळावर मी ते सभागृहात मांडलं. पण, पोलीसच असे वागू लागले तर मात्र परिस्थिती अवघड आहे. पोलिसांची अशीच वागणूक राहिल्यास राज्याच्या सुरक्षेचं काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. वाझे यांचं महत्व आणि वाढता प्रतिसाद पाहता हे सारं ते शिवसैनिक होते म्हणून होता का? असा प्रश्नार्थक सूर आळवत त्यांनी 'मी गृहमंत्री असतांना वाझे यांना घ्या, असं त्यावेळेस शिवसेनेने सांगितल्याचा गौप्यस्फोट केला. एनआयएच्या कारवाईअंतर्गत अनेक पुरावे त्यांच्या हाताशी लागले असून, हा गुन्हा कसा घडला याचे धागेदोरे मिळाले आहेत. मुनसुख हिरण यांच्या हत्येमागचे धागेदोरेही तपास यंत्रणांच्या हाती लागत आहेत. त्यामुळं आणखीही माहिती समोर येईल, असं म्हणत फक्त सचिन वाझेच नव्हे तर आणखीही दोषींची नावं पुढे येती असं सूचक वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं.
मुंबई पोलिसांच्या प्रतिमेबद्दल फडणवीस म्हणाले....
बॉम्ब ठेवल्याबाबतच्या घटनेसंदर्भात सांगताना या संपूर्ण काळातील घटनाक्रमाकडे लक्ष वेधत ते म्हणाले, 'आज जे (सचिन वाझे) अटकेत आहेत तेच सदर प्रकरणाच्या चौकशीचं प्रतिनिधीत्त्व करत होते. ही बाब अत्यंत गंभीर आहे, जिथं ज्यांनी घटना घडवली असे आरोप करण्यात येत आहेत त्यांच्यावरच चौकशीची जबाबदारी सोपवण्यात येते, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
पोलीस अशा प्रकारे कथित रुपानं गोष्टी आखतात, एका व्यक्तीची हत्या होते या अशा यंत्रणेला संजय राऊत यांनी प्रश्व विचारावेत असा थेट सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मला पोलिसांची काम करण्याची पद्धत ठाऊक असून, गोष्टींबाबतची माहिती मिळाल्यानंतर त्या उचित अशा अंतिम ठिकाणी पोहोचल्या पाहिजेत यासाठी आपला प्रयत्न असल्याची बाब अधोरेखित करत येत्या काळात सदर प्रकरणातून बरीच माहिती समोर येणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.
सचिन वाझे प्रकरणावर भाजपची भूमिका पाहता राज्यातील सत्ताधाऱ्यांनी त्यांच्यावर नाराजीचा सूर आळवला होता. त्यावरच प्रतिक्रिया देत देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'इतके पुरावे सादर केल्यानंतर मुंबई पोलिसांवर अविश्वास, महाराष्ट्रद्रोह असं सारं बोलणाऱ्यांनी एकदा तरी आरशात पहावं.' या सर्व घटनांनी मुंबई पोलिसांची प्रतिमा आहे तशी राहते की ती आणखी मलीन होते, याकडे लक्ष दिलं जाणं तितकंच गरजेचं असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी महाविकासआघाडी सरकारचे कान टोचले.
वाझेंना सरकार पाठिशी घालण्याता प्रयत्न करत असून त्यांना का वाचवलं जातंय ही बाब स्पष्ट होण्यासाठी ते आग्रही दिसले. राज्य अस्थिर करण्याचा विरोधी पक्षावर होणारा हा आरोप म्हणजे दुधखुळेपणाचाच प्रकार असल्याचंही ते म्हणाले. यावेळी त्यांनी सातत्यानं एकाच व्यक्तीवर दिली जाणारी मोठी जबाबदारी आणि त्या व्यक्तीवर होणारे गंभीर आरोप याकडे सर्वांचं लक्ष वेधलं.
सचिन वाझेंच्या नार्को टेस्टबाबत विरोधी पक्षाकडून केल्या जाणाऱ्या बाबतीत सध्या तपास यंत्रणांना त्यांचं काम करु द्यावं अशीच भूमिका त्यांनी मांडली. वाझे प्रकरण समोर आल्यावरच डेलकर प्रकरणात कारवाई का करण्यात आली, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सरकार अडचणीत येतं त्यावेळीच अशी परिस्थिती उदभवते असं बोचरं वक्तव्यही त्यांनी केलं.
Sachin Vaze Arrested LIVE : सचिन वाझेंना अटक, वाचा प्रत्येक घडामोड, एका क्लिकवर
फडणवीसांनीच सभागृहात मांडलेला मुद्दा
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझें मुद्दा विधानसभेत उपस्थित केला होता. मुकेश अंबानी यांच्यासारखे उद्योजक सुरक्षित नाहीत. त्यांच्या घराबाहेर आढळलेली जिलेटिनने भरलेली गाडी आणि संपूर्ण घटनाक्रम संशय निर्माण करणारा आहे. त्यामुळे तपास एनआयएकडे सोपवावा अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. सोबतच या प्रकरणात त्यांनी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले होते. फक्त सभागृहातच नव्हे, तर सदर प्रकरणीच्या अनेक घटनांबाबत संशय व्यक्त करत कठोर कारवाईची मागणी फडणवीस आणि भाजपकडू सातत्यानं उचलून धरण्यात आली होती.