काही दिवसांपूर्वी मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर एका स्कॉर्पिओ गाडीत स्फोटकं आढळली होती. याप्रकरणी सचिन वाझे यांना अटक करण्यात आली आहे. रात्री 11 वाजून 50 मिनिटांनी वाझे यांना अटक केल्याची माहिती एनआयएकडून देण्यात आली आहे. अटकेपूर्वी तब्बल 13 तास सचिन वाझे यांची एनआयएकडून चौकशी करण्यात आली. सचिन वाझे काल सकाळी 11 वाजताच एनआयएच्या कार्यालयात हजर झाले होते, तेव्हापासून त्यांची चौकशी सुरु होती. जवळपास 13 तासांच्या चौकशीअंती एनआयएने त्यांना अटक केली.
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sachin Vaze Arrested LIVE : सचिन वाझेंना अटक, वाचा प्रत्येक घडामोड, एका क्लिकवर
Ambani Security Scare Sachin Waze Arrest LIVE Updates : एन्काऊंटर स्पेशालिस्ट पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना काल रात्री उशीरा एनआयएकडून अटक करण्यात आली. या प्रकरणाविषयी सर्व अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
LIVE
Background
मुंबई : मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली जीप आढळली. नंतर या गाडीच्या मालकाचा मृतदेह मुंब्य्राच्या खाडीत आढळून आला. हे प्रकरण मग विधानसभेत विरोधकांनी उचलून धरलं. यात नाव समोर आलं ते एन्काऊंटर स्पेशालिस्ट पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचं. सचिन वाझे यांना काल रात्री उशीरा एनआयएकडून अटक करण्यात आली. या प्रकरणात आतापर्यंत नेमकं काय काय घडलं ते जाणून घेऊयात...
स्फोटकांनी भरलेली जीप आढळल्याने खळबळ
भारतातील श्रीमंत उद्योजक आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली जीप आढळल्याने खळबळ उडाली होती. मुंबईतील अँटिलिया या निवासस्थानाजवळ जिलेटिनचा साठा सापडला. या स्फोटकांसह एक चिठ्ठीही सापडली त्यामधून घातपाताची धमकी दिल्याचं माहिती समोर आली.
देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत उपस्थित केला मुद्दा
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला. मुकेश अंबानी यांच्यासारखे उद्योजक सुरक्षित नाहीत. त्यांच्या घराबाहेर आढळलेली जिलेटिनने भरलेली गाडी आणि संपूर्ण घटनाक्रम संशय निर्माण करणारा आहे. त्यामुळे तपास एनआयएकडे सोपवावा अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. सोबतच या प्रकरणात त्यांनी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले. फडणवीस यांनी मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर पार्क केलेल्या स्फोटकांनी भरलेल्या गाडीच्या प्रकरणावर अनेक प्रश्न उपस्थित केले. यावेळी ते म्हणाले की, "मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर रात्री एक वाजता गाडी पार्क झाली. तीन वाजता ड्रायव्हर मागच्या गाडीतून पळून गेला. एकच गाडी नव्हती, स्कॉर्पिओपाठोपाठ आणखी एक गाडी आली. दोन्ही गाड्या ठाण्यातून आल्या. ही गाडी तिथे पार्क होती, तिची ओळख पटल्यानंतर सर्वात आधी मुंबई पोलिसांचे सचिन वाझे तिथे पोहोचले. कोणीही पोहोचण्याच्याआधी ते आले, क्राईमचे पोलीस आहे, मग स्थानिक पोलीस आले. मग सचिन वाझेंना आयओ म्हणून अपॉईंट केलं. तीन दिवसांपूर्वी त्यांच्याऐवजी एका एसीपींना आयओ म्हणून नेमलं. सचिन वाझेंना का काढलं? हे मला समजलं नाही. पण यात योगायोग आहे. माझ्याकडे सीडीआर आहे, गाडीमालकाने गाडी चोरी झाल्याची तक्रार केली, ती गाडी अंबानींच्या घराबाहेर उभी होती. त्यांनी आपल्या जबाबात एक टेलिफोन नंबर सांगितला आहे. या नंबरचा एका नंबरशी संवाद 8 जून 2020, 25 जुलै 2020 त्यानंतर अनेक वेळा दिसतोय. हा नंबर आहे, सचिन हिंदुराव वाझे. ज्या दिवशी ही गाडी ठाण्याला बंद पडल्यानंतर गाडी मालक ओला घेऊन क्रॉफर्ड मार्केटला गेला. तिथे पोलीस आयुक्तांचं ऑफिस आहे. तिथे तो एका व्यक्तीला भेटला. ती व्यक्ती कोण? हा माझा प्रश्न आहे. हे जर काढलं तर सोपं आहे. ओलामध्ये बसून गेला त्याचा रेकॉर्ड आहे. ओलाच्या ड्रायव्हरने त्याला पाहिलंय, तो कोणाला भेटला हे पाहिलं आहे. अशा परिस्थितीत एवढे योगायोग कसे हे समजत नाही. वाझे ठाण्यात राहणारे, ज्याची गाडी घरासमोर पार्क केली तोही ठाण्यात राहणारा, घटनेच्या कितीतरी दिवसांपूर्वी त्यांचं फोनवरुन संभाषण झालं आहे. म्हणजे ते एकमेकांना ओळखतात. खूप मोठे प्रश्न निर्माण झाले. ती गाडी दिसल्यावर पहिल्यांदा तिथे वाझे पोहोचले. स्थानिक पोलीस नाही, क्राईम पोलीस नाही तर ते पोहोचले. हे धमकीचं पत्र वाझेंनाच मिळालं, त्यांनीच तिथे डिलिव्हर केलं. मग त्यानंतर योगायोग पाहा. टेलिग्राम चॅनल तयार होतं. जैश-उल-हिंद नावाने पत्र दाखवलं जातं, जणू खंडणी मागण्याकरता हे करण्यात आलं. मात्र जैश-उल-हिंद म्हणतं हे आमचं पत्रच नाही. खूप मोठी शंका या प्रकरणात तयार झाली आहे. म्हणून माझी मागणी आहे, हे पुरावे शंकेला वाव देणारे आहेत. ही टेरर अॅक्टिव्हिटी आहे, कारण जिलेटिन होतं. जैश-उल-हिंदचं नावं आलेलं आहे, उडवून देण्याची धमकी आहे. या संपूर्ण घटनेची चौकशी एनआयएकडे द्यावी. हे योगायोग काय आहेत, याची चौकशी एनआयएने करावी, अशी माझी मागणी आहे."
मनसुख यांचा मृतदेह आढळला
या प्रकरणात खळबळ उडाली ती मनसुख हिरण यांचा मृतदेह आढळल्यानंतर. हिरण यांचा मृतदेह मुंब्य्राच्या खाडीत आढळला. या प्रकरणी महाराष्ट्र एटीएसने हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. मनसुख यांच्या पत्नी विमला हिरेन यांच्या फिर्यादीवरुन हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा तपास दहशतवादविरोधी पथकाकडे वर्ग करण्यात आला. ज्यावेळी एटीएसचं पथक मनसुख यांच्या घरी चौकशीसाठी दाखल झालं होतं. त्यावेळी मनसुख यांची आत्महत्या नसून हत्या झाली असल्याचा आरोप हिरण यांच्या कुटुंबियांनी केला होता. अखेर विमला यांच्या फिर्यादिवरुन मनसुख हिरण प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाझेंकडून सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज
मनसुख हिरण मृत्यू प्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात अडकलेले पोलीस आधिकारी सचिन वाझे यांची क्राईम ब्रान्चमधून बदली करण्यात आली आहे. आता या प्रकरणात एपीआय सचिन वाझेंकडून सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल करण्यात आला. 19 मार्च रोजी त्यांच्या या अर्जावर सुनावणी होणार आहे. काल वाझे यांनी ठाण्यातील सेशन कोर्टात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला.
वाझे यांची नागरी सुविधा केंद्रात बदली
दरम्यान या प्रकरणात चर्चेत असेलेले पोलीस आधिकारी सचिन वाझे यांची क्राईम ब्रान्चमधून बदली करण्यात आली. वाझे यांची नागरी सुविधा केंद्रात बदली करण्यात आली. पोलीस मुख्यालयातून सचिन वाझे यांच्या बदलीसंदर्भात आदेश काढण्यात आले.
सचिन वाझेंचं खळबळजनक व्हॉट्सअॅप स्टेटस
काल समोर आलेल्या सचिन वाझेंच्या व्हॉट्सअॅप स्टेटसनं खळबळ उडाली. 'जगाला गुड बाय म्हणायची वेळ आलीय, आता माझ्याकडे पेशन्स नाहीत', अशा आशयाचं व्हॉट्सअॅप स्टेटस सचिन वाझेंनी ठेवलं होतं. सचिन वाझेंनी ठेवलेल्या व्हॉट्सअॅप स्टेटसमध्ये म्हटलं की, 2004 मध्ये त्यांना सीआयडीनं अशाच चुकीच्या पद्धतीनं अटक केलं होतं. माझ्या सहकारी कर्मचाऱ्यांनी मला फसवलं होतं. मात्र त्यावेळी माझ्याकडं 17 वर्षांच्या अपेक्षा आणि नोकरी बाकी होती आणि पेशन्स देखील होते. मात्र आता माझ्याकडे ना 17 वर्षांचं आयुष्य आहे ना सहनशक्ती आहे ना नोकरी आहे. त्यामुळं जगाला गुड बाय म्हणायची वेळ आली आहे, असं सचिन वाझेंनी म्हटलं. 17 वर्षांपूर्वीही मला फसवण्याचा प्रयत्न केला होता, तो आता दुसऱ्यांदा होतं आहे. ही स्टोरी चुकीची आहे. या सर्व गोष्टी राजकीय दबावापोटी आणि मीडिया ट्रायलमुळं होत आहेत. 4 आणि 5 मार्च रोजी मी साऊथ मुंबईमध्ये होतो आणि मनसुख हिरण ठाण्यात होता आणि त्याची बॉडी मुंब्य्रात मिळाली, असंही वाझेंनी म्हटलं.
सचिन वाझे यांना अटक
काही दिवसांपूर्वी मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर एका स्कॉर्पिओ गाडीत स्फोटकं आढळली होती. याप्रकरणी सचिन वाझे यांना अटक करण्यात आली आहे. रात्री 11 वाजून 50 मिनिटांनी वाझे यांना अटक केल्याची माहिती एनआयएकडून देण्यात आली आहे. अटकेपूर्वी तब्बल 13 तास सचिन वाझे यांची एनआयएकडून चौकशी करण्यात आली. सचिन वाझे काल सकाळी 11 वाजताच एनआयएच्या कार्यालयात हजर झाले होते, तेव्हापासून त्यांची चौकशी सुरु होती. जवळपास 13 तासांच्या चौकशीअंती एनआयएने त्यांना अटक केली. आज (14 मार्च) सकाळी 11 च्या सुमारास त्यांना कोर्टात हजर केलं जाण्याची शक्यता आहे.
CIUच्या चार पोलिसांची वेगवेगळ्या खोलीत चौकशी सुरु
क्राईम इंटेलिजेंस यूनिट CIUच्या ज्या चार पोलिसांना NIA नं चौकशीसाठी बोलावलं आहे. त्यांची वेगवेगळ्या खोलीत चौकशी सुरु आहे. यातील रियाज काझी यांना अटक होऊ शकते. रियाज काझी क्राईम इंटेलिजेंस यूनिटमध्ये एपीआय आहेत.
जी इनोव्हा गाडी काल रात्री एनआयएनं ताब्यात घेतली तीच गाडी अँटीलियाजवळ दिसली
जी इनोव्हा गाडी काल रात्री एनआयएनं ताब्यात घेतली तीच गाडी अँटीलियाजवळ दिसली होती. हीच गाडी पोलिस हेड ऑफिसमध्ये देखील दिसून आली होती. ही गाडी CIU म्हणजे क्राइम इंटेलिजेंस यूनिटची होती. जिचा वापर सचिन वाझे आणि टीम करत होती. घटनेनंतर या इनोव्हाला पोलिसांच्या मोटार ट्रांसपोर्ट विभागात रिपेअरिंगसाठी पाठवलं होतं.
आणखी तीन अधिकारी, कर्मचारी यांचा समावेश असण्याची शक्यता
मुंबई : मुकेश अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटक प्रकरणाचा तपास करणाऱ्या एनआयएने सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझेंना अटक केली आहे. या प्रकरणात एकूण 5-7 जणांचा समावेश असल्याची माहिती आहे. या प्रकरणात आणखी तीन अधिकारी, कर्मचारी यांचा समावेश असण्याची शक्यता आहे. सचिन वाझे यांच्या शिवाय आणखी काही पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चौकशी होऊ शकते. त्यामुळे पोलीस वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. एनआयएने रात्री उशीरा पांढऱ्या रंगाची इनोव्हा कार टो करून आणली आहे. एक इनोव्हा कार 25 फेब्रुवारीला म्हणजे त्याच दिवशी मुलुंड टोल नाक्यावर सीसीटीव्हीमध्ये दिसली होती. एनआयए कार्यालयात रात्री आणण्यात आलेली इनोव्हा कार तिच आहे का हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. याच इनोव्हा गाडीतून जाणाऱ्या तिघांना अटक होण्याची शक्यता आहे. त्यासाठी एनआयएची तीन पथकं रवाना झाल्याची माहिती आहे. यामध्ये दोन्ही चालक आणि एका व्यावसायिकाचा समावेश आहे.
सचिन वाझेंच्या हाताला सलाईन
सचिन वाझेंना एनआयए ऑफिसला परत आणलं, मध्यरात्री त्यांना कार्यालयातून नेण्यात आले होते, त्यांना सकाळी परत कार्यालयात आणलं. यावेळी सचिन वाझेंच्या हाताला सलाईन लावलेलं दिसून आलं. त्यांना रात्री हॉस्पिटलला नेलं असावं अशी शक्यता