Bhagavad Gita in school : गुजरातप्रमाणेच महाराष्ट्रातही भगवद्गीता, संतसाहित्याचा शालेय शिक्षणात समावेश करावा, भाजपची मागणी
गुजरात सरकारने 6 वी ते 12 वी पर्यंतच्या शालेय अभ्यासक्रमात भगवद्गीतेचा समावेश केला आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातही भगवद्गीता, संतसाहित्याचा शालेय शिक्षणात समावेश करावा अशी मागणी भाजपने केलीय.
Bhagavad Gita in school : गुजरातप्रमाणेच महाराष्ट्रातही भगवद्गीता, संतसाहित्य या आध्यात्मिक शिक्षणाचा शालेय शिक्षणात समावेश केला जावा. भावी पिढी संस्कारक्षम करण्यासाठी संत साहित्यचे शिक्षण द्यावं, अशी मागणी भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले (Acharya Tushar Bhosale) यांनी केली आहे. यामध्ये मुख्यमंत्री आणि शालेय शिक्षण मंत्री यांनी राजकारण करु नये, असेही भोसले म्हणाले.
भगवद्गीता हे जीवन जगण्याचे एक सुत्र आहे. गुजरात सरकारने शालेय शिक्षणात भगवद्गीता शिकवण्याचा जो निर्णय घेतली तो अगदी उत्तम निर्णय आहे. त्यामुळं महाराष्ट्र सरकारनं सुद्धा भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा यासारखे संत साहित्य याचा समावेश शालेय शिक्षणात केला पाहिजे. जेणेकरुन महाराष्ट्रातील भावी पिढी संस्कारक्षम होईल. त्यांना महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा याचं ज्ञान असेल, या दृष्टीने महत्वाचे असल्याचे भोसले म्हणाले.
दरम्यान, गुजरात सरकारने एक महत्वाचा निर्णय घेत राज्यभरातील इयत्ता 6 वी ते 12 वीपर्यंतच्या शालेय अभ्यासक्रमात भगवद्गीतेचा समावेश केला आहे. सरकारने विधानसभेत जाहीर केले की 2022-23 या शैक्षणिक वर्षापासून शालेय अभ्यासक्रमात भगवद्गीता शिकवली जाईल. शिक्षणमंत्री जितू वाघानी यांनी विधानसभेत शिक्षण विभागासाठी अर्थसंकल्पीय तरतूदीवरील चर्चेदरम्यान ही घोषणा केली. विद्यार्थ्यांना गीतेमधील विचार आणि संस्कार शिकवले जाणार आहेत. तसेच विद्यार्थी शाळेत गीतेमधील निवडक श्लोक नित्यपाठ म्हणून म्हणतील. गुजरातचे शिक्षणमंत्री जितू वघानी यांनी ही माहिती दिली. गुजरातमध्ये नोव्हेंबर-डिसेंबर 2022 दरम्यान विधानसभेची निवडणूक होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीची घोषणा होण्याआधीच गुजरात सरकारने गीतेचा समावेश शिक्षणात करत असल्याची घोषणा केली. सरकारच्या घोषणेचा मतांच्या स्वरुपात गुजरातमधील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीला फायदा होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
याआधी दक्षिण दिल्लीचे महापौर मुकेश सूर्यन यांनी महापालिका शाळांमध्ये 'वास्तविक इतिहास' या अभ्यासक्रमात महापराक्रमी भारतीय योद्ध्यांचा शौर्यगाथेचा समावेश करत असल्याचे जाहीर केले होते. प्राथमिक शाळेत गीतेतील निवडक विचार आणि संस्कार शिकवणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले होते. देशभक्त विद्यार्थी घडविण्यासाठी अभ्यासक्रमात बदल करत असल्याची माहिती दक्षिण दिल्लीचे महापौर मुकेश सूर्यन यांनी दिली होती.
महत्त्वाच्या बातम्या: