Bhaskar Jadhav : इकडं महाविकास आघाडीचा जागावाटपाचा गुंता सुटेना अन् तिकडं थेट उद्धव ठाकरेंसमोर भास्कर जाधवांची मोठी मागणी
शिवसेना ठाकरे गटाकडून (Uddhav Thackeray) आज पूर्व विदर्भातील गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर, रामटेक आणि चंद्रपूर या जिल्ह्यातील सहा लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला.
मुंबई : नितीशकुमार पुन्हा पलटूराम झाल्याने आणि ममता दिदी आपल्या हट्टावर कायम राहिल्याने इंडिया आघाडी विस्कळीत झाली असतानाच महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) महत्त्वपूर्ण असलेल्या महाविकास आघाडीमध्ये सुद्धा अजूनही जागावाटपांचा घोळ संपलेला नाही. आतापर्यंत 30 जागांवर मतैक्य झालं असलं, तरी उर्वरित जागांवर अजूनही काथ्याकूट सुरुच आहे. महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षांकडून आपापल्या पातळीवर सुद्धा प्रत्येक जागेचा आढावा घेण्यात येत आहे.
ठाकरे गटाकडून विदर्भातील जागांचा आढावा
याच पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाकडून (Uddhav Thackeray) आज पूर्व विदर्भातील गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर, रामटेक आणि चंद्रपूर या जिल्ह्यातील सहा लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला. या बैठकीमध्ये पूर्व विदर्भाची जबाबदारी असलेल्या आमदार भास्कर जाधव यांनी आक्रमक भूमिका घेत मोठं वक्तव्य केले.
भाजपला संपवण्यासाठी काँग्रेसला आपला वापर करू देऊ नका
एकमेकांना संपवण्याच्या युद्धात आपल्या खांदाचा वापर होऊ देऊ नका, असे भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी उद्धव ठाकरेंच्या समोर सांगितले. भास्कर जाधव या बैठकीमध्ये चांगलीच आक्रमक झाल्याचे दिसून आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भास्कर जाधव म्हणाले की काँग्रेसला संपवण्यासाठी त्यावेळी भाजपने आपला वापर केला होता. आता भाजपला संपवण्यासाठी काँग्रेसला आपला वापर करू देऊ नका. सध्याच्या भूमिकेत आपण आपल्या जास्त जागा घेऊन पक्ष मजबूत केला पाहिजे असं त्यांनी यावेळी सांगितले. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत भास्कर जाधव यांनी अत्यंत आक्रमकपणे आपली भूमिका मांडली.
विदर्भातील रामटेक लोकसभेसह चंद्रपूरची लोकसभा लढली पाहिजे, यासाठी भास्कर जाधव आग्रही असल्याचे दिसून आले. युती काळामध्ये ज्या जागा भाजपला सोडल्या होत्या त्या ठिकाणी आपली ताकद आहे, त्या जागा सुद्धा आपण लढल्या पाहिजेत. त्या जागा मित्र पक्षांना सोडू नयेत अशी मागणी त्यांनी यावेळी केली. दरम्यान, आजच्या बैठकीमध्ये पूर्व विदर्भातील गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर, रामटेक आणि चंद्रपूर या जिल्ह्यातील आढावा घेण्यात आला. या लोकसहा लोकसभा मतदारसंघांपैकी रामटेक लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार कृपाल तुमाने यांचा मागील निवडणुकीत विजय झाला होता. मात्र, आता ते शिंदे गटात आहेत. त्यामुळे पूर्व विदर्भात ठाकरे गट किती जागांवर निवडणूक लढवणार? याची उत्सुकता आहे.
इतर महत्वाच्या बातम्या