Bharat Jodo Yatra : भारत जोडो यात्रेचे महाराष्ट्रात पाच जिल्ह्यात 14 मुक्काम, 384 किमीचा प्रवास, पाहा कसं आहे नियोजन?
सहा नोव्हेंबरला रात्री काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची सध्या भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे. या यात्रेचे महाराष्ट्रात नेमकं कसं नियोजन आहे, त्याची माहिती पाहुयात.
Bharat Jodo Yatra : काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची सध्या भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) सुरु आहे. सहा नोव्हेंबरला रात्री ही यात्रा महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे. या यात्रेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे सहभागी होणार आहेत. मात्र, उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) हे सहभागी होणार की नाही याचा सस्पेन्स शिवसनेनं ठेवला आहे. दरम्यान, भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रातल्या पाच जिल्ह्यात मिळून 384 किलोमिटरचा प्रवास होणार आहे. राज्यात भारत जोडोचे 14 मुक्काम, 10 कॉर्नर सभा,तर दोन भव्य सभा देखील होणार आहेत. सुरक्षेच्या कारणांमुळे अकोला जिल्ह्यात राहुल गांधी कारने प्रवास करणार आहेत. या यात्रेत असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी येणार आहेत. त्यांच्या मुक्कामासाठी यात्रेच्या मार्गावरील जवळपास सर्वच मंगल कार्यालये बुक करण्यात आली आहेत. जिथं कार्यकर्त्यांना मुक्काम करता येणार आहे.
10 नोव्हेंबरला नांदेडमध्ये पहिली सभा
राहुल गांधीची भारत जोडो यात्रा सहा तारखेला संध्याकाळी महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे. संविधानिक मुल्ये आणि सद्भावनेसाठी काँग्रेस नेते राहुल गांधी भारत जोडो यात्रेवर आहेत. सोमवारी सकाळी देगलूर मार्गे ही यात्रा महाराष्ट्रात पोहोचणार आहे. महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यात 14 मुक्काम होणार आहेत. दरम्यान पहिली सभा ही 10 नोव्हेंबरला नांदेड इथं तर दुसरी सभा 18 नोव्हेंबरला गजानन महाराजांच्या शेगावात होणार आहे.
'या' पाच जिल्ह्यातून जाणार भारत जोडो यात्रा
राज्यातील नांदेड, हिंगोली, वाशीम,अकोला आणि बुलढाणा या पाच जिल्ह्यातून 14 दिवस ही यात्रा तब्बल 384 किलोमीटरचा प्रवास करणार आहे. अकोला जिल्ह्यातील यात्रा मार्गांवर राहुल गांधी कारने प्रवास करणार आहेत. काँग्रेसच्या या यात्रेत अनेक सामाजिक संघटना सहभागी झाल्या आहेत. तामिळनाडूत द्रमुक नेते उपस्थित होते. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे काय? हे या यात्रेतून दिसून येईल. राहुल गांधी यांच्या यात्रेत आघाडीतले शरद पवार आणि उध्दव ठाकरे हे दोन नेते सहभागी होणार की, नाही याची चर्चा सूरु आहे. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार सध्या आजारी असलेले शरद पवार या यात्रेत सहभागी होणारं आहेत. दुसरीकडं ठाकरे पिता-पुत्रांनी मात्र, या यात्रेत सहभागी होण्याबाबतचा संस्पेन्स कायम ठेवला आहे.
300 अधिकारी, दीड हजार पोलीसांचा बंदोबस्त तैनात
भारत जोडो यात्रेनिमित्त देगलूर, नांदेड, हिंगोली आदी शहरं सज्ज झाली आहेत. यात्रेच्या पूर्वतयारीसाठी महाराष्ट्र, तेलंगणा आणि कर्नाटक या तिन्ही राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक देगलूर येथे पार पडली आहे. देगलूरहून ही यात्रा निघाल्यानंतर देगलूर ते नांदेड हा मार्ग सात ते 12 नोव्हेंबर पाच दिवस हा मार्ग बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या मार्गावरील वाहतूक दुसऱ्या मार्गानं वळवण्यात आली आहे. नांदेडमधील जवळपास नऊ मार्गावरील वाहतूकही वळवण्यात आली आहे. यात्रा सुरळीत व्हावी यासाठी 300 अधिकारी, दीड हजार पोलीसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शहरातील रस्ते साफसफाई तसेच प्रमुख रस्त्यावरील दुभाजकांना रंगरंगोटीचे काम केले जात आहे. मागील आठ दिवसापासून दोन एकर खुल्या मैदानाची सफाई करण्यात आली आहे.
मुक्कामासाठी कंटेनर
यात्रेत राहुल गांधी, त्यांचे सहकारी, सुरक्षा रक्षक यांच्या मुक्कामासाठी कंटेनरची व्यवस्था असते. तीन एकर जागेत हे मुक्कामाचे कंटेनर थांबवण्यात येतात. जिथे भोजन आणि पाणी दोन्ही व्यवस्था असते. दरम्यान, नांदेडहून हिंगोलीत ही यात्रा 11 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी दाखल होणार आहे. त्यामुळं हिंगोलीतही राज्यातील काँग्रेसचे नेते तळ ठोकून आहेत. हिंगोलीत राहुल गांधी यांचे चार मुक्काम आहेत. राहुल गांधी यांच्या व्यायामासाठी गोलाकार मैदान करण्यात येत आहे. हे मैदान माती टाकून थोडे उंच करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ज्या मार्गावरुन ही यात्रा जाणार आहे, त्या मार्गावरही भारत जोडो यात्रेचे अनेक फ्लेक्स, होर्डिंग लावणे सुरु आहे. कुठलीही कमी या यात्रेसाठी राहू नये याची तजवीज केली जात आहे.
सर्वच माध्यमातून प्रचार सुरु
या यात्रेचा डिजिटल, सोशल आणि प्रत्यक्ष असा सर्वच माध्यमातून प्रचार केला जातोय. परभणीत एलईडी स्क्रिन लावून फिरवल्या जात आहेत. सोशल माध्यमांत #मी पण चालणार हा हॅश टॅग चालवला जातोय. ज्याची लिंक शेअर करुन फोटो सह डीपी ठेवला जातोय. तसेच प्रत्यक्ष अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह काँग्रेसचे अनेक बडे नेते जिल्ह्याजिल्ह्यात बैठका घेत आहेत. गाड्यांचे नियोजन सुरू आहे. तसेच लेझीम, ढोल, पथक, कलाकारांचे विविध विषयांवरील पथनाट्य आदी या यात्रेत सहभागी केले जाणार असल्यानं त्यांचाही सराव सुरू आहे.
यात्रेचे दिवसभरातील नियोजन कसे असते?
सकाळी सहा वाजता सेवा दलाच्या ध्वजवंदनानंतर यात्रा सुरु होते
सकाळी सहा ते साडेदहा वाजेपर्यंत 15 किलोमीटरचा टप्पा पूर्ण करुन विश्रांती
संध्याकाळी चार ते साडेसहा दरम्यान दहा किलोमीटर ही यात्रा चालते
शेवटी एक कॉर्नर सभा होते, त्यानंतर मुक्काम
महत्त्वाच्या बातम्या: