Bhandara Hospital Fire | भंडारा रुग्णालय आगीचा अहवाल समोर; शॉर्ट सर्किटमुळे आग, दोन नर्सवर बेजबाबदारपणाचा ठपका
महाराष्ट्राला सुन्न करणाऱ्या भंडाऱ्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयातील आगीचा अहवाल समोर आला आहे. या आगीसाठी शॉर्ट सर्किटचं कारण देण्यात आलं आहे. तर दोन परिचारकांच्या बेजबाबदारपणामुळे आग लागल्याचं नमूद करण्यात आलं आहे.
मुंबई : महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला चटका लावणाऱ्या भंडाऱ्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयातील आगीचा अहवाल समोर आला आहे. 9 जानेवारी रोजी रुग्णालायत नवजात शिशू युनिटमध्ये लागलेल्या या आगीत दहा बालकांचा मृत्यू झाला होता. संपूर्ण राज्य सुन्न करणाऱ्या या आगीच्या घटनेसाठी शॉर्ट सर्किटचं कारण देण्यात आलं आहे. तपास अधिकाऱ्यांनी 50 पानांचा अहवाल सादर केला आहे. यामध्ये दोन परिचारकांच्या बेजबाबदारपणामुळे आग लागल्याचं नमूद करण्यात आलं आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या अहवालावर चर्चा होणार आहे.
भंडारा रुग्णालयातील आगीनंतर नागपूरचे विभागीय आयुक्त संजीव कुमार यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी नेमण्यात आली आहे. त्यांनी हा 50 पानांचा अहवाल सादर केला आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज घडना घडली त्यावेळी वर्तवण्यात आला होता. अहवालातही शॉर्ट सर्किटचाच उल्लेख करण्यात आला आहे. तसंच रुग्णालयात स्टाफ कमी होता. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, आग लागली त्यावेळी तिथे कोणीही उपस्थित नव्हतं. त्यामुळे या घटनेबाबत रुग्णालयातील कर्मचाऱ्यांकडे बोट दाखवण्यात आलं आहे.
भंडारा आगीच्या अहवालात काय? - आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा निष्कर्ष - आग लागली तेव्ह संबंधित वॉर्डमध्ये कोणीही उपस्थित नव्हतं - भंडारा दुर्घटनेसाठी दोन नर्स आणि काही वरिष्ठ अधिकारीही जबाबदार - रुग्णालय प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली असती तर घटना टाळता आली असती - अशा दुर्घटना पुन्हा होऊ नये यासाठी अहवालात काही महत्त्वाच्या उपाययोजना
भंडाऱ्यात नवजात शिशू केअर युनिटमध्ये आग, दहा बालकांचा दुर्दैवी मृत्यू
दुर्लक्ष करणाऱ्यांना शिक्षा होणारच : राजेश टोपे या अहवालाचा अभ्यास आणि चर्चा आमच्या विभागस्तरावर केली जाईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर अहवाल सादर केला जाईल. अहवालाच्या निष्कर्षाच्या अनुषंगाने कारवाई केली जाईल. या प्रकरणी दुर्लक्ष करणार्यांना शिक्षा होईलच यात शंका नाही, मात्र ही सगळी सिस्टीम दुरुस्त करण्यासाठी ओव्हरअल प्रयत्नशील राहू, असं आश्वासनही राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलं आहे.
काय आहे प्रकरण? भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये (SNCU) 9 जानेवारी रोजी आग लागल्यामुळे दहा बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला होता. या युनिटमध्ये एकूण सतरा बालकं होती. त्यापैकी सात जणांना वाचवण्यात आलं. या SNIC मध्ये आऊटबॉर्न आणि इन बॉर्न अशी दोन युनिट आहेत. यापैकी मॉनिटरमध्ये असलेले सात बालकांना वाचवण्यात आले तर आऊट बॉर्न युनिटमधील दहा बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृत्युमुखी पडलेली बालकं एक ते तीन महिने या वयोगटातील होती. ज्या बालकांचं वजन कमी आहे किंवा प्रकृती नाजूक आहे, अशा बालकांनाच या वॉर्डमध्ये ठेवलं जातं.