Bhandara News : सागवान वृक्षाची अवैध वाहतूक करणाऱ्या बापलेकांना अटक; गोबरवाही पोलिसांची कारवाई
Bhandara Crime News : शासकीय जागेवरील मौल्यवान सागवान वृक्षांची अवैधपणे कत्तल करून त्याची विक्रीसाठी वाहतूक करणाऱ्या बापलेकांना अटक करण्यात आली.
Bhandara News: भंडारा : शासकीय जागेवरील मौल्यवान सागवान वृक्षांची अवैधपणे कत्तल करून त्याची विक्रीसाठी वाहतूक करणाऱ्या बापलेकांना अटक करण्यात आली. ही कारवाई तुमसर तालुक्यातील (Bhandara) मोठागाव इथं गोबरवाही पोलिसांनी (Bhandara Police)केली. या कारवाईमध्ये त्यांच्याकडून 1 लाख रुपये किंमतीचा सागवान लाकूड फाटा आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले वाहन पोलिसांनी जप्त केले आहे. सदानंद वाहणे (50) आणि वीरेंद्र वाहणे (27) रा. मोठागाव असे पोलिसांनी अटक केलेल्या बापलेकांचे नावं आहेत.
दिवसाढवळ्या सागवान वृक्षांची कत्तल
तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या परिसरात मोठ्या प्रमाणात जंगल क्षेत्र आहे. या जंगलात विशेषता सागवान वृक्षांचे प्रमाण जास्त आहे. बांधकाम आणि इतर गृहोपयोगी वस्तूंकरिता सागाचे लाकूड वापरल्या जात असल्याने या लाकडांची मागणी खूप आहे. सोबतच या लाकडाचे बाजारात देखील फार मोल आहे. त्यामुळे वनविभागाच्या राखीव क्षेत्रातून सागवान झाडांची कत्तल करून रात्री त्याची छुप्या पद्धतीने वाहतूक करण्यात येते. अनेकवेळा याकडे हेतू पुरस्सर दुर्लक्ष केल्या जाते. याचाच फायदा घेत मोठागाव आसलपाणी येथील झुडपी जंगल गट क्र. 232 क्षेत्र 0.78 हेक्टर आर या शासकीय जागेवरील सागवान वृक्षांची दिवसाढवळ्या कत्तल करत असल्याचे आसलपाणी साझा क्र.34 चे तलाठी अनिल गणेश डोरले यांनी गोबरवाही पोलिसात तक्रार दिली.
तक्रार देताच गोबरवाही पोलिसांनी घटनास्थाळ गाठून कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी एक लाख रुपयांचे सागवनाचे लाकूड आणि वाहतुकीसाठी वापरण्यात ट्रॅक्टर जप्त केले. या प्रकरणी गोबरवाही पोलिसांनी सदानंद वाहणे (50) आणि वीरेंद्र वाहणे (27) रा. मोठागाव या दोघा बापलेकांना अटक केली असून पुढील तपास भास्कर भोंगाडे करीत आहेत.
उच्च दर्जाचे सागवान लाकूड
विदर्भातील बहुतांश भाग जंगलांनी वेढलेला आहे. सोबतच या भागात उच्च दर्जाचे सागवनाचे लाकूड विपुल प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे राज्यासह परराज्यातील लाकूडमाफियांचा डोळा या जंगलांकडे असतो. जंगलतोड करण्यासाठी आणि तोडलेल्या लाकडांची वाहतूक करण्यासाठी वनविभागाचा परवाना असणे आवश्यक आहे. लाकूडतोड करण्यासाठी वनविभागाकडून जितकी झाडे तोडण्याची परवानगी दिलेले असते, तितकीच झाडे तोडणे गरजेचे आहे. मात्र अनेकदा छुप्या मार्गाने जंगलतोड करून त्याची वाहतूक होत असते. वनविभागाने अशा लाकूडमाफियांचा अनेकदा मुसक्या आवळून कडक कारवाई देखील केली आहे. मात्र अलीकडे या वनक्षेत्रात पुन्हा लाकूड तस्करांची टोळी सक्रिय झाली असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या