ऑस्ट्रेलियातील बिग बॅश क्रिकेट स्पर्धेवर परभणीत सट्टा, तीन लाखांचा मुद्देमाल जप्त
पथकाने दहा मोबाईल, तीन दुचाकी,रोख रक्कम असा एकूण 3 लाख 8 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दैठणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परभणी : ऑस्ट्रेलियामध्ये सुरु असलेल्या बिग बॅश क्रिकेट स्पर्धेवर परभणीत सट्टा लावणाऱ्या चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून मोबाईल,पैसे,दुचाकी असा तीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीस अधीक्षक मीना यांना परभणीच्या गंगाखेड रस्त्यावरील कालिका मंदिराच्या शेजारी ऑस्ट्रेलियामध्ये लाइव्ह सुरू असलेल्या बिग बॅश क्रिकेटवर काही जण पैसे घेऊन सट्टा लावत असल्याचे खात्रीशीर माहिती मिळाली होती. त्यावरून त्यांनी परिविक्षाधीन पोलिस उपाधीक्षक बापूराव दडस, फौजदार विश्वास खोले, चंद्रकांत पवार यांच्या विशेष पथकाला कारवाईसाठी पाठवले.
या पथकाने मिळालेल्या माहितीआधारे त्याठिकाणी छापा मारला. त्यावेळी तेथे चार जण सोनी टीव्हीवर लाईव्ह चालु असलेल्या ऑस्ट्रेलिया देशातील बिग बॅश क्रिकेट लीग सामन्यावर लोकांकडून पैसे घेत असल्याचे दिसून आले. क्रिकेटवर सट्टा लावणाऱ्या चौघांना पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पथकाने दहा मोबाईल, तीन दुचाकी,रोख रक्कम असा एकूण 3 लाख 8 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दैठणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.