वाल्मिक कराडची मोनोपॉली असणाऱ्या परळी औष्णिक केंद्रात अखेर बाहेरच्यांनी राख उचलली, पोलीस बंदोबस्तात राखेचा उपसा
Beed: गेले काही महिन्यांपासून परळीच्या थर्मल बाहेरील दाऊदपूर येथील तलावातून राख उचलण्यासाठी महानिर्मितीने निविदा प्रक्रिया पार पाडली.

Beed: सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर परळीतील थर्मलच्या राखेचे अर्थकारण समोर आले. वाल्मिक कराडची दहशत असणाऱ्या परळी औष्णिक विद्यूत केंद्राच्या राखेसंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आलाय .परळीच्या औष्णिक वीज केंद्राच्या दाऊदपूरच्या तलावात पडणारी राख आता बाहेरच्यांना पैसे देऊन घेता येणार आहे. गेले काही महिन्यांपासून दाऊदपूर येथील तलावातून राख उचलण्यासाठी महानिर्मितीने निविदा प्रक्रिया पार पाडली. निविदा प्रक्रिया पार पाडल्यानंतर आता पात्र झालेल्या निविदा धारकांना राख उचलण्यास परवानगी मिळाली आहे. या निर्णयामुळे परळीतील राख माफीयांना आता लगाम बसणार असल्याचं सांगितलं जातंय. दाऊतपूर येथील तलावातून आता पोलिस बंदोबस्तात राख उपसा सुरू करण्यात आला आहे. राख उपसा करण्यासाठी आवश्यक असणारी पोकलेन मशीन यंत्रणा बंधाऱ्यात निविदाधारक एजन्सी चालकाकडून सोडण्यात आली. पैसे देऊन राख खरेदी करण्याची निविदा प्रक्रिया आता पूर्ण झाली असून याबाबत परळी औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य कार्यकारी अभियंता सुनील इंगळे यांनी या प्रक्रियेबाबत माहिती दिली आहे .
बीडच्या मस्साजोगमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर खंडणी, सत्ता, खून ,पैसा या सगळ्या कारणांवरून बीड धगधगते आहे . या सगळ्या प्रकरणांचा धागा येऊन थांबतो राखेपर्यंत. (Ash in Parli) आता शुल्क भरून अधिकृत पॉंड राख उचलण्यास पात्र 16 निविदाधारक एजन्सीना मंजुरी देण्यात आली आहे. 2 एप्रिलपासून 21 पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्या बंदोबस्तामध्ये आणि परळी औष्णिक विद्युत केंद्राच्या 30अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नवीन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
नक्की प्रकार काय?
परळी तालुक्यातील दाऊतपूर, दादाहरी वडगाव परिसरात महाजनकोचं नवीन औष्णिक विद्युत केंद्र आहे. इथे 250 मेगावॅट क्षमतेचे तीन संच सुरू असून, एकूण 750 मेगावॅट वीज निर्मिती केली जाते. या वीज निर्मिती प्रक्रियेत कोळसा जळल्यावर राख तयार होते. ही राख दोन प्रकारांची असते एक म्हणजे पॉंड राख, जी जड असते आणि ती दाऊतपूर येथील राख बंधाऱ्यात सोडली जाते. दुसरी म्हणजे फ्लाय राख, जी बंकरमधून उचलून नेली जाते.पॉंड राख वीटभट्टीसाठी वापरली जाते. ती बीड, लातूर, परभणी जिल्ह्यांत पाठवली जाते. दाऊतपूर आणि आसपासच्या परिसरातील सुमारे 150 प्रकल्पग्रस्त नागरिकांनी प्रशासनाकडे अर्ज केले आहेत. ही राख आधी नागरिकांना उचलू दिली जायची नाही. राखेचे प्रदूषण आम्ही सहन करतो यासाठी आम्हाला राख देण्यात यावी अशी मागणी दौतपूरच्या गावकऱ्यांनी केली होती . त्यानंतर राखेसाठी अधिकृत निविदा प्रक्रिया पार पडली. यातून 16 पात्र निविदांची प्रक्रीया पूर्ण झाली असून पैसे देऊन आता दाऊदपूरच्या तलावातील राख उचलता येणार आहे.
राखेच्या वाहतूकीची प्रक्रीया काय?
राखीची प्रक्रिया मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट दिल्लीतून होते . राखेचं टेंडरिंग या महाजनको यांनी दिलेला नियमाप्रमाणे करण्यात येते .पौंड राख टेंडरची प्रक्रिया आम्ही दोन तारखेपासून (2 एप्रिल) सुरू केली आहे . राखेच्या तळ्यात सध्या वीस पोकलेन मशीनद्वारे राख काढून ती हायवाद्वारे काढली जात आहे .महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमाप्रमाणे राखेचे वाहतूक केली जात आहे .राखेच्या वाहतुकीसाठी 400 gsm च्या कापड राखेवर झाकून हे गोण बाहेर काढली जातील . हायवा मध्ये राख भरताना ती पूर्ण भरू नये अशा देखील सूचना करण्यात आल्या आहेत .आरटीओ चे सर्व नियम पाळले पाहिजेत असे आम्ही त्यांच्याकडून लेखी घेतले आहे .या सर्व गोष्टींचे पालन करून राखेचे वाहतूक केली जात आहे .राखेचे प्रदूषण आम्ही सहन करतो यासाठी आम्हाला राख देण्यात यावी अशी मागणी दौतपूरच्या गावकऱ्यांनी केली होती .यानंतर गावकऱ्यांना 28 हजार मॅट्रिक टन चा साठा 72 हजार मीटर पर्यंत वाढवून दिला .हे त्यांना आम्ही केवळ शंभर रुपये प्रति टन देत आहोत .पौंड राखेची प्रक्रिया दौतपूर ग्रामस्थांच्या सहकार्याने पार पडली . 20% कोट्यातला राखेसाठी दोन तारखेला आम्ही निविदा प्रक्रिया पूर्ण पार पडली .यावेळी आता आलेल्या अर्जांची छाननी सुरू आहे .यातून महानिर्मिती आणि सरकारला महसूल मिळावा असा आमचा प्रयत्न आहे असे परळी औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य कार्यकारी अभियंता सुनील इंगळे यांनी सांगितले . दरम्यान मंत्री पंकजा मुंडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठकीत राखीच्या वाहतुकीचा कोणाला त्रास होऊ नये असे सांगितले होते त्याप्रमाणेच काम केले जात आहे
.
हेही वाचा:























