(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पतीच्या प्रेयसीच्या मुलाचा खून करणाऱ्या महिलेला दहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा, बीड जिल्हा न्यायालयाचा निर्णय
Beed News : पतीच्या प्रेयसीच्या मुलाचा खून करणाऱ्या महिलेला दहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. बीड जिल्हा व सत्र न्यायालयाने याबाबतचा निर्णय दिला आहे.
Beed News Update : पतीच्या प्रेयसीच्या मुलाला नदीत बुडवून मारणाऱ्या महिलेला दहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. लग्नानंतरही पतीच्या अनैतिक संबंधामुळे संतापलेल्या पत्नीने पतीच्या प्रेयसीच्या साडेतीन वर्षाच्या मुलाला पाण्यात बुडून मारले होते. या प्रकरणी महिलेची दहा वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा बीडच्या न्यायालयाने ठोठावली आहे. शारदा श्रीराम शिंदे असे शिक्षा झालेल्या महिलेचे नाव आहे.
शारदा हिचा पती श्रीराम शिंदे याची 15 वर्षापूर्वी गढी कारखाण्यावर काम करणाऱ्या एका महिलेसोबत ओळख होऊन प्रेमसंबंध निर्माण झाले होते. त्या महिलेचा पती भोळसर असल्याने श्रीराम तिला पैशाची मदत करत असे. परंतु, शारदाला हे आवडत नव्हते. त्यामुळे पती बाहेर गेल्यानंतर शारदा वारंवार त्या महिलेला फोन करून तिच्यासोबत भांडत असे. दोघींमधील हे भांडण टोकालं गेलं आणि शारदाने पतीच्या अनैतिक संबंधाचा राग मनात धरून त्याच्या प्रेयसीचा मुलगा सार्थक (वय तीन वर्ष सहा महिने) याचा खून केला होता.
घरात झोपलेल्या सार्थकला पळवून नेहून धानोरा रोड बीड ते अंकुश नगर बीड जाणाऱ्या रोड वरील पुलाजवळील करपरा नदीच्या पात्रातील पाण्यामध्ये बुडवून त्याचा खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी तिने सार्थकचा मृतदेह करपरा नदीच्या पात्रात फेकून दिला. याप्रकरणी सार्थकच्या आईच्या फिर्यादीवरून शारदा उर्फ शामल श्रीराम शिंदे हिच्या विरुध्द शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता.
या प्रकरणाची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायालयात झाली. संशयित आरोपीविरूध्द गुन्हा सिध्द करण्यासाठी सरकारी पक्षातर्फे एकूण आकरा साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांची साक्ष व घटनास्थळावरील पंचनामा आणि पुराव्याचे अवलोकन करून व सहायक सरकारी वकील अजय तांदळे यांचा युक्तीवाद ग्राहय धरुन प्रमुख न्यायाधिश हेमंत महाजन यांनी आरोपी शारदा शिंदे हिला दहा वर्षांचा सश्रम कारावास व पाचशे रूपयांचा दंड सुवानला. दंड न भरल्यास एक महिना कारावास अशी शिक्षा सुनावली आहे.