Beed News : बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे; सत्ताधारी राष्ट्रवादीच्या आमदारांची लक्षवेधी
Beed News : बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्यावर सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी विधानसभेत लक्षवेधी तक्रार दाखल केली आहे.
Beed News : मागच्या काही दिवसांमध्ये बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी स्वरूपाच्या घडामोडींमध्ये वाढ झाली आहे. हत्या, बलात्कार, प्राणघातक हल्ले, गोळीबार त्यासोबतच वाळू माफियांच्या कारवाया आणि जिल्ह्यातील मस्जिद आणि देवस्थानच्या जमिनी बळकावल्याचे प्रकरण यामुळे जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघत असल्याचा आरोप होत आहे. बीडमधील कायदा-सुव्यवस्थेच्या मुद्यावर आता सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना विधानसभेत लक्षवेधी तक्रार दाखल केली.
जिल्ह्यातील या गुन्हेगारी स्वरूपाच्या घटनांबाबत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी गृहमंत्री आणि पोलिस महासंचालकांना पत्र लिहून लक्ष वेधले होते. पंकजा मुंडे नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुद्धा जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या संदर्भात तक्रारी करत आहेत. राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके आमदार संदीप क्षीरसागर व आमदार बाळासाहेब आजबे या तीन आमदारानी बीड जिल्ह्यातल्या कायदा-सुव्यवस्थेचा संदर्भात विधीमंडळ अधिवेशनात लक्षवेधी तक्रार दाखल केली आहे.
विरोधी पक्षांनी जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेची तक्रार करणे स्वाभाविक असले तरी सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदारांनीच लक्षवेधी मांडत आहेत. सत्ताधारी पक्षांकडून जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या तक्रारी करत आहेत तर मग जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेचे राखायची कोणी असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. बीड जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था संदर्भात विधिमंडळात मांडण्यात आलेल्या लक्षवेधी चर्चेत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार,राधाकृष्ण विखे पाटील, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, अभिमन्यू पवार, रवी राणा,राम कदम,आणि मंगेश चव्हाण हे आमदार सहभागी होणार आहेत.
बीडच्या कायदा-सुव्यवस्थेवर विशेष बैठक बोलवा; पंकजा मुंडेंची मागणी
बीड जिल्हयात कायदा आणि सुव्यवस्था पूर्णतः ढासळली असून पोलिसांचा गुन्हेगारांवर कसलाही धाक राहिला नसल्याची टीका भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केली आहे. चोरी-दरोडे, हत्या, हाणामारी, महिलांवर अत्याचार अशा घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. या घटनांमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याची गंभीर दखल घेत फक्त बीडच्या विषयावर विशेष बैठक बोलवावी अशी मागणी पंकजा मुंडे यांनी केली आहे. तलवारी, रिव्हॉल्व्हर अशा घातक शस्त्रास्त्रांचा वापर सर्रास होताना दिसून येत आहे. बीड, परळी, आंबाजोगाई, माजलगांव, गेवराई सहसर्वच तालुक्यात गुन्हेगारांनी उच्छाद मांडला आहे. जिल्हयात पोलिस यंत्रणा आहे की नाही असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला असल्याचे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.