Beed : चालकाचं नियंत्रण सुटल्याने भरधाव कारच्या धडकेत तीन ठार तर चार जण गंभीर जखमी
कार चालकाच्या निष्काळजीपणामुळे रस्त्यालगत उभ्या असलेल्या तिघांचा अपघातात मृत्यू झाला. त्यामुले या परिसरात हळहळ व्यक्त केली जातेय.
बीड: भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात तीन जण ठार झाल्याची घटना बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथे घडली. या अपघातात इतर चार जण गंभीर जखमी झाले आहेत.
अंबाजोगाईहून नातेवाईकांचा अंत्यविधी उरकून कार चालक अलिम शेख आणि दीपक वैजनाथ राजारोशे आपली कार (एमएच 24 व्हीव 2518) मध्ये बसून अहदपूरकडे परत जात होते. कार चालवणाऱ्या अलिम शेख यांचा ताबा सुटल्याने नवाबवाडीकडे जाणाऱ्या दुचाकीस त्याने समोरुन जोराची धडक दिली. त्यानंतर घटनांदूर येथे मुख्य चौकात उभे असलेल्या चौघांना कारने जोराची धडक दिल्याने सौरभ सतीश गिरी(वय 19) लहू बबन काटुळे (वय 30) हे दोघे जागीच ठार झाले. तर रमेश विठ्ठल फुलारी (वय 45) याला उपचारासाठी लातूरला घेऊन जात असताना रस्त्यामध्ये मृत्यू झाला
या अपघातात कार चालक अलिम शेख (वय25), दीपक वैजनाथ राजारोशे (वय 35, रा.अहमदपूर) हे गंभीर जखमी झाले असून त्यांना तात्काळ अंबाजोगाई येथील स्वराती ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हा अपघात एवढा भीषण होता की कारच्या धडकेने रस्त्यालगत असलेले लोखंडी खांब उपटून खाली पडल्याची दृश्यं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. कार चालकाच्या निष्काळजीपणामुळे रस्त्यालगत उभ्या असलेल्या तिघांचा अपघातात मृत्यू झाला. घटनांदूर गावात शोकाकुल वातावरणात संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवून तिघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
या अपघातात मृत्यू झालेले लहू बबन काटूळे हे ऑटोरिक्षा चालक होते. त्याच्या पश्चात आई, वडील आणि दोन भाऊ असा त्यांचा परिवार आहे. तर रमेश विठ्ठल फुलारी यांचा फुलाचा व्यवसाय होता. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, एक मुलगी, दोन मुलं असा त्याचा परिवार असून त्यांच्या एकट्याच्या व्यवसायावरच त्यांचं कुटुंब चालायचं. या अपघातात मृत्यू झालेला सौरभ सतीश गिरी यांचा शेळीपालनाचा व्यवसाय आहे. एकाच गावातील सर्वसामान्य कुटुंबातील तिघांचा अपघाती मृत्यू झाल्याने अंबाजोगाई परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह -
ABP Majha