Balasaheb Thackeray and Iskcon Relation : बाळासाहेबांचा फक्त एक फोन अन् वाचलं ISKCON; काय आहे गोष्ट?
Balasaheb Thackeray and Iskcon Relation : इस्कॉन आणि ठाकरे कुटुंबीयांचं नातं काय? बाळासाहेबांनी वाचवलं होतं इस्कॉन... नक्की काय घडलं होतं त्या दिवशी?
Balasaheb Thackeray and Iskcon Relation : गेल्या काही दिवसांत राज्यात चर्चेत असणारा विषय म्हणजे, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचं बंड. आतापर्यंतची राजकीय परिस्थती पहिली तर राजकारणाचं केंद्रस्थान म्हणजे हिंदुत्व. त्याच हिंदुत्ववादाच्या शर्यतीत अनेक नेत्यांनी अयोध्या दौरे देखील जाहीर केले. अयोध्या दौऱ्यावरून देशात जो तमाशा झाला, तो सर्वांनी जवळून पाहिलाय. राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी अयोध्या दौऱ्याची घोषणा केली आणि एकच घमासान सुरू झालं. उत्तरप्रदेशचे भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी दौऱ्याला विरोध दर्शवला आणि प्रकरण आणखी तापलं. पुढे काहीच दिवसांत आदित्य ठाकरे यांनी सुद्धा अयोध्या दौऱ्याची घोषणा केली आणि संपूर्ण विषयाची रंगत वाढली.
संपूर्ण देशाचं लक्ष होतं, ते राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याकडे. मात्र अचानक एकेदिवशी राज ठाकरे यांनी एक फेसबुक पोस्ट टाकली. अयोध्या दौरा स्थगित केल्याची ही पोस्ट होती. त्यानंतर पुण्यात झालेल्या सभेत त्यांनी याचा उलगडा करत ब्रिजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावेळी मनसैनिकांविरोधात एक कट रचल्याचं सांगितलं आणि सर्वांच्याच भुवया उंचावल्या. त्यांच्या मते मनसेच्या कार्यकर्त्यांना उत्तरप्रदेशात अटक करण्याचा तो कट रचला होता.
एकीकडे राज ठाकरे यांचा दौरा रद्द झाला असला तरी आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) मात्र 15 जून 2022 रोजी अयोध्येत पोहोचेल. या दौऱ्यात अधोरेखित करण्यासारखा क्षण म्हणजे, आदित्य ठाकरेंनी इस्कॉन मंदिराला दिलेली भेट. भेटीनंतर इस्कॉनचे पंडित ABP माझाच्या प्रतिनिधींशी बोलताना म्हणाले की, ठाकरे कुटुंब आणि इस्कॉनचं जुनं नातं आहे आणि बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्यामुळे आज इस्कॉन देशभरात उभं आहे. हे ऐकून अनेकांना प्रश्न पडला की, इस्कॉनचे ते पंडित असं का म्हणाले? काय आहे या मागची कहाणी? काय आहेत इस्कॉन (ISKCON) आणि ठाकरेंचे संबंध?
...1973 सालची गोष्ट
इस्कॉन म्हणजे काय? तर इस्कॉन म्हणजे, International Society For Krishna Consciousness. या संस्थेची स्थापना 1966 साली श्री श्रीला प्रभूपदा यांनी अमेरिकेत केली. योगायोग म्हणजे, शिवसेनेची स्थापनासुद्धा 1966 सालीच झाली. कालांतरानं इस्कॉनचा विस्तार झाला आणि ते जगभरात पोहोचलं. एकट्या भारतात इस्कॉनची 15 मंदिरं तर जगभरात 800 हुन अधिक इस्कॉन सेंटर्स आहेत.
इस्कॉन प्रसिद्ध आहे, ते या संस्थेमार्फत होणाऱ्या समाजकार्यासाठी. गाईचं संरक्षण, अनाथ मुलांचं शिक्षण किंवा बेघरांची भूक भागवणं, अशा अनेक लोकोपयोगी कामांत इस्कॉनचा हातभार गेली अनेक दशकं आहे.
ही गोष्ट आहे, 70च्या दशकाची. इस्कॉनचे संस्थापक श्रीला प्रभूपदा यांनी इस्कॉनच्या विस्तारसाठी मुंबईच्या जुहू भागांत जागा खरेदी केली. आता जुहूमध्ये साधं घर घेणं कुणाला परवडणार नाही, मात्र त्यावेळी जुहू आणि वर्सोवा भाग म्हणजे, अगदी दलदल होतं. त्यांनी जागेचा व्यवहार केला आणि 1973 च्या महिन्यात मंदिराच्या बांधकामाला सुरुवात केली. त्यावेळी तिथं आधी एक छोटंस मंदिर होतं आणि त्याच मंदिराच्या अवतीभवती एक मोठं मंदिर तयार करायचं होतं. प्रमुख गाभाऱ्याला हात न लावता कामाचा प्रारंभ झाला.
मात्र 3 मे रोजी एक घटना घडली. सकाळी मंदिराचं काम सुरू असताना अचानक मुंबई मनपा के वेस्ट वॉर्डच्या काही गाड्या तिथं दाखल झाल्या. जवळपास पन्नास एक कर्मचारी आणि त्यांच्या सोबत हातोडा, फावडं, घमेलं अशा अनेक वस्तू होत्या. इतकंच कमी होतं की, काय त्यांच्या पाठोपाठ सांताक्रूझ पोलिसांच्या दोन बसेससुद्धा इस्कॉन परिसरात पोहोचल्या.
बांधकाम सुरू असलेल्या श्री श्री राधा रस बिहारी मंदिरला त्यांनी अनधिकृत घोषित केलं आणि कारवाई सुरू केली. ज्या व्यक्तीकडून जागा विकत घेतली, त्या व्यक्तीनं व्यवहारात गडबड केली होती आणि आता मात्र त्यानंच मुंबई मनपाला इस्कॉनची खोटी तक्रार सुद्धा केली. असं म्हणतात की, तत्कालीन आयुक्तांना हाती घेत त्या व्यक्तीनं हे सगळं घडवून आणलं होतं. मंदिराचं जितकं काम झालं होतं तितकं आता हे मनपाचे कर्मचारी पाडू लागले. कामगार भिंतींवर होतोड्यानं जोरदार प्रहार करत होते.
दुसरीकडे हळूहळू मंदिर परिसरात भाविकांची गर्दी वाढू लागली. मनपा विरोधात त्यांनी जोरदार निदर्शनं केली आणि आंदोलनाला सुरुवात झाली. जमाव वाढू लागला आणि तिकडे मंदिरावर होणारा प्रहार सुद्धा. दरम्यान पोलीस आणि भक्तांमध्ये राडा झाला आणि काहींना पोलिसांनी मारहाण केली. परिस्थिती गंभीर होताच पोलिसांनी अॅक्शन घेतली. सर्व भक्तांना त्यांनी पोलीस बसमध्ये भरलं आणि थेट सांताक्रूझ पोलीस स्टेशनमध्ये नेलं.
सर्व भविकांना पोलिसांनी तुरुंगात कोंबलं. अनेकांच्या डोळ्यात अश्रू होते. आपलं मंदिर पडणार एकच दुःख सर्वांच्याच चेहऱ्यावर ठळक दिसून येत होतं आणि सगळेच आता हतबल झाले होते. सर्वांनीच जणू आशा सोडल्या होत्या.
मात्र हे सगळं होत असताना मंदिर परिसरातील झाडाझुडपांमध्ये मनस्वी दास नावाचा एक गुजराती भक्त लपून बसला होता. सगळं प्रकरण त्यानं आपल्या डोळ्यांनी पाहिलं होतं. त्याला पटकन एक कल्पना सुचली आणि मनस्वीनं जवळचा टेलिफोन बूथ गाठत एक फोन लावला. त्यानं नंबर डायल केला आणि समोर फोन वाजला. तो फोन ज्या बंगल्यावर वाजला त्या बंगल्याचं नाव होतं 'मातोश्री' आणि ज्यांनी फोन उचलला ती व्यक्ती म्हणजे, बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे. शिवसेना त्यावेळी 9 वर्षांचा पक्ष होता आणि बाळासाहेब स्वतः फोन उचलायचे. पुढे मनस्वी दास यांनी बाळासाहेबांना सगळं प्रकरण समजावून सांगितलं आणि बाळासाहेब चांगलेच खवळले. त्यांनी तत्काळ मुंबईच्या आयुक्तांना फोन लावला आणि कारवाईचा जाब विचारला. आयुक्त स्वतः सामिल असल्यानं त्यांनी बाळासाहेबांना उत्तरं देणं टाळलं. मात्र बाळासाहेबांनी त्याला तिथंच टोकलं आणि एकच म्हणाले की, Remember, the city belongs to whom... म्हणजेच..."लक्षात ठेव, हे शहर कुणाचंय..." आणि फोन ठेवला.
पुढे 20 एक मिनिटांनी सांताक्रूझ पोलीस ठाण्यात हालचालींना वेग आला. तुरुंगात असलेल्या भाविकांनी पोलिसांनी पुन्हा जुहूला इस्कॉन बाहेर सोडलं. ते भाविक पुन्हा गोंधळले पण जुहूला गाडीतून उतरताच ते अवाक झाले. त्याचं कारण म्हणजे, जाताना ज्या ठिकाणी मनपाच्या गाड्या आणि पन्नास एक कामगार होते. तिथं आता कुणीच नव्हतं. आत जाऊन पाहिलं तर मंदिराचं छप्पर थोडं तुटलं होतं पण गाभारा आणि देवाची मुर्ती सुखरूप होती.
त्यांच्यापैकी कोणालाच माहिती नव्हती की, काय झालं. पण काही वेळानं मनस्वी दास यांनी त्यांना बाळासाहेब ठाकरे यांनी केलेल्या मदतीबाबत सांगितलं आणि इस्कॉन परिसरात बाळासाहेब ठाकरेंच्या नावाचा जयघोष झाला.
बाळासाहेबांचं निधन आणि इस्कॉन
2012 साली जेव्हा बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं. त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांचं पार्थिव शिवाजीपार्कवर दर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. त्यावेळी इस्कॉनच्या पंडितांनी शिवजीपार्कवर बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना म्हणून भजन केलं आणि त्यांनी केलेल्या मदतीचे आभार मानले होते.