Bacchu Kadu : ठाणेदार बिना पैशाचं काम करत नाही, चारित्र्याचा दाखला मिळवण्यासाठी 100 रुपये घेतात; 'देवाचान्याय' ट्रेंडवरुन बच्चू कडूंची टीका
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर प्रकरणानंतर 'देवाचान्याय' असं एक्स प्लॅटफॉर्मवर ट्रेंड सुरु आहे. यावर भाष्य करताना बच्चू कडू यांनी शेलक्या शब्दात टीका केलीय.
Maharashtra Politics नागपूर : आगामी विधानसभा निवडणुकीत आम्ही महाशक्ती म्हणून समोर जाणार असून 288 जागांवर लढणार आहोत. छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) येथील बैठक झाल्यावर जागा वाटपाची रचना केली जाणार आहे, अशी माहिती प्रहार पक्षाचे सर्वेसर्वा आणि आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी दिली आहे. ते नागपूर येथे बोलत होते. त्यामुळे आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) महाशक्ती म्हणून आगामी निवडणुकांना समोर जाण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला आहे.
दरम्यान, त्यांनी महायुती आणि भाजपच्या नेत्यांवरही टीका केली आहे. सोबतच आमची महाशक्ती आहे, त्यात युती नाही, अन् नाही आघाडी. त्यामुळे सरकार हम बनायेंगे असे म्हणत राज्यात आमचे सरकार सत्तेत येईल असा दावाही आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी केला आहे. तर बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे (Akshay Shinde) याचा एन्काऊंटर प्रकरणानंतर 'देवाचान्याय' असं एक्स प्लॅटफॉर्मवर (आधीचे ट्विटर) ट्रेंड सुरु आहे. यावर भाष्य करताना बच्चू कडू यांनी शेलक्या शब्दात टीका केली आहे.
चारित्र्याचा दाखला मिळवण्यासाठी पोलीस 100 रुपये सुद्धा घेतात- बच्चू कडू
बदलापूर लैंगिक प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे (Akshay Shinde) याचा काल पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत मृत्यू झाला. या खळबळजनक घटनेनंतर विरोधकांनी पोलीस आणि राज्य सरकारवर प्रश्न उपस्थित केले आहेत. तर दुसरीकडे सोशल मीडियावर अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणाचं समर्थन करण्यात येत आहे. बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर प्रकरणानंतर 'देवाचान्याय' असं एक्स प्लॅटफॉर्मवर (आधीचे ट्विटर) ट्रेंड सुरु आहे. देशभरातील एक्सवर ट्रेंडमध्ये देवाचान्याय पहिल्या क्रमांकावर असल्याचं दिसून येत आहे. बदलापूर एन्काऊंटर प्रकरणानंतर सोशल मीडियावर एन्काऊंटरचं जोरदार समर्थन करण्यात येत आहे. तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर हजारो पोस्ट केल्या जात आहेत.
या विषयी भाष्य करताना बच्चू कडू म्हणाले की, आज राज्यातील पोलीस स्टेशनमध्ये बघितलं तर 75 टक्के ठाणेदार बिना पैशाचं काम करत नाही, अशी राज्याची स्थिती आहे. महाराष्ट्र सोडा नागपूर येथील पोलीस बघितली तर किती लोकांना त्रास होतो, कशी कारवाई होते, यावर एखांद्याने पीएचडी करावी. राज्यातील कुठल्याही मंत्र्याचं महाराष्ट्रात वचक नाही. अशी बोचरी टीका बच्चू कडू यांनी केलीय. किंबहुना चारित्र्याचा दाखला मिळवण्यासाठी पोलीस 100 रुपये सुद्धा घेतात, असा आरोपही त्यांनी यावेळी केलाय. बदलापूर लैंगिक प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा जो एन्काऊंटर झाला, तो कधी झाला मला त्याची कल्पना नाही. आम्ही गावाकडे शेती करत असतो टिव्ही पाहत नाही. असे म्हणत बच्चू कडू यांनी यावर अधिक बोलणे टाळले आहे.
हेतू चांगला असेल तर कधी कधी नियम बाजूला ठेवावे लागतात- बच्चू कडू
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संस्थेला शासकीय भूखंड देण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. अजित पवार यांचे अर्थ खात आणि राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या महसूल खात्याचा विरोध असूनही बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्याशी संबंधित असलेल्या 'महालक्ष्मी जगदंबा संस्थान, कोराडी' या संस्थेला तंत्रशिक्षण आणि नर्सिंग महाविद्यालय उभारण्यासाठी पाच हेक्टरचा भूखंड बहाल करण्यात आला आहे. रेडीरेकनर दरानुसार या भूखंडाची किंमत तब्बल पाच कोटी इतकी असल्याचे सांगितले जाते. मात्र, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संस्थेला हा कवडीमोल दरात देण्यात आल्याने वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. अशातच या प्रकरणावर भाष्य करताना आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) म्हणाले की, हेतू चांगला असेल तर कधी कधी नियम बाजूला ठेवावे लागतात. अशा कितीतरी जागा काँग्रेस आणि भाजपवाल्यांनी बळकवल्या असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केलाय.
हे ही वाचा