धक्कादायक! शाळकरी मुलांमध्ये झालेल्या भांडणातून विद्यार्थ्याचा मृत्यू; औरंगाबादच्या दौलताबादची घटना
Aurangabad : विद्यार्थ्याच्या पालकाने दिलेल्या तक्रारीवरून चार अल्पवयीन विद्यार्थ्यांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Aurangabad School Children Fight : औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, वर्गात बसण्याच्या कारणावरुन शाळकरी मुलांमध्ये झालेल्या भांडणातून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आला आहे. सहाव्या वर्गातील विद्यार्थ्यांमध्ये भांडण झाले होते, तर या भांडणात चार विद्यार्थ्यांनी केलेल्या मारहाणीत एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असल्याची घटना घडली आहे. औरंगाबाद शहरापासून जवळ असलेल्या दौलताबाद येथे हा प्रकार समोर आला आहे. दरम्यान मयत विद्यार्थ्याच्या पालकाने दिलेल्या तक्रारीवरुन चार अल्पवयीन विद्यार्थ्यांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कार्तिक गायकवाड (वय 11 वर्षे) असं मयत मुलाचं नाव आहे.
अधिक माहिती अशी की, दौलताबाद येथील देवगिरी विद्यालयातील सहावीच्या वर्गात कार्तिक मनोहर गायकवाड त्याच्या बहिणीसोबत शिक्षण घेत होता. दरम्यान 6 जुलै रोजी सकाळी साडेदहा वाजता शाळेतील वर्गखोलीत बाकड्यावर बसण्यावरुन त्याचा एका वर्गमित्राशी वाद झाला. त्यानंतर मधल्या सुट्टीत शाळेच्या मैदानावर कार्तिक खेळताना त्याचा वर्गमित्र आणि इतर वर्गातील तीन विद्यार्थी असे चार जणांनी कार्तिक गायकवाड याला गाठून बेदम मारहाण केली. मारहाण केल्यावर हे चारही जण निघून गेले.
या मारहाणीनंतर त्या दिवशीपासून कार्तिक पोटात दुखत आहे, असे म्हणून शाळेत जात नव्हता. 11 जुलै रोजी अधिक त्रास होत असल्याने, त्याचे वडील मनोहर गायकवाड यांनी त्याला अब्दीमंडी येथील खासगी दवाखान्यात दाखवले. परंतु, पोटदुखीचा त्रास काही कमी होत नव्हता. त्यानंतर त्याला पुढील उपचारांसाठी कन्नड येथील खासगी दवाखान्यात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मोठ्या दवाखान्यात उपचारासाठी नेण्याचे सांगितले. दुसऱ्या दिवशी त्यांनी कार्तिकला छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचारादरम्यान कार्तिक गायकवाड याचे 14 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास निधन झाले. याप्रकरणी कार्तिकचे वडील मनोहर गायकवाड यांनी बुधवारी दौलताबाद पोलिसांत फिर्याद दिली.
तात्काळ शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय
कार्तिकच्या पोटात दुखत असल्याने त्याला खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे सोनोग्राफीची सोय नसल्यामुळे 12 जुलै रोजी शहरातील शासकीय घाटी रुग्णालयात आणण्यात आले. घाटी रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासणी करुन तात्काळ शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. शस्त्रक्रियेनंतर उपचार सुरु असताना 13 जुलै रोजी त्याचा मृत्यू झाला. घाटी रुग्णालयात उपचार घेताना मृत्यू झालेल्या कार्तिकचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. या शवविच्छेदन अहवालात पोटात मार लागल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच वडिलांनीदेखील याबाबत तक्रार दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
पाळणा हलला! संभाजीनगरमधील सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयातील ‘समृद्धी’ने दिला बछड्यास जन्म