Ashadhi Wari 2022 : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वारकऱ्यांना शुभेच्छा, दिला खास संदेश
Ashadhi Wari 2022 : आषाढी यात्रेसाठी पंढरी सजली असून आज सर्व पालख्यांचं पंढरपुरात (Pandharpur) आगमन होणार आहे. रविवारी एकादशी आहे, त्यासाठी पंढरीत लगबग सुरु आहे.
Ashadhi Wari 2022 : आषाढी यात्रेसाठी पंढरी सजली असून आज सर्व पालख्यांचं पंढरपुरात (Pandharpur) आगमन होणार आहे. रविवारी एकादशी आहे, त्यासाठी पंढरीत लगबग सुरु आहे. त्याच पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी महाराष्ट्रातील लाखो वारकरी व भाविकांना शुभेच्छा दिल्या आहेत. माढा लोकसभेचे संघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjitsingh Naik-Nimbalkar) यांच्यामार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिखित स्वरूपात विशेष संदेश दिला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सर्व वारकऱ्यांना आणि भाविकांना शुभेच्छा दिल्यात.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काय म्हटलेय पत्रात?
लाखो वारकरी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने पायी चालत पंढरपूर या संत नगरीमध्ये आले. आषाढी एकादशीला आलेल्या सर्वांना माझ्याकडून मनःपूर्वक शुभेच्छा देत आहे. लाखो भाविक या पंढरपूरमध्ये आले आहेत. आजही देशात सर्वात मोठे श्रद्धास्थान असलेल्या विठ्ठलाच्या पंढरपूरमध्ये आलेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळा प्राचीन काळापासून चालत आलेल्या या सोहळ्यात लाखो भाविक आले आहेत. या सर्वांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेले पंढरपूर विठ्ठल मंदिर व बहुतांश पालखी महामार्ग माढा लोकसभा मतदारसंघात येत असल्याने वारकऱ्यांसाठी या भागाचे प्रतिनिधित्व करणारे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून वारकरी व विठ्ठल भक्तांना शुभेच्छा पाठवल्या आहेत.
पाहा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पत्र -
वारकऱ्यांची पंढरीत लगबग -
आळंदी आणि देहू वरून निघालेले लाखो वारकरी आता पंढरपूर मध्ये दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. वारकरी आता चंद्रभागेमध्ये स्नान करून पुढे नामदेव पायरीच दर्शन घेत आहेत. विठुरायाच्या भेटीची आस मनामध्ये घेऊन हे वारकरी चालत पंढरपूर पर्यंत पोहोचले आहेत. नामदेव पायरी बरोबरच ते आता आपल्या विठुरायाचे देखील दर्शन घेणार आहेत.
एनडीआरएफचे पथकं चंद्रभागेमध्ये तैनात -
पंढरपूरमध्ये विठुरायाच्या दर्शनासाठी दाखल झालेले वारकरी अगोदर चंद्रभागेमध्ये स्नान करतात आणि नंतरच विठुरायाच्या दर्शनासाठी दर्शन रांगेत उभे राहतात. वारकऱ्यांना स्नान करण्यासाठी स्वच्छ पाणी मिळावं म्हणून चंद्रभागेमध्ये दुथडी भरून स्वछ पाणी सोडण्यात आले आहे. वारकऱ्यांबरोबरच काही हुलडबाज तरुण देखील चंद्रभागेमध्ये स्नान करण्यासाठी येतात आणि यावेळी काही अवचित प्रकार घडू नये म्हणून एनडीआरएफचे पथकं चंद्रभागेमध्ये तैनात करण्यात आली आहेत. वारकऱ्यांच्या सुरक्षतेसाठी 24 तास ही पथक चांद्रभागेमध्ये गस्त घालत आहेत. चंद्रभागेच्या पाण्यामध्ये कोणीही हुल्लडबाजी करू नये असे आव्हान एनडीआरएफच्या पथकाने केल आहे..