CM Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदे आज पंतप्रधान मोदींना भेटणार, या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता
CM Eknath Shinde Meets PM Modi today: आज मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस पंतप्रधान मोदींची भेट घेणार आहेत. काल त्यांनी अमित शाह यांची भेट घेतली
CM Eknath Shinde Meets PM Modi today: महाराष्ट्रातल्या सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे काल दिल्लीत दाखल झाले. काल दोन्ही नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. रात्री नऊच्या सुमारास सुरु झालेली बैठक मध्यरात्री दोनपर्यंत सुरु होती. विशेष म्हणजे शिंदे आणि फडणवीस हे दोन्ही नेते वेगवेगळ्या कारनं शाहांना भेटण्यासाठी पोहोचले. आज मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस पंतप्रधान मोदींची भेट घेणार आहेत. अमित शाह यांच्यासोबतच्या भेटीत मंत्रिमंडळ विस्तार तसेच कायदेशीर लढ्याबाबत चर्चा झाल्याची शक्यता आहे. आज पंतप्रधान मोदी यांच्यासोबत बैठकीत देखील या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिल्लीत गृहमंत्री अमित शाह (Amit Shah ) यांची भेट घेतली. यावेळी अमित शाह यांनी दोघांनाही शुभेच्छा दिल्या आहेत. अमित शाह यांनी या भेटीचे फोटो ट्वीट केले आहेत. ट्वीट करत शाह यांनी म्हटलं आहे की, 'महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज भेट झाली. दोघांनाही शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पूर्ण निष्ठेने जनतेची सेवा करतील आणि महाराष्ट्राला नव्या उंचीवर घेऊन जातील असा विश्वास आहे'.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कालपासून दौन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर आहेत. मुख्यंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर एकनाथ शिंदे यांचा हा पहिलाच दिल्ली दौरा आहे.
मुख्यमंत्री दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी आज पंतप्रधान मोदी यांच्यासह देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची देखील भेट घेणार आहेत. त्यानंतर ते दिल्लीहून थेट पुण्याला येतील. पुण्याहून मुख्यमंत्री पंढरपूरला जाणार आहेत. तिथे उद्या आषाढी एकादशीनिमित्त त्यांच्या हस्ते आषाढीनिमित्त विठ्ठलाची पूजा होईल.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्लीतून रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास पुणे विमानतळावर पोहचतील असं सांगण्यात आलं आहे. पुणे विमानतळावरून ते आषाढी एकादशीनिमित्त करण्यात येणाऱ्या शासकीय पुजेसाठी पंढरपूरला रवाना होतील.