(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ashadhi Wari 2022 : तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज तर ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं उद्या प्रस्थान
Ashadhi Wari 2022 देहूमधून संत तुकाराम महाराज आणि आळंदीहून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी वारी पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी लाखो वारकरी विठूनामाचा गजर करत देहू आळंदीत दाखल झाले आहेत.
Ashadhi Wari 2022 : देहूमधून आज संत तुकाराम महाराज यांच्या 337 व्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान होणार असून संध्याकाळी साडेसहा वाजता हा पालखी सोहळा होणार आहे. इनामदार वाड्यात पालखी पहिला मुक्काम करणार आहे. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षापासून पंढरपूरची वारी स्थगित करण्यात आली होती. मात्र यावर्षी कुठलेही निर्बंध न लावता पंढरपूरची वारी होत असल्याने देहूमधून संत तुकाराम महाराज आणि आळंदीहून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी वारी पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी लाखो वारकरी विठूनामाचा गजर करत देहू आळंदीत दाखल झाले आहेत.
देहू येथून आज संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान होणार असून उद्या आळंदीतून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान पंढरपूरच्या दिशेने होणार आहे. या दोन्ही पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होणाऱ्या वारकर्यांनी देहू आणि आळंदीच्या इंद्रायणी तीरावर गर्दी केली आहे.
देहूतून संत तुकाराम महाराजांची पालखी प्रस्थान करणार असल्याने देहू गावांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आलं आहे. पहाटे पाच वाजता संत तुकाराम महाराज शाळा मंदिर या ठिकाणी श्री विठ्ठल रखुमाई यांची महापूजा करण्यात आली तर सहा वाजता वैकुंठ अर्थाने ते संत तुकाराम महाराज यांची पूजा देखील करण्यात आली, तर दुसरीकडे सकाळी सात वाजता तपोनिधी नारायण महाराज समाधी येथे देव संस्थानचे अध्यक्ष पालखी प्रमुख विश्वस्त आणि वारकरी भाविक भक्तांच्या हस्ते पूजा देखील करण्यात आली. सकाळी 10 ते 1 दरम्यान रामदास महाराज मोरे यांचे पालखी प्रस्थान सोहळ्यात काल्याचे किर्तन होणार असून सकाळी नऊ ते अकरा या वेळेस इनामदार वाड्यात संत तुकाराम महाराजांचे पादुका पूजन देखील केले जाणार आहे.
या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून पाणी पुरवठा विभाग, आरोग्य विभाग, अतिक्रमण विभाग आणि स्वच्छता विभाग सेवा देणार असून वारकऱ्यांना शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था देखील करण्यात आल्याचं मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी सांगितलं आहे.
ज्ञानेश्वर महाराजांच्या अश्वाचं आज अलंकापुरीत आगमन
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे उद्या प्रस्थान होणार असून त्यासाठी माऊलीच्या पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी बेळगावच्या अंकली येथील श्रीमंत ऊर्जितसिंह शितोळे सरकार यांच्या वतीने माऊलींचे मानाचे हिरा आणि मोती हे दोन अश्व आज सायंकाळी पाच वाजता श्री क्षेत्र आळंदीत विठू नामाच्या गजरात दाखल होणार असून मध्यरात्रीनंतर पालखी सजावटीला प्रारंभ होणार आहे