निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहमदनगरमधून 84 लाख तर सोलापुरातून 23 लाखांची रोकड जप्त
अहमदनगर आणि सोलापुरातून जवळपास 1 कोटीहून अधिकची रक्कम जप्त करण्यात आली आहे. ही रक्कम कशासाठी आली होती याचा तपास पोलीस करत आहेत.
अहमदनगर/सोलापूर : ऐन निवडणुकीच्या काळात अहमदनगर आणि सोलापुरातून जवळपास एक कोटींहून अधिकची रोकड पोलिसांनी जप्त केली आहे. अहमदनगर शहरात तब्बल 84 लाख रुपयांची रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे. अहमदनगर शहरातील वैदूवाडी परिसरात रिक्षातून 84 लाख रुपये येत असल्याची गुप्त माहिती तोफखाना पोलिसांना मिळाली या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली आहे.
दरम्यान ही रक्कम इथे कशासाठी आणली याची कोणतीही माहिती उपलब्ध झालेली नाही. दरम्यान आयकर विभागाचे पथक देखील घटनास्थळी पोहोचले असून ही सर्व रक्कम आयकर विभागाकडे सुपूर्द करण्यात आली आहे. ऐन निवडणुकीच्या काळात एवढी रक्कम कुठून आली याचा तपास आता आयकर विभाग करत आहे.
तर दुसरीकडे सोलापूरमध्येही 23.5 लाखांची रोकड पोलिसांनी जप्त केली आहे. कामती पोलिसांनी नाकाबंदीदरम्यान ही कारवाई केली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.