Amphotericin B: वर्ध्यात आता रेमडेसिवीरनंतर 'अम्फोटेरिसिन बी' इंजेक्शन बनवण्याची मंजुरी
वर्ध्यात रेमडेसिवीरनंतर अम्फोटेरिसिन बी हे इंजेक्शन बनवण्याची देखील मंजुरी मिळाली आहे. महाराष्ट्र सरकारच्या वतीने अम्फोटेरिसिन बी उत्पादनास परवानगी मिळाली असल्याचे जेनेटिक लाईफ सायन्सेस कंपनीचे संचालक डॉ. महेंद्र क्षीरसागर यांनी ही माहिती दिली आहे.
वर्धा : कोरोना काळात महत्वाचं ठरलेल्या रेमडेसिवीरचं उत्पादन वर्ध्यात सुरु झालं आहे. आता वर्ध्यात रेमडेसिवीरनंतर अम्फोटेरिसिन बी हे इंजेक्शन बनवण्याची देखील मंजुरी मिळाली आहे. महाराष्ट्र सरकारच्या वतीने अम्फोटेरिसिन बी उत्पादनास परवानगी मिळाली असल्याचे जेनेटिक लाईफ सायन्सेस कंपनीचे संचालक डॉ. महेंद्र क्षीरसागर यांनी ही माहिती दिली आहे. येत्या 15 दिवसात या इंजेक्शन बनवण्याची प्रक्रियेला सुरुवात होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
अम्फोटेरिसिन बी हे इंजेक्शन ब्लॅक फंगसवर उपयोगी आहे. लवकरच उत्पादनाला सुरुवात होणार असून केवळ 1200 ते 1400 रुपयात हे इंजेक्शन उपलब्ध होणार आहे, असं डॉ. महेंद्र क्षीरसागर यांनी सांगितलं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नांनी या इंजेक्शनचे उत्पादन करण्यास परवानगी मिळाली. नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने अम्फोटेरिसिन बी औषधाची निर्मिती येथे होणार आहे. दररोज 20 हजार इंजेक्शन येथे तयार होणार असल्याची माहिती डॉक्टर क्षीरसागर यांनी दिली आहे.