अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण मागील सरकारने दाबलं; कुटुंबियांचा आरोप
माझ्या पतीच्या आत्महत्येची मुद्द्यावर बोलण्याऐवजी सातबाऱ्याचा मुद्दा उपस्थित केला जातो. जमिनी विकणे हा गुन्हा आहे का? तो आमचा व्यवसायच आहे, असं अक्षता नाईक यांनी म्हटलं.
मुंबई : मनसुख हिरण मृत्यू प्रकरण विधीमंडळात गाजल्यानंतर अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणदेखील पुन्हा चर्चेत आलं होतं. अन्वय नाईक यांच्या कुटुंबियांनी आज पत्रकार परिषद घेत विरोधी पक्षाच्या भूमिकेवर टीका केली. मागील सरकारने वडिलांचं (अन्वय नाईक) आत्महत्या प्रकरण दाबलं असल्याचा पुन्हा आरोप केला. तर माझ्या पतीच्या आत्महत्येचं प्रकरण बाजूला राहिलं विरोधक त्यांच्या जमीन व्यवहारांवर चर्चा करत आहेत, असं अक्षता नाईक यांनी म्हटलं.
मनसुख हिरण मृत्यूप्रकरणाचा दाखल देत आज्ञा नाईक यांनी म्हटलं की, इथे इतरांना लगेच न्याय मिळत आहे. केवळ संशय असला तरी लगेच (सचिन वाझे) बदल्या केल्या जात आहेत. कारवाई होत आहे. विधानसभा पूर्ण हादरवली जात आहे. मग आम्हालाच न्याय का नाही मिळत. तुम्ही अंबानी असाल तरच न्याय मिळणार का? आमच्या प्रकरणात तर सुसाईड नोट आहे, मग या न्यायव्यस्थेला काय अर्थ? असा सवाल आज्ञा नाईकने विचारला. सुप्रीम कोर्टाने फक्त अंतरिम जामीन दिला आहे, निकाल नाही. मुंबई पोलिसांवर आमचा विश्वास आहे, असं आज्ञा नाईक यांनी म्हटलं.
आम्हाला धमक्या दिल्या जात आहेत?
आम्हाला धमक्या येत आहेत. प्रभादेवीमध्ये मारणार, बघतोच तुझा व्यवसाय होतो, आताच कुठे खेळ सुरू झालाय, अशा धमक्या दिल्या जात आहेत. हे प्रकरण दाबलं हे नक्की मात्र त्याची चौकशी करावी. मागील सरकारची पूर्णपणे चौकशी व्हायलाच हवी, असं आज्ञा नाईक यांनी म्हटलं.
मागच्या सरकारने अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण दाबलं
माझ्या पतीच्या आत्महत्येची मुद्द्यावर बोलण्याऐवजी सातबाऱ्याचा मुद्दा उपस्थित केला जातो. जमिनी विकणे हा गुन्हा आहे का? तो आमचा व्यवसायच आहे, असं अक्षता नाईक यांनी म्हटलं. जमिनी विकण्याचा आमचा व्यावसायिक मुद्दा आहे. त्याचा आणि आत्महत्या प्रकरणाचा काहीही संबंध नाही. आठ वर्षांपूर्वी हा व्यवहार झाला होता. मागच्या सरकारने अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण दाबलं आहे, असा आरोप अक्षता नाईक यांनी केला. सरकारने SIT नेमायला उशीर केलाय, पण देर आये दुरुस्त आये. आता मात्र न्याय मिळावा ही अपेक्षा आहे. गरज पडली तर मुख्यमंत्र्यांना नक्कीच भेटणार, असंही अक्षता नाईक यांनी सांगितलं.
अन्वय नाईक प्रकरणात माझी चौकशी करा
अन्वय नाईक प्रकरणात माझी चौकशी करा, असं खुलं आव्हान देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला काल दिलं होतं. "मी त्यांना खुलं आव्हान दिलं आहे. अन्वय नाईक प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय समोर आल्यानंतर मुंबई पोलिसांचं थोबाड अक्षरश: काळं झालं आहे. जो तपास केला, त्यावर ताशेरे ओढले ते गृहमंत्री विसरले वाटतं. गृहमंत्र्यांनी हा तपास पुढे नेण्याचा प्रयत्न केला, त्यांनाही हे उत्तर आहे. तरीही त्यांना खुलं आव्हान दिलं आहे, अन्वय नाईक प्रकरणात त्यांनी माझी चौकशी जरुर करावी, पण अन्वय नाईक यांच्या जमिनी कोणी कोणी विकत घेतल्या याचीही चौकशी त्यांनी करावी," अशी मागणी त्यांनी केली.
काय आहे प्रकरण?
पेशाने वास्तूविशारद असलेल्या अन्वय नाईक यांनी अलिबागजवळच्या कावीर गावात 5 मे 2018 रोजी आत्महत्या केली होती. अर्णब गोस्वामी यांनी पैसे थकवले असून नैराश्येत आत्महत्या करत असल्याचा आरोप अन्वय नाईक यांनी आत्महत्यापूर्वी लिहिलेल्या पत्रात लिहिलं होतं. या प्रकरणी अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांच्या तक्रारीनंतर अलिबागमध्ये 306 कलमाअंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर 4 नोव्हेंबर रोजी अलिबाग पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना अटक केली. कोर्टाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.