Anna Hajare : वाईन विक्रीच्या निर्णयाविरोधात अण्णा हजारेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र, 14 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राज्य सरकारच्या वाईन विक्रीच्या निर्णयावर संताप व्यक्त केला आहे. याविरोधात येत्या 14 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा दिला त्यांनी दिला आहे.
![Anna Hajare : वाईन विक्रीच्या निर्णयाविरोधात अण्णा हजारेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र, 14 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण Anna Hazare letter to CM against wine sale decision, will go on hunger strike from February 14 Anna Hajare : वाईन विक्रीच्या निर्णयाविरोधात अण्णा हजारेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र, 14 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/31/a56bfb0018430447a3653ffd82d89577_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Anna Hajare : राज्य सरकारने सुपरमार्केटमध्ये वाईन विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावर अनेकांनी टीका केली आहे. अशातच या निर्णयाविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी देखील संताप व्यक्त केला आहे. किराणा दुकानांतून वाईन विक्रीला परवानगी देण्याच्या निर्णयाविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आता थेट बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. याबाबत अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहले आहे. यामध्ये त्यांनी येत्या 14 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा दिला आहे. 14 फेब्रुवारीपासून राळेगणसिद्धी येथील यादवबाबा मंदिरात आमरण उपोषण सुरू करणार असल्याचे या पत्रात सांगण्यात आले आहे.
अण्णा हजारेंनी नेमकं काय म्हटलंय पत्रात
काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने वाईन विक्रीसंबंधी जो धोरणात्मक निर्णय घेतला आहे, त्यानुसार सुपरमार्केट आणि किराणा दुकानांमधून वाईन विक्री सुरू करणे महाराष्ट्रासाठी अतिशय दुर्दैवी आहे. केवळ राज्याचा वाढणारा महसूल आणि वाईन उत्पादक आणि विक्रेते यांचे हित पाहून हा निर्णय घेतल्याचे दिसून येते. पण या निर्णयामुळे लहान मुले तरुण व्यसनाधीन होऊ शकतो. महिलांना त्रास होऊ शकतो याचा विचार सरकारने केलेला दिसत नाही, याची खंत वाटत असल्याचे अण्णा हजारे यांनी पत्रात म्हटले आहे. युवा शक्ती ही आमची राष्ट्रशक्ती आहे. ती बरबाद करू पाहणाऱ्या निर्णयाला विरोध करण्याशिवाय पर्याय नाही. वाईन ही दारू नाही असा दुर्दैवी युक्तिवाद सरकारकडून करण्यात येत आहे हेही आश्वचर्यकारक असल्याचे अण्णा हजारे म्हणालेत.
गेल्या काही दिवसांत संपूर्ण महाराष्ट्रातून विविध क्षेत्रातून वाईन विक्रीच्या निर्णयाला कडाडून विरोध होत आहे. राज्यातील 36 जिल्ह्यात भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे संघटन आहे. त्या सर्व कार्यकर्त्यांनी आपणाकडे निवेदन पाठवून जाहीर विरोध दर्शविलेला आहे. तसेच राज्यातील विविध बिगर राजकीय, सामाजिक संघटना आमच्याकडे येत आहेत. चर्चा करीत आहेत. या सर्वांची या निर्णयाविरोधात राज्यभर आंदोलन करण्याची तयारी आहे. तरीही सरकारला जाग येत नसेल तर आंदोलनाशिवाय पर्याय दिसत नाही असे अण्णा हजारे म्हणालेत.
यापूर्वी आपणास या विषयावर दोन पत्रे पाठविली आहेत. तसेच लोकायुक्त मसुदा समितीच्या बैठकाही टाळण्यात येत आहेत. त्यासंबंधीही काही दिवसांपूर्वी पत्रव्यवहार केला आहे. आपणाकडून एकाही पत्राचे उत्तर आलेले नाही. देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी हे आमच्या एकाही पत्राला कधीच उत्तर देत नाहीत. पण आता राज्याच्या मुख्यमंत्र्याकडूनही तसेच घडताना दिसत आहे. मी पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री यांना कधीही वैयक्तिक विषयावर पत्र लिहिलेले नाही. व्यापक हिताच्या सामाजिक प्रश्नांवरच मी पत्र लिहित असतो. तरीही त्याचे उत्तर देणे टाळले जात असेल तर सरकारला जनतेच्या हिताशी काही देणेघेणे आहे की नाही? असा प्रश्न उभा राहतो, असे अण्णा हजारेंनी म्हटले आहे.
राज्यभरातील कार्यकर्त्यांच्या व जनतेच्या भावना पाहता वाईन विक्रीचा निर्णय सरकारने मागे घेतला नाही तर आंदोलन करावेच लागेल या निर्णयावर आम्ही आलो आहोत. लवकरच राज्यातील विविध सामाजिक संघटनांच्या समविचारी कार्यकर्त्यांची एक बैठक राळेगणसिद्धी येथे घेण्यात येणार आहे. त्यावेळी आंदोलनाची दिशा ठरविण्यात येईल. सरकारने हा निर्णय तात्काळ रद्द करावा अशी जनतेची मागणी आहे. अन्यथा मला 14 फेब्रुवारी पासून राळेगणसिद्धी येथील यादवबाबा मंदिरात आमरण उपोषण सुरू करावे लागेल असा इशारा अण्णांनी पत्रातून दिला आहे.
लहान बालक ही आमची राष्ट्रीय संपत्ती आहे. या बालकांमध्ये उद्याचे महापुरूष आहेत. सुपरमार्केट आणि किराणा दुकानामध्ये वाईन ठेवली तर ही बालकेसुद्धा व्यसनाधीन होतील आणि ते अधोगतीकडे जातील. आमच्या संस्कृतीचे जतन व्हावे म्हणून आमच्या साधू संतानी, राष्ट्रीय महापुरूषांनी अतोनात प्रयत्न करून संस्कृती जतन करून वाढविण्याचा प्रयत्न केला. मात्र दुकानामध्ये वाईन आली तर ही आमची संस्कृती धुळीला मिळेल. चंगळवादी, भोगवादी संस्कृती वाढीला लागेल. त्यातून काय काय अनर्थ घडतील सांगता येत नाही. ती अधोगतीकडे नेणारी संस्कृती पहायला नको म्हणून 14 फेब्रुवारी 2022 रोजी मी राळेगणसिद्धीमध्ये श्री संत यादवबाबा मंदिरात उपोषण करणार असल्याचे अण्णा हजारेंनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)