Anil Parab : सदावर्तेंनी एसटी कर्मचाऱ्यांकडून अवैधपणे कोट्यवधी रुपये गोळा केले, त्याचा तपास होणार: अनिल परब
Gunratna Sadavarte : सदावर्ते हेच शरद पवारांच्या घरावरील हल्ल्यासाठी जबाबदार असल्याचा आरोप राज्याचे मंत्री अनिल परब यांनी केला आहे.
मुंबई: सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांकडून अवैधपणे पैसे जमा केल्याचा आरोप राज्याचे मंत्री अनिल परब यांनी केला आहे. आता या सर्व प्रकरणाचा तपास करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. पवारांच्या घरावरील हल्ल्यासाठी सदावर्ते हेच जबाबदार असल्याचं अनिल परब म्हणाले.
एसटी आंदोलनातील आंदोलकांकडून अवैधपणे पैसे जमा केल्याबद्दल अकोला जिल्ह्यातील अकोट शहर पोलिसांत फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अॅड. गुणरत्न सदावर्ते, अॅड. जयश्री पाटील, पैसे जमा करणारा औरंगाबादचा अजयकुमार गुजर आणि प्रफुल्ल गावंडेवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष विजय मालोकार यांनी ही तक्रार केली होती.
एसटी कर्मचाऱ्यांकडून 1 कोटी 80 लाख रुपये जमा केले
दरम्यान, आरोपींनी एसटी कर्मचाऱ्यांकडून पैसे जमा केले असल्याची माहिती सरकारी वकिलांनी कोर्टात दिली आहे. त्यामध्ये प्रत्येक कर्मचाऱ्याकडून 550 रुपये जमा करण्यात आले असून ही रक्कम 1.50 कोटी ते 1.80 कोटी रुपये इतकी असल्याचं सांगितलं जातंय. ही एवढी मोठी रक्कम गेली कुठे, कशासाठी वापरली, ही रक्कम शरद पवारांच्या घरासमोरील आंदोलनासाठी वापरली आहे का याचा तपास करायचा आहे असं पोलिसांच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे.
हा सर्व निधी कुठे गेला, कोणत्या कामासाठी वापरला गेला, तसेच शरद पवारांच्या हल्ल्यासाठी हा निधी वापरला गेला का याचा तपास करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे मंत्री अनिल परब यांनी दिली.
दरम्यान, अॅड गुणरत्न सदावर्ते यांच्या काहीच दिवसांपूर्वी एसटी कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी 1000 रुपये निधी गोळा केला असल्याची चर्चा आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
- Gunratna Sadavarte : पवारांच्या घरावर धडक द्या; सदावर्तेंची नागपूरच्या व्यक्तीशी चर्चा, पत्रकारांनाही पाठवण्याचं झालं होतं बोलणं
- Gunratna Sadavarte : अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना 13 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी, न्यायालयाचा निर्णय
- Gunratna Sadavarte : आज कोर्टात काय घडलं? अॅड. गुणरत्न सदावर्ते आणि आणि सरकारी वकिलांचा युक्तीवाद जसाचा तसा