अमरावतीच्या सावंगी मग्रापूर गावात मागासवर्गीयांनी गाव सोडलं, ग्रामपंचायतीनं 28 दिवसांपासून पाणीपुरवठा बंद केल्याचा आरोप
अमरावतीत गावकऱ्यांना पिण्याचे पाणी मिळत नसल्याने गावकऱ्यांनी गावाच्या वेशीजवळ ठिय्या आंदोलन पुकारले आहे.
अमरावती : अमरावतीच्या जिल्ह्यातल्या सावंगी मग्रापूर या गावातील मागासवर्गीय समाजातील अनेकांनी गाव सोडलाय. त्यांच्या प्रभागात गेल्या 28 दिवसांपासून ग्रामपंचायतीनं पाणीपुरवठा केला नाही, असा त्यांचा आरोप आहे. गावाबाहेरच्या विहिरीजवळ या नागरिकांनी ठाण मांडलंय. उपसरपंचानं जाणीवपूर्वक पाणीपुरवठा बंद केल्याचा त्यांचा आरोप आहे.
अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे तालुक्यातील सावंगी मग्रापूर गावात वार्ड क्रमांक एक मधील गावकऱ्यांना पिण्याचे पाणी मिळत नसल्याकारणाने गावकऱ्यांनी गावाच्या वेशीजवळ ठिय्या आंदोलन पुकारले. बुधवारी रात्री पासून गावावर बहिष्कार टाकला आणि गावाबाहेर आंदोलन सुरु केले. याची माहिती कळताच प्रशासन खळबडून जागे झाले. आंदोलकांनी कालची रात्र गावाच्या वेशीवरच काढली, जो पर्यंत पाणी मिळणार नाही तो पर्यंत आता मागेच हटणार नाही अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली. वार्ड नंबर एकमध्ये आम्ही दलित लोक राहतो म्हणून ग्रामपंचायत सरपंच - उपसरपंच यांनी आमचे नळ कनेक्शन कापले आम्हाला गेल्या 25 दिवसापासून प्यायला पाणी नाही आम्ही कसं जगावं असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.
याप्रकरणी सावंगी मग्रापूरचे उपसरपंच जुरावर पठाण यांनी माहिती दिली की, वस्तीतील पाईप लाईन तोडली त्यामुळे हा प्रकार घडला आणि ग्रामपंचायतीवरील आरोप हे चुकीचे आहे. आता गावात पाईपलाईनचे काम सुरू झाले आहे. मात्र, अद्यापही आंदोलन सुरूच आहे. सध्या प्रशासन आणि आंदोलकांमध्ये चर्चा सुरू असून प्रशासनाकडून तात्पुरती पाईप लाईन टाकून पाणी सुरू करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. आंदोलकांनी मात्र कायमस्वरूपी उपाय करा अशी मागणी केली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या :