Navneet Rana : मोठी बातमी! खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी; अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
Amravati News : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. राणा यांना व्हॉटसअपवर एक क्लिप पाठवून ही धमकी देण्यात आली आहे.
Amravati News : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. राणा यांना व्हॉटसअपवर एक क्लिप पाठवून ही धमकी देण्यात आली आहे. प्राथमिक माहितीनुसार ही धमकी पाकिस्तान अथवा अफगाणिस्तान येथून देण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. या प्रकरणी नवनीत राणा यांचे स्वीय साहाय्यक विनोद गुहे यांनी राजापेठ पोलीस (Amravati Police) ठाण्यात या विषयी माहिती देत तक्रार दाखल केली आहे. तर पोलिसांनी या प्रकरणी धमकी देणाऱ्या अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
धक्कादायक बाब म्हणजे या पूर्वीदेखील असाच प्रकार खासदार नवनीत राणा यांच्यासोबत घडला होता. यात धमकी देण्याऱ्याला पोलिसांनी अटक देखील केली होती. मात्र, पुन्हा असाच प्रकार घडल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. तर पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून धमकी देणाऱ्याचा शोध सध्या घेतला जात आहे.
धमकी देणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल
खासदार नवनीत राणा यांना गेल्या काही महिन्यांपूर्वी अशाच प्रकारे धमकीचे फोन येत असल्याची माहिती पुढे आली होती. या प्रकरणी राजापेठ पोलिसांनी तपासातून श्याम तायवाडे या व्यक्तीला अटक करत त्याच्या मुसक्या आवळल्या होत्या. तेव्हा या तरुणाने आपल्या वडिलांच्या नावावर असलेल्या सिमकार्डचा वापर करत कॉलवर अश्लील शिवीगाळ केली होती. त्यावेळी पोलिसांनी त्याला अमरावतीतील नेरपिंगळाई या ठिकाणाहून अटक केली होती. मात्र, आता आलेला धमकीचा फोन हा पाकिस्तान आणि अफगाणिस्तानावरुन असल्याची प्राथमिक माहिती पुढे आल्याने, पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत तत्काळ गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. या प्रकरणी राजापेठ पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात कलम 354 A, 354 D, 506 (2), 67 नुसार गुन्हे दाखल केला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत धमकी देण्याऱ्याचा शोध घेत आहे.
ओवेसी आणि इम्तियाज जलील यांचा हात- आमदार रवी राणा
या प्रकरणी आमदार रवी राणा यांनी आपली प्रतिक्रिया देत या धमकी प्रकरणी एमआयएमचे प्रमुख असुदुद्दीन ओवेसी आणि इम्तियाज जलील यांच्या सांगण्यावरून हे झालं असल्याचा आरोप केला आहे. खासदार नवनीत राणा यांनी ज्या प्रमाणे संसदेत हिंदुत्वाचा मुद्दा उचलला त्यानंतर अशा धमक्या येत असल्याचे ते म्हणाले. ओवेसी आणि धमकी देणारे यांच्यात काही लिंक आहे का, याचा तपास झाला पाहिजे अशी मागणी देखील रवी राणा यांनी केली आहे. या संदर्भात आम्ही याची तक्रार पोलीस महासंचालक आणि गृहमंत्री यांच्याकडे केली असल्याचे देखील ते म्हणाले.
या पूर्वी देखील धमकीचे फोन
अमरावतीतील नेरपिंगळाई येथील रहिवासी असलेल्या श्याम तायवाडे या तरूणाने खासदार नवनीत राणा यांना कॉल करून धमकी दिली होती. त्यामध्ये त्याने तिवसामधून बोलत असल्याचं सांगितलं होतं. तू गर्दीच्या ठिकाणी जातेस, त्या ठिकाणी तुझ्यावर कधी धारधार चाकूने वार करणार ते तुला माहितीही पडणार नाही असं त्याने त्यावेळी म्हटलं होतं. तसेच या तरूणाने खासदार नवनीत राणा यांच्याबद्दल अश्लील उद्गार काढत शिवीगाळ केली होती. अशा माथेफिरू भामट्याला त्वरित जेरबंद करून त्याच्यावर कठोर कारवाई करावी आणि त्या व्यक्तीचा ताबडतोब शोध घेऊन त्याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी तक्रार खासदार नवनीत राणा यांच्याकडून त्यांच्या स्वीय साहाय्यकांनी राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये दिली होती. पोलिसांनी या प्रकरणाचा तातडीने तपास सुरू केला आणि आरोपीला जेरबंद केलं होतं.
इतर महत्वाच्या बातम्या