हिवाळी अधिवेशन वादळी ठरणार, एसटी संप ते परीक्षांच्या मुद्यांवरुन सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने येणार
२२ ते २८ डिसेंबर यादरम्यान हिवाळी अधिवेशन होणार आहे. शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांमुळे हे अधिवेशन अवघ्या पाचच दिवसांचे असणार आहे. अधिवेशन विविध मुद्यांवरुन वादळी ठरण्याची शक्यता वर्तवली जातेय.
मुंबई : यंदाच्या राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला २२ डिसेंबरला सुरूवात होणार आहे. २२ ते २८ डिसेंबर या दरम्यान हे अधिवेशन होणार आहे. कार्यकाळ जरी सात दिवासांचा वाटत असला तरी शनिवार आणि रविवारमुळे हे अधिवेशन अवघ्या पाचच दिवसांचे असणार आहे. हे अधिवेशन अधिक वादळी ठरण्याची शक्यता वर्तवली जातेय. सध्या विविध मुद्यांवरुन राज्य सरकार विरुद्ध विरोधक असा जोरदार सामना सुरू आहे. अशातच आता पुन्हा एकदा सभागृहात ठाकरे आणि फडणवीस आमने-सामने येणार आहेत. दरम्यान, हे अधिवेशन कोणत्या मुद्यांवरुन वादळी ठरणार ते पाहुयात...
सध्या राज्यात एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीणीकरण करावे या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. अद्याप यावर काही तोडगा निघालेला नाही. या मुद्यांवरुन विरोधक सरकारला चांगलेच धारेवर धरण्याची शक्यता आहे. तसेच ओबीसी आरक्षणाचा मुद्दा देखील सध्या जोरदार चर्चेत आहे. या अधिवेशनात ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरून सर्वच पक्ष एकमेकांना भिडणार आहेत. या मुद्द्यावरून राजकीय राडा बघायला मिळू शकतो. तसेच आरोग्य विभाग असो किंवा म्हाडाची परिक्षा किंवा एमपीएससीची परीक्षा या परीक्षांमध्ये सातत्याने घोळ झालेला पाहायला मिळतो. हा मुद्दाही अधिवेशनात गाजणार असल्याची चर्चा सुरू आहे. तसेच विधानसभा अध्यक्षांची निवडीवर जोरदार चर्चा होण्याची शक्यता आहे. या सर्व मुद्यांवरुन विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात सामना रंगणार आहे.
दरम्यान, बंगळूरु येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर त्याचे पडसाद महाराष्ट्रभर उमटत आहेत. हा मुद्दा महाविकास आघाडी सरकारनं चांगलाच उचलून धरला आहे. या मुद्यावरुन सत्ताधारी भाजपवर निशाणा साधण्याची शक्यता आहे. कारण सध्या कर्नाटकमध्ये भाजपचे सरकार आहे. तसेच या घटनेबाबत कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनीदेखील वादग्रस्त विधान केले आहे. त्यामुळे विरोधक सत्ताधाऱ्यांवर भारी पडण्याआधीच सत्ताधारी विरोधकांवर भारी पडले आहेत. त्यामुळे यंदाच्या अधिवेशनात पहिल्याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणांनी सभागृह दुमदुमणार आहे.
सध्या राज्यावर ओमायक्रॅानचे संकंट घोंगावत आहे, यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे. या अधिवेशनात विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी काँग्रेस आग्रही असणार आहे. नुकत्याच विधानपरिषदेत काही ठिकाणी झालेला महाविकास आघाडीचा पराभव सरकारला चिंतेत टाकणार आहे. याआधी अनिल देशमुख आणि संजय राठोडसारख्या दोन मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागले आहेत, आगामी काळात कोणाचा नंबर लागणार? याचीही चर्चा सुरू आहे.