
Vanchit Bahujan Aghadi : महायुतीत अजितदादा नकोसे झाले? मिटकरींनी बाॅम्ब टाकल्यानंतर वंचित बहुजन आघाडीने पर्याय सांगितला!
वंचित बहुजन आघाडीला अजित पवार गटाकडून खुणावण्यात आल्यानंतर आता वंचित बहुजन आघाडीनेही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. वंचितच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Vanchit Bahujan Aghadi on Ajit Pawar : महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अजित पवार गट आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र आल्यास महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भूकंप होईल, हे दोन गट एकत्र यावेत अशी माझी वैयक्तिक भूमिका असल्याचे वक्तव्य अजित पवार गटाचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी यांनी केल्यानतंर राज्याच्या राजकारणात भूवया उंचावल्या आहेत.
लोकसभा निवडणुकीनंतर महायुतीमध्ये मिळत असलेल्या वागणुकीवरून अजित पवार गटामध्ये संताप पसरला आहे. त्यामुळे अजित पवार यांना नामोहरम करून महायुतीमधून बाहेर पडण्यासाठी कारस्थाने होत असल्याचा आरोप सुद्धा होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर अमोल मिटकरी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे भूवया उंचावल्या आहेत.
युतीमधून बाहेर पडत नाही तोपर्यंत कोणताही विचार नाही
वंचित बहुजन आघाडीला अजित पवार गटाकडून खुणावण्यात आल्यानंतर आता वंचित बहुजन आघाडीनेही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार गट जोपर्यंत भाजप युतीमधून बाहेर पडत नाही तोपर्यंत कोणताही विचार केला जाऊ शकत नसल्याचे रेखा ठाकूर यांनी म्हटलं आहे. त्यामुळे या चर्चेला आता सध्या तरी पूर्णविराम मिळाला आहे.
अजित पवार यांचा गट भाजपच्या युतीमधून बाहेर पडल्याशिवाय सोबत येण्याचा कुठलाही विचार केला जाऊ शकत नाही.
— Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia) June 22, 2024
― रेखाताई ठाकूर
महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष,
वंचित बहुजन आघाडी#VBAForIndia pic.twitter.com/s29w7pmsP8
दुसरीकडे, महायुतीमध्ये अजित पवार काय भूमिका घेणार याची चर्चा लोकसभा निवडणुकीनंतर रंगली आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवार गटाकडून चार जागा लढवण्यात आल्या होत्या. मात्र, रायगड या एका जागेवर विजय मिळवण्यात भाजपला यश मिळाले. बारामतीमध्ये अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. धाराशिव आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात अजित पवार गटाचा पराभव झाला.
त्यामुळे अजित पवारांच्या महायुतीतील समावेशावरून विशेष करून शिंदे गटातून सातत्याने टीका केली जात आहे. भाजपच्या मातृसंस्थांकडूनही अजित पवार गटावर सातत्याने हल्लाबोल केला जात आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपर्यंत महायुती राहणार की नाही? अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर अमोल मिटकरी यांनी केलेलं सूचक वक्तव्य आहे का? अशीही चर्चा रंगली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
