Uddhav Thackeray : भाजप म्हणजे अफवांची फॅक्टरी, मराठी माणसाच्या शक्तीसमोर हिंदी सक्ती हरली; सरकारचा GR रद्द झाल्यानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
Shiv Sena MNS Mumbai Morcha : मराठी माणसांमध्ये फूट पाडायची आणि त्याचा राजकीय फायदा घ्यायचा असा डाव राज्य सरकारचा होता. पण ते अयशस्वी ठरले असं उद्धव ठाकरे म्हणाले.

मुंबई : पहिलीपासून हिंदी भाषा लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने मागे घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंनी त्यावर प्रतिक्रिया दिली. मराठी मारणाच्या शक्तीसमोर या सरकारची सक्ती हरली असं मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं. 5 जुलैला आम्ही विरोधाचा मोर्चा काढणार होतो. पण आता 5 जुलै रोजी काय करायचं, मोर्चा काढायचा की सभा घ्यायची याबद्दल सर्वांशी चर्चा करणार असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.
भाजप अफवांची फॅक्टरी
भाजपकडून खोटी माहिती पसरवली जात आहे, भाजप म्हणजे अफवांची फॅक्टरी असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली. ते म्हणाले की, "राष्ट्रीय शिक्षण धोरण आल्यानंतर आम्ही माशेलकरांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. त्याचा अहवाल आल्यानंतर त्यावर एक अभ्यासगट नेमली. पण त्या अभ्यासगटाची एकही बैठक झाली नाही. मात्र नंतर सरकार पडलं. त्यामुळे भाजपकडून खोटं पसरवलं जात आहे."
मराठी माणसाची एकजूट कायम, 5 जुलैला कार्यक्रम होणारच
एखादे संकट आल्यानंतर मराठी माणूस जागा होतो. पण आता आपण जागे झालोय, एकत्र आलोय. आता मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून हिंदीचा जीआर मागे घेतला गेला. पण आता मराठी माणसाची ही एकजूट कायम राहावी असं उद्धव ठाकरे म्हणाले.
हिंदीच्या विरोधात आम्ही 5 जुलैला मोर्चा काढणार होतो. पण तो मोर्चा आता रद्द झाला तरी त्या दिवशी विजयी मोर्चा काढायचा की आणखी काही कार्यक्रम करायचा यावर चर्चा करू. या संदर्भात ज्यांनी ज्यांनी सहभाग घेतला त्यांच्यांशी चर्चा करणार असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.
राज्य सरकारकडून हिंदीचा जीआर रद्द
पहिलीपासून हिंदी भाषा लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने मागे घेतला आहे. या संदर्भातील दोन्ही जीआर रद्द केल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
राज्यात त्रिभाषा सूत्र लागू करावे की नाही यासाठी डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात येणार आहे. ही समिती माशेलकर समितीचा अभ्यास करणार आणि त्यावर शिफारशी करणार आहे. त्यानंतर राज्यात त्रिभाषा सूत्र लागू करावं की नाही याचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
दरम्यान, राज्य सरकारने हिंदीचा जीआर रद्द केला हा मराठी एकजुटीचा विजय असल्याचं मत संजय राऊत तसेच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केलं.
ही बातमी वाचा:























