बीडमध्ये दोन तरुणांना 20 ते 25 जणांच्या टोळक्याकडून मारहाण, शहरात दहशतीचे वातावरण
Beed News Update : बीडमध्ये दोन तरुणांना 20 ते 25 जणांच्या टोळक्याकडून मारहाण करण्यात आली आहे, या घटनेमुळे शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Beed News Update : बीड शहरातील वर्दळीचे ठिकाण असणाऱ्या सम्राट चौकामध्ये भररस्त्यात दोन तरुणांना 20 ते 25 जणांच्या टोळक्याने लाठी, काठी, लोखंडी रॉड आणि बेल्टने मारहाण केली आहे. यावेळी एक तरुण आपला जीव वाचवण्यासाठी तळघरातील हॉटेलमध्ये घुसला. परंतु, त्याचा पाठलाग करत टोळक्याकडून मारहाण करण्यात आली आहे. ही घटना शुक्रवारी रात्री साडेनऊच्या दरम्यान घडली आहे. मारहाणीचा हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे.
बीड शहरातील सम्राट चौकात एक बियर बार आहे. या बारसमोर शुक्रवारी रात्री पाच मिनिटे ही मारहाण सुरू होती. यावेळी मारहाण करणारं टोळकं तरुणाचा पाठलाग करत त्याला मारहाण करत होतं.
टोळक्याकडून तरूणाला मारहाण सुरू असताना काही तरुणांकडून दगड फेक करण्यात आली. त्यामुळे परिसरातील व्यापाऱ्यांना शटर खाली ओढून दुकाने बंद करावी लागली. यादरम्यान नागरिकांचा मोठा जमाव देखील जमला होता. परंतु, काही वेळाने जखमी तरुण आपला जीव वाचवून तेथून निसटून निघून गेला. त्यानंतर हल्लेखोर तरुणही तेथून निघून गेले. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झालं होतं.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून बीडमध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे बीडमधील कायदा आणि सुव्यवस्थेवर सामान्य नागरिकांकडून प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. बीड शहरात भररस्त्यात वर्दळीच्या ठिकाणी टोळक्याकडून दहशत माजवण्याचा प्रयत्न करण्यात आल्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. शिवाय वारंवार अशा घटना घडू नये यासाठी पोलिसांनी दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
महत्वाच्या बातम्या