(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ramdas Kadam : जिवंत असेपर्यंत भगव्याची साथ सोडणार नाही, संजय राऊतांच्या भेटीनंतर रामदास कदमांचं वक्तव्य
पक्षाशी कधीही बेईमानी करणार नाही, जिवंत असेपर्यंत भगव्याची साथ सोडणार नसल्याचे वक्तव्य शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी केले.
Ramdas Kadam : मी जिवंत असेपर्यंत भगव्याची साथ सोडणार नाही. पक्षाशी कधीही बेईमानी करणार नसल्याचे वक्तव्य शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी केले आहे. मी स्वत: ला डाग कधीच लावून घेणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा, शिवसेना प्रमुखांचा, शिवसेनेचा भगवा झेंडा कायम माझ्या खांद्यावर असेल असे कदम म्हणाले. आज रामदास कदम यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
दरम्यान, भविष्यात भाजपचा भगवा खांद्यावर असू शकतो का? असा प्रसारमाध्यमांनी रामदास कदम यांना प्रश्न विचारला. त्यावेळी ते म्हणाले की, माझ्या खांद्यावर शिवसेनाचा भगवा कायम असेल. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या हिंदुत्वाच्या मुद्यावर देखील रामदास कदम यांना प्रश्न विचारण्यात आला. या मुद्यावर मी काही बोलणार नसल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि रामदास कदम यांच्यात दुरावा आहे. तसेच गेल्या अनेक दिवसांपासून रामदास कदम शिवसेनेत नाराज असल्याच्याही चर्चा सुरु आहेत. त्याच पार्श्वमीवर रामदास कदम यांनी संजय राऊत यांची आज घेतलेली भेट महत्त्वाची मानली जात आहे.
भाजप नेते किरिट सोमय्या यांना दापोलीतील साई रिसॉर्टच्या अनधिकृत बांधकामाबाबत रसद रामदास कदम किंवा इतर कुणी नव्हे तर आपण पुरवली, असा दावा दापोलीतील आरटीआय कार्यकर्ते रिझवान काझी यांनी केला आहे. मागच्या काही दिवसापूर्वी भाजप नेते किरिट सोमय्या यांना दापोलीतील साई रिसॉर्टची माहिती रामदास कदम यांनी पुरवल्याचा आरोप होत होता. यामुळे रामदास कदम आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यात बिनसलं होतं. त्यानंतर रामदास कदम यांनी प्रथमच जाहीरपणे असंतोषाला वाट मोकळी करुन दिली होती. त्यांनी पत्रकार परिषद घेत थेट पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांवरच जोरदार हल्लाबोल केला होता. विशेषतः परिवहन मंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांचा गद्दार असा उल्लेख करत कदम यांनी जोरदार हल्ला चढवला. परब यांनी पक्ष राष्ट्रवादीच्या दावणीला बांधलाय आणि ते शिवसेनेलाच संपवायला निघालेत, असा खळबळजनक आरोप कदम यांनी केला. कदम यांनी मंत्री उदय सामंत, माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्यावरही निशाणा साधला होता.
महत्त्वाच्या बातम्या:
- मशिदींवरील भोंगे हटविण्याचा इशारा ते शरद पवारांवर निशाणा, राज ठाकरेंच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
- बाबरी मशीद पाडली तेव्हा एकही शिवसैनिक उपस्थित नव्हता, मी उपस्थित होतो: देवेंद्र फडणवीस