Abhyudaya Bank : अभ्युदय बँकेच्या कारवाईत राजकीय वास? उद्धव ठाकरेंच्या भेटीच्या चर्चेचा अन् कारवाईचा असाही योगायोग!
Abhyudaya Bank : घनदाट परिवाराकडून काही दिवसांपूर्वीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याची चर्चा होती. 2009 मध्ये परभणीतील गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून ते अपक्ष निवडून आले होते.
मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) शुक्रवारी अभ्युदय सहकारी बँक लिमिटेडचे संचालक मंडळ 12 महिन्यांसाठी बरखास्त केल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान, बँकेच्या कारभाराचे व्यवस्थापन करण्यासाठी RBI ने स्टेट बँक ऑफ इंडियाचे माजी मुख्य महाव्यवस्थापक सत्य प्रकाश पाठक यांची "प्रशासक" म्हणून नियुक्ती केली आहे.
सेंट्रल बँकेने प्रशासकांना कर्तव्याचे पालन करण्यास मदत करण्यासाठी "सल्लागारांची समिती" देखील नियुक्त केली आहे. "सल्लागारांच्या समितीच्या सदस्यांमध्ये व्यंकटेश हेगडे (माजी महाव्यवस्थापक, SBI), महेंद्र छाजेड (चार्टर्ड अकाउंटंट); आणि सुहास गोखले (माजी एमडी, कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँक लि.) यांचा समावेश आहे.
अभ्युदय को-ऑपरेटिव्ह बँक सहकारी बँकांमधील महत्त्वाची बँक
दरम्यान, आरबीआयकडून बँकेवर कोणतेही व्यावसायिक निर्बंध घातलेले नाहीत. त्यामुळे बँकेचे व्यवहार सुरळीत राहणार आहेत. त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. प्रशासकामुळे बँकेच्या कामाकाजावर कोणत्याही प्रकारचा परिणाम होणार नसल्याचे आरबीआयने स्पष्ट केले आहे. अभ्युदय को-ऑपरेटिव्ह बँक ही सहकारी बँकांमधील एक महत्त्वाची बँक आहे. अभ्युदय को-ऑपरेटिव्ह बँकेच्या वेबसाईटनुसार, 31 मार्च 2020 पर्यंत, बँकेकडे 17.30 लाखांहून अधिक ठेवीदार आहेत आणि एकूण ठेवी रु. 10,838 कोटी आहेत. बँकेचे भांडवल पर्याप्तता गुणोत्तर 12.60 टक्के होते. बँकेच्या संकेतस्थळावर 2020 नंतरची माहिती सार्वजनिकपणे उपलब्ध नाही.
अभ्युदय बँकेच्या कारवाईत राजकीय वास?
दुसरीकडे, अभ्युदय बँकेच्या कारवाईत राजकीय वास असल्याची चर्चा रंगली आहे. माजी आमदार सीताराम घनदाट सहकार क्षेत्रातील मोठं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घनदाट परिवाराकडून काही दिवसांपूर्वीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याची चर्चा होती. 2009 मध्ये परभणीतील गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून ते अपक्ष निवडून आले होते. 2020 साली सीताराम घनदाट यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. सध्या घनदाट यांचे चिरंजीव संदीप घनदाट हे अभ्युदय बँकेचे अध्यक्ष आहेत, तर सीताराम घनदाट अभ्युदय बँकेच्या संचालक मंडळावर आहेत. वाघचौरे यांचे शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी नाव अंतिम असताना ही भेट झाली होती, असे बोलले जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या