Municipal Elections : राज्यातील महापालिका निवडणुका दिवाळीनंतरच? प्रभाग रचना, आरक्षण अन् मतदार यादीसाठी तीन महिन्यांचा कालावधी लागण्याचा अंदाज
Municipal Elections : महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतीसाठी प्रभाग रचना करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.

Municipal Elections : राज्यात गेल्या तीन ते चार वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत. त्या निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर आता त्यासंबंधी हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींना प्रभाग रचना करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. यामध्ये पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक, पिंपरी चिंचवड, नवी मुंबई, वसई विरार, छत्रपती संभाजीनगर आणि कल्याण डोंबिवलीसारख्या महापालिकांचा समावेश आहे. मात्र प्रभाग रचना प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी सुमारे अडीच ते तीन महिन्यांच्या कालावधी लागण्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे या निवडणुका यंदा दिवाळीनंतरच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राज्यातील नगरपरिषद आणि महापालिकांच्या प्रभाग रचनेची प्रक्रिया सात टप्प्यांमध्ये राबवली जाते. या प्रक्रियेसाठी अडीच ते तीन महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला ही प्रक्रिया पूर्ण होईल, अशी माहिती मिळत आहे.
महापालिका निवडणुका दिवाळीनंतरच?
प्रभाग रचना करण्याचा अधिकार राज्य सरकारच्या नगरविकास विभागाकडे असून, त्याच्या वतीने महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना आवश्यक आदेश देण्यात आले आहेत. संबंधित प्रशासनाने आता यावर काम सुरू केले असून, प्रभागांची निश्चिती पूर्ण होईपर्यंत निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होणे शक्य नाही. फक्त प्रभाग रचना नव्हे, तर आरक्षण प्रक्रिया आणि मतदार यादीचे अद्ययावतीकरण यासाठी देखील उशीर लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या आसपासच निश्चित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिका निवडणुका नोव्हेंबरमध्ये होण्याची चिन्ह आहेत.
मुंबईमध्ये जुनेच 227 प्रभाग, 'या' महापालिकांमध्ये चार सदस्यीय प्रभाग रचना
दरम्यान, महाराष्ट्रातील महापालिकांच्या प्रभाग रचनेसंदर्भातील आदेश राज्य सरकारने जारी केले आहेत. या आदेशानुसार, मुंबई महानगरपालिका ही जुन्याच 227 एकसदस्यीय प्रभागांनुसार कार्यरत राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. याचाच अर्थ, मुंबईमध्ये निवडणुका जुन्या रचनेनुसारच होणार आहेत.
पूर्वी मुंबई महापालिकेमध्ये 227 प्रभाग होते. महाविकास आघाडी सरकारच्या काळात हे प्रभाग वाढवून 236 करण्यात आले होते. मात्र, महायुती सरकारने पुन्हा त्याची संख्या घटवून 227 केली. या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते, परंतु न्यायालयाने ती याचिका फेटाळल्याने मुंबईमध्ये 227 प्रभाग कायम राहणार आहेत. तर पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक, नवीमुंबई, पिंपरी चिंचवड, छ. संभाजीनगर, यासह इतर सर्व महापालिकांमध्ये चार सदस्यांचे प्रभाग असणार आहेत.
अ वर्ग महानगरपालिका - पुणे, नागपूर
ब वर्ग महानगरपालिका - ठाणे, नाशिक, पिंपरी-चिंचवड
क वर्ग महानगरपालिका - नवी मुंबई, वसई-विरार, छत्रपती संभाजीनगर, कल्याण डोंबिवली
तर, ड वर्गातील महापालिकांमध्ये प्रभाग रचना करताना सर्व प्रभाग शक्यतो चार सदस्यांचे ठेवण्याचे निर्देश आहेत. मात्र, गणित जुळवताना हे शक्य न झाल्यास, एखादा प्रभाग तीन किंवा पाच सदस्यांचा असू शकतो, अथवा दोन प्रभाग तीन सदस्यांचे करण्यात येऊ शकतात.
ड वर्गात खालील महापालिकांचा समावेश
अमरावती, अहिल्यानगर, अकोला, कोल्हापूर, सोलापूर, सांगली-मिरज-कुपवाड, मिरा भाईंदर, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, जळगाव, नांदेड, धुळे, मालेगाव, लातूर, चंद्रपूर, परभणी, पनवेल, इचलकरंजी आणि जालना.
आणखी वाचा
























