Marathwada Water Crisis : मराठवाड्यात फक्त 17 टक्के पाणीसाठा शिल्लक; अनेक भागात भीषण पाणीटंचाई, तीन प्रकल्प कोरडेठाक
मे महिन्याच्या अखेरीस मराठवाड्याला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. चिंताजनक बाब म्हणजे मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणात फक्त 8 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
Marathwada Water Crisis : मराठवाड्यात (Marathwada Water Crisis) पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. अनेक भागात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मराठवाड्यात आजघडीला फक्त 17 टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याची चिंताजनक माहिती आहे. मराठवाड्यातील 11 मोठ्या प्रकल्पात 17.30 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. या 11 प्रकल्पापैकी 3 प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. त्यामुळे मे महिन्याच्या अखेरीस मराठवाड्याला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. चिंताजनक बाब म्हणजे मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणात फक्त 8 टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती देखील समोर येत आहे.
मराठवाड्यातील 11 मोठ्या प्रकल्पातील 3 धरणात 0 टक्के पाणीसाठा
- जायकवाडी 8 टक्के
- येलदरी 30 टक्के
- सिद्धेश्वर 2 टक्के
- माजलगांव 0 टक्के
- मांजरा 3 टक्के
- उर्ध्व पेनगंगा 41 टक्के
- निम्न तेरणा 0 टक्के
- निम्न मनार 27 टक्के
- विष्णुपुरी 30 टक्के
- निम्न दुधना 0 टक्के
- सिना कोळेगांव 0 टक्के
तब्बल 1 हजार 424 टँकरने पाणीपुरवठा
दुसरीकडे, उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्याने मराठवाड्याला पाणी टंचाईच्या झळा बसू लागल्या. तब्बल 1 हजार 424 टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहेत. हिंगोली जिल्हा वगळता इतर सर्वच जिल्ह्यांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. सर्वाधिक संख्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहे. या जिल्ह्यात 569 टँकरने पाणीपुरवठा सुरू आहेत. परभणी जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजे पाच टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे.
पाण्याचे टँकर भरण्यासाठी व विहिरीद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासनाकडून खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. सध्या विभागातील 2 हजार 83 विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 304, जालना 413, परभणी 38, हिंगोली 49, बीड 322, नांदेड 57, लातूर 272 तर धाराशिव जिल्ह्यात 628 विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले. टँकरसाठी 727, टँकर व्यतिरिक्त 1356 अशा 2083 विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या