Marathi Bhasha Din: तुमच्या भाषेसाठी कडवट रहा, ठाम रहा, समोरचा तुमच्याशी जुळवून घेईल: राज ठाकरे
Marathi Bhasha Din: मराठी राजभाषा दिनाच्या निमित्तानं एबीपी माझा आपल्या या मायमराठीचा वैचारिक जागर करणार आहे. आज आणि उद्या दोन दिवस मायमराठीचा हा जागर एबीपी माझावर असणार आहे.
![Marathi Bhasha Din: तुमच्या भाषेसाठी कडवट रहा, ठाम रहा, समोरचा तुमच्याशी जुळवून घेईल: राज ठाकरे Marathi Bhasha Din MNS Raj Thackeray thoughts on Marathi in ABP Majha Abhijat Marathicha Jagar Marathi Bhasha Din: तुमच्या भाषेसाठी कडवट रहा, ठाम रहा, समोरचा तुमच्याशी जुळवून घेईल: राज ठाकरे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/25/f1bf77444666345a210c18761d8e380c_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई: तुम्ही तुमच्या भाषेसाठी कडवट असाल, त्यावर ठाम असाल तर समोरचा तुमच्या भाषेशी जुळवून घेतो. तुम्हीच जर हिंदीत सुरू झाला तर मग तो मराठीत व्यवहार करणार नाही. त्यामुळे मराठीमध्ये सुरुवात करा असं मनसे प्रमुख राज ठाकरे म्हणाले. ते एबीपी माझाच्या अभिजात मराठीचा जागर या कार्यक्रमात बोलत होते.
मराठी जातीय अस्मितापलिकेडे जाऊन जपण्याची गरज
राज ठाकरे म्हणाले की, "आज काल भाषा ही जाती-पातीमध्ये अडकवून ठेवली जाते. त्याला जातीचा रंग दिला जातोय. पण मराठी भाषा, मराठी संस्कार हे जातीत अडकवून राहू नये, जातीय अस्मितांपलिकडे जाऊन मराठी जपली पाहिजे."
हिंदी भाषेचा प्रभाव हा चित्रपटांमुळे
राज ठाकरे म्हणाले, "हिंदी भाषा ही फार काही जुनी नाही. आपण कधीही हिंदी साहित्य वाचलो नाही, पण आपल्याला हिंदी येते. आज जो काही हिंदी भाषेचा प्रभाव आहे तो केवळ चित्रपटांमुळेच आहे. त्यामुळे या माध्यमातूनच मराठी भाषेचा विस्तार केला पाहिजे."
आजही पंतप्रधान मोदी गुजरातीमध्ये बोलतात, त्यांना त्यांच्या भाषेचा अभिमान वाटतो. मग आपल्याला मराठीचा अभिमान का वाटायला नको असं राज ठाकरे म्हणाले. राज्यात इतर भाषेचा प्रभाव वाढतोय पण त्यामुळे मराठी काही संपणार नाही असंही ते म्हणाले.
आधी मराठीत बोलणं गरजेचं
राज ठाकरे म्हणाले की, "भाषा टिकवायची असेल तर सर्वात महत्वाचं म्हणजे सर्वांनीच मराठी बोललं पाहिजे. तुम्ही तुमच्या भाषेत अडकला तर तुम्ही जागतिक स्तरावर स्पर्धा करु शकणार नाही असं जे बोलतात ते चुकीचं आहे. महात्मा गांधी, टागोर त्यांच्या मातृभाषेत बोलत होते. भाषा टिकवण्यासाठी आधी मराठीत बोललं पाहिजे, आपल्या भाषेची लाज वाटायला नको."
मराठी भाषा ही जगामधील दहावी भाषा आहे. तर मग ती अशीच मरणार नाही. आपली भाषा आपण बोलताना इतर भाषांतील काही शब्द आणले तर ती अधिक समृद्ध होते असं राज ठाकरे म्हणाले.
मराठी, अभिजात मराठी, आपल्या मनामनात दंगणारी मराठी, आपल्या रगारगात रंगणारी आणि उराउरात स्पंदणारी मराठी. संत ज्ञानेश्वरांनी जिचा उल्लेख, 'माझा मराठीची बोलू कौतुके, परि अमृतातेहि पैजासी जिंके' अशा शब्दांत केला आहे. हजारो वर्षांचा समृद्ध वारसा लाभलेली ही आपली मायमराठी भाषा अभिजात होती, आहे आणि राहील. मराठी राजभाषा दिनाच्या निमित्तानं एबीपी माझा आपल्या या मायमराठीचा वैचारिक जागर करणार आहे. साहित्य, कला, राजकारण अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत अभिजात मराठीचं मंथन या कार्यक्रमात होणार आहे. आज आणि उद्या दोन दिवस मायमराठीचा हा जागर एबीपी माझावर असणार आहे.
संबंधित बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)