(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maratha Reservation : मनोज जरांगेंचं उपोषण आणखी तीव्र, पाणी सोडलं आणि सलाईनही काढलं, मुख्यमंत्र्यांनी आज संध्याकाळी बोलावली सर्वपक्षीय बैठक
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली आहे.
अंतरवाली सराटी (जालना) : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात गेल्या 13 दिवसांपासून मनोज जरांगे (Manoj Jarange) उपोषण करत असून, त्यांच्या उपोषणाचा आजचा 14 वा दिवस आहे. तर, कालपासून मनोज जरांगे यांनी उपचार आणि पाणी घेणं देखील बंद केला आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती ढासळण्याची शक्यता आहे. तर, दुसरीकडे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली आहे. मराठा आरक्षणाबाबत मार्ग काढण्यासाठी आणि मनोज जरांगे यांच्या सुरू असलेल्या उपोषणावर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज 14 दिवस असून, कालपासून त्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. जरांगे यांनी कालपासून पाणी प्राशन करणं बंद केलंय. तसंच सलाईनही काढून टाकलंय. वैद्यकीय उपचार देखील ते घेत नाहीयेत. महाराष्ट्रातील सर्व मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या, या मागणीवर ते ठाम आहेत. यामुळेच त्यांनी राज्य सरकारचा दुसरा जीआर देखील फेटाळला आहे. मराठा समाजाने गावोगावी शांततेनं साखळी उपोषण करावं, असं आवाहन देखील जरांगेंनी केलंय.
मुंबईत बैठक बोलावली!
मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी सरकारने आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. ही बैठक सह्याद्री अतिथीगृहात होणार आहे. या बैठकीत राज्यातील सर्व महत्त्वाच्या पक्षांच्या नेत्यांना आमंत्रण देण्यात आले आहे. या बैठकीसाठी शरद पवार गटाकडून राजेश टोपे तर ठाकरे गटाकडून अंबादास दानवे उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या बैठकीत तोडगा निघतोय का? याकडे सगळ्यांचे डोळे लागले आहेत.
जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम!
मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे उपोषण करत आहे. तसेच मराठा समाजाला सरसकट कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याची मागणी जरांगे यांनी केली आहे. तर दुसरीकडे ज्यांच्याकडे वंशावळ म्हणजेच निजामकालीन कुणबी असल्याची नोंद असेल, अशा लोकांना तात्काळ कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याची घोषणा सरकारने केली. मात्र, सरकारचा हा प्रस्ताव जरांगे पाटील यांनी नाकारला आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याची मागणी जरांगे यांनी केली आहे.
उपचार आणि पाणी देखील केलं बंद...
जरांगे यांच्या उपोषणाचं आजचा 14 दिवस आहे. मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी सरकारने 1 महिन्याचा वेळ मागितला आहे. तर, जरांगे यांनी सरकारला चार दिवसांचा वेळ दिला होता. त्यानंतर आपण आमरण उपोषण करणार असल्याचे ते म्हणाले होते. त्यानुसार त्यांनी कालपासून पाणी आणि उपचार घेण्यास बंद केले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: