(Source: Poll of Polls)
राज्याला पाणीटंचाईच्या संकटाने घेरले; मोठ्या प्रकल्पांमध्ये केवळ 19.98 टक्के पाणीसाठा, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकमध्ये तीव्र पाणीटंचाई
छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक विभागात पाण्याची मोठ्या प्रमाणावर कमतरता आहे. ज्या गावांमध्ये पाणीपुरवठा केला जात आहे तो केवळ पिण्यासाठी आहे, त्यामुळे जनावरांचे मोठे हाल होत आहेत.
मुंबई : यंदा पाणीटंचाईने (Water Shortage) भीषण स्वरुप धारण केलं आहे. राज्याला पाणीपुवरठा करणाऱ्या मोठ्या प्रकल्पांतील पाणीसाठा झपाट्याने खालावत आहे. आजमितीला या मोठ्या प्रकल्पांमध्ये केवळ 19.98 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी याच दिवशी हा पाणीसाठा 29.07 टक्क्यांवर होता. लघु प्रकल्पांत 26.11 टक्के पाणीसाठा शिल्लक असून गेल्यावर्षी हा पाणीसाठा 33.55 टक्के इतका होता. छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक विभागात पाण्याची मोठ्या प्रमाणावर कमतरता आहे. ज्या गावांमध्ये पाणीपुरवठा केला जात आहे तो केवळ पिण्यासाठी आहे, त्यामुळे जनावरांचे मोठे हाल होत आहेत.
राज्यात तब्बल 11 हजार वाड्या वस्त्यांमधील नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागतोय. राज्यात उष्णतेची तीव्रता वाढतेय. त्यामुळे एकीकडे धरणांमधील पाणीसाठा कमी होतोय. तर दुसरीकडे राज्यातील पाणी पुरवठा करणाऱ्या टँकरनं विक्रमी उच्चांक गाठलाय. राज्यातल्या 11 हजारांहून अधिक वाडय़ावस्त्यांना तब्बल 3 हजार 700 हून अधिक टँकरने पाणीपुरवठा करावा लागतोय. राज्यातल्या 25 जिह्यांतील भीषण परिस्थिती पुढे आली आहे. पुढील काही दिवसांत राज्यात पाण्याची परिस्थिती अधिकच गंभीर होत जाण्याची भीती व्यकत्त केली जातेय. आदिवासी पाड्यांमध्येही भीषण पाणीटंचाई असून घोटभर पाण्यासाठी मैलोन मैल पायपीट करावी लागत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता पाऊस शेतकऱ्यांसह सगळ्यांचेच डोळे पावसाकडे लागलेत.
राज्यात दुष्काळाची भीषण स्थिती
- राज्यात 11 हजारांहून अधिक वाड्या वस्त्यांमध्ये पाणीटंचाई
- तब्बल 3 हजार 700 हून अधिक टँकरनं पाणीपुरवठा
- राज्यातल्या 25 जिल्ह्यांतील भीषण परिस्थिती
- गेल्यावर्षी 1 हजार 300 गावांना फक्त 305 टँकरनं पाणी पुरवठा
- छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वाधिक 1 हजार 874 टँकरनं पाणी पुरवठा
पाण्यासाठी दाही दिशा भटकण्याची वेळ
नाशिकच्या ग्रामीण भागातील जनतेला पाण्यासाठी दाही दिशा भटकण्याची वेळ आली आहे..नाशिकच्या पेठ तालुक्यातील वाड्या - वस्तीवरील महिलांना तब्बल दीड ते दोन किलोमीटर पायपीट करून केवळ दोन हंडे पाणी मिळते..हे पाणी आणण्यासाठी तास दीडतास लागत असल्याचे वास्तव आहे ..नाशिकच्या पेठ तालुक्यात जलजीवन योजनेच्या माध्यमातून 85 कामे सुरू आहेत तर 77 कामे ही निर्धारित मुदत संपूनही पुर्ण करण्यास ठेकेदार अपयशी ठरले आहेत..त्यामुळे जलजिवन योजनेचे पाणी मुरते कुठे असा सवाल ग्रामस्थ करू लागले आहे. मुंबईत देखील आजपासून पाच टक्के पाणीकपात झाली आहे. मुंबईला पाणीपुरवठा
करणाऱ्या तलावांनी तळ गाठला आहे. पाणी जपून वापरण्याचं आवाहन महापालिकेने केले आहे.
Video :