(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Rain : पुढील तीन दिवस राज्यात पावसाची शक्यता, 'या' भागात मुसळधार पावसाचा इशारा; वाचा हवामान विभागाचा अंदाज
दरम्यान, पुढील तीन दिवस राज्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर मुंबईसह कोकणात मात्र मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आल्याची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली आहे.
Maharashtra Rain : राज्याच्या बहुतांश भागात सध्या पावसानं (Rain) दडी मारली आहे. काही भागत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे. दरम्यान, सध्या राज्यातील शेतकऱ्यांच्या (Farmers) पिकांना पावसाची खूप गरज आहे. पाण्याअभावी शेतकऱ्यांची पिकं वाया जाण्याच्या मार्गावर आहेत. दरम्यान, पुढील तीन दिवस राज्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर मुंबईसह कोकणात मात्र मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आल्याची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली आहे.
24 ते 26 सप्टेंबर दरम्यान या भागात पावसाची शक्यता
माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार आजपासून पुढील तीन दिवस म्हणजे 23 सप्टेंबरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर 24 ते 26 सप्टेंबर(रविवार ते मंगळवार) दरम्यान महाराष्ट्रातील मुंबईसह संपूर्ण कोकण आणि नंदुरबार, धुळे, जळगांव, नाशिक अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार तर उर्वरित महाराष्ट्रातील जिल्ह्यात मध्यम पावसाची शक्यता माणिकराव खुळे यांनी वर्तवली आहे.
आज राज्यातील विविध भागात जोरदार पाऊस
वाशिम जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस कोसळणार, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. हवामान विभागाचा अंदाज खरा ठरला असून वाशिम जिल्ह्यात तब्बल पंधरा दिवसाच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर पावसानं काही भागात दमदार पावसाचं आगमन झाल्याचं चित्र आज पाहायला मिळालं. कारंजा तालुक्यातील राहटी परिसरात तर रिसोड तालुक्यातील लोणी परिसरात आज पावसाने हजेरी लावल्याने त्या भागातील परिसरातील शेतकऱ्यांनी काही प्रमाणात दिलासा मिळाल्याचे चित्र पाहायला मिळालं. वाशिम तालुक्याही शहरासह पावसाच्या हलक्या सरी तर काही ठिकाणी दमदार पाऊस पडला. त्यामुळं प्रतीक्षेत असलेल्या खरीप हंगामातील पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
वर्ध्यात जोरदार पावसाची हजेरी
वर्ध्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. गेल्या दोन दिवसांपासून वर्ध्यात वातावरणात उकाळा निर्माण झाला होता. कधी ढगाळ वातावरण तर कधी प्रखर उन्ह असे वातावरण होते. सायंकाळी वर्ध्यात धुवाधार पावसाने हजेरी लावली असून सर्वत्र जोरदार पाऊस बरसला आहे. वर्ध्याच्या सेलू, येळकेळी, वायगाव , देवळी भागात चांगला पाऊस पडला आहे.
अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्यातही जोरदार पाऊस
अमरावती जिल्ह्यातही आज मुसळधार पावसानं हजेरी लावली. या पावसामुळं शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. पाण्याअभावी शेतकऱ्यांची पिकं वाया जाण्याच्या मार्गावर होती. पण या पावसानं पिकांनी संजीवनी मिळाली आहे. तसेच बुलढाणा जिल्ह्यातही जोरदार पावसानं हजेरी लावली आहे.