Dasara Melava 2022 : उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचा आज दसरा मेळावा; दोन्ही बाजूंनी तोफा धडाडणार, संपूर्ण राज्याचं लक्ष!
Dasara Melava 2022 : आजच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे काय बोलणार? कुणावर टीका करणार? भाषणामध्ये कळीचा मुद्दा कोणता असणार? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
Dasara Melava 2022 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शिवसेनेपासून (Shivsena) फारकत घेत भाजपसोबत (BJP) सत्ता स्थापन केली. दरम्यान, शिवसेनेतील फुटीनंतर आज होणाऱ्या पहिल्या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून आज दसरा मेळावा घेण्यात येणार आहे. यावेळी जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार असून दोन्ही बाजूंनी आरोपांच्या तोफा धडाडणार आहेत. याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय.
दोन्ही बाजूंनी आरोपांच्या तोफा धडाडणार, राज्याचं लक्ष
उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा दादर येथील शिवाजी पार्कमध्ये होणार आहे. तर एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा वांद्रे येथील बीकेसी मैदानावर होणार आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमचीच असल्याचा दावा केला आहे. हा वाद कोर्टात असला तरी दोन्ही नेत्यांमध्ये दसऱ्या मेळाव्यात आरोप प्रत्यारोप होण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे काय बोलणार? कुणावर टीका करणार? भाषणामध्ये कळीचा मुद्दा कोणता असणार? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
दोन्ही गटाकडून जोरदार शक्तीप्रदर्शनाचा प्रयत्न
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शिवसेनेचा वार्षिक दसरा मेळावा हा शिवाजी पार्क मैदानात होईल. शिंदे गटाचा दसरा मेळावा वांद्रे- कुर्ला संकुलात होणार आहे. गर्दी जमविण्यासाठी उभय बाजूने संपूर्ण ताकद पणाला लावण्यात आली आहे.एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गटाकडून शक्तीप्रदर्शनाचा प्रयत्न केला जात आहे. दोन्हीकडे मेळाव्याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. बीकेसी मैदानावर दोन ते तीन लाख कार्यकर्ते जमतील असा दावा, शिंदे गटाकडून केला जात आहे. दसरा मेळाव्यासाठी ठाकरे आणि शिंदे यांच्याकडून तयारी पूर्ण झाली आहे. राज्यभरातून मेळाव्यासाठी कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत. अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनीही तयारी केली आहे.
या मुद्द्यांवर बोलणार?
उद्धव ठाकरे यांच्या टीकेचा प्रमुख विषय शिंदे गट आणि भाजपवर असेल. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांवरही टीका होण्याचे संकेत आहेत. तसेच विविध मुद्द्यांवरून केंद्राला धारेवर धरले जाईल, अशी शक्यता व्यक्त करण्यात येतेय.
जास्तीतजास्त कार्यकर्त्यांना मुंबईत येण्याचे आवाहन
राज्यभरातून चार-पाच हजार एसटी, खासगी बसगाडय़ा आणि हजारो खासगी वाहनांतून कार्यकर्ते मुंबईत येणार आहेत. मैदानात लाखभराहून अधिक खुर्च्याची व्यवस्था असून, आणखी हजारो कार्यकर्ते बाजूच्या मैदानांवर आणि परिसरात असतील. त्यांच्या खाण्यापिण्याची, वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. दोन्ही गटांनी दसरा मेळावा यशस्वी व्हावा, यासाठी जास्तीतजास्त कार्यकर्त्यांना मुंबईत येण्याचे आवाहन केले आहे.
कसा असेल पोलिसांचा बंदोबस्त?
शिवाजी पार्क, दसरा मेळावा
2 डीसीपी
3 एसीपी
17 पोलीस निरीक्षक
60 एपीआय/पीएसआय
420 पोलीस कर्मचारी
- 65 पोलीस हवालदार
-2 RCP प्लॅटून
- 5 सुरक्षा बल पथक
-2 QRT शीघ्र कृती दल
- 5 मोबाईल वाहने
बीकेसी, दसरा मेळावा
4 डीसीपी
4 एसीपी
66 पोलीस निरिक्षक
217 एपीआय/पीएसआय
1095 पोलीस कर्मचारी
410 पोलीस हवालदार
8 RCP प्लॅटून
5 सुरक्षा बल पथक
5 शीघ्र कृती दल
14 मोबाईल वाहनं