(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Political Crisis : विरोधकांकडे आता बोलायला उरलंय काय? सामना अग्रलेखातून भाजपला थेट सवाल
Maharashtra Political Crisis : सामनाच्या अग्रलेखात आज ठाकरे सरकारनं घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांचा उल्लेख करत भाजप नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आलं आहे.
Maharashtra Political Crisis : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काल (बुधवारी) रात्री मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि गेली दोन वर्ष सात महिने सत्तेत असलेलं महाविकास आघाडी सरकार कोसळलं. 36 दिवसात बनलेलं तीन पक्षांचं सरकार. अडीच वर्ष चाललं आणि 9 दिवसात कोसळलं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सोपवला आणि महाराष्ट्रातलं महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. सामनाच्या अग्रलेखात आज ठाकरे सरकारनं घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांचा उल्लेख करत भाजप नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना प्रश्न विचारण्यात आले आहे.
उद्धव ठाकरेंनी काल मुख्यमंत्री पदाचा त्याग केला. पण त्यापूर्वी झालेल्या महाविकास आघाडी सरकारच्या शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाच्या निर्णय घेतले. औरंगाबाद शहराचं नाव बदलून संभाजीनगर, तर उस्मानाबादचं नाव बदलून धाराशीव ठेवण्यात आलं. तसेच, नवी मुंबई विमानतळाला गेल्या काही दिवसांपासून दि. बा. पाटील यांचं नाव देण्याची मागणी होत होती. ठाकरे सरकारनं शेवटच्या कॅबिनेटमध्ये महत्त्वाचा निर्णय घेत नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटलांचं नाव देण्याचा निर्णय घेतला. या मुद्द्यांवरुन सामना अग्रलेखात शिवसेना हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ठाम असल्याचं सांगत, भाजपला काही खोचक प्रश्नही विचारण्यात आले आहेत.
सामना अग्रलेखात म्हटलंय की, "महाविकास आघाडी सरकारवर अस्थिरतेचे संकट असतानाच 'ठाकरे सरकार'ने बुधवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेतले. लोकभावनेशी संबंधित असे हे निर्णय आहेत. नवी मुंबई विमानतळास लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा निर्णय झाला. औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशीव करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वचनपूर्ती केली."
विरोधकांकडे आता बोलायला उरलंय काय?
"ठाकरे' सरकार औरंगाबादचे संभाजीनगर करायला का घाबरते, असले सवाल मधल्या काळात राज्यातील विरोधी पक्षाने केले. खरे तर फडणवीसांचे राज्य महाराष्ट्रात असताना त्यांनी हे पुण्यकर्म का केले नाही, या प्रश्नाचे उत्तर आधी द्यायला हवे! संभाजीनगरमधील पाण्याचा प्रश्न असो की नामांतराचा, सर्व प्रश्नांवर ठाकरे सरकारने तोडगा काढला. शेवटी अनेकदा लोकभावनेचाच आदर करून निर्णय घ्यावा लागतो. उस्मानाबादचे 'धाराशीव' असे नामांतरही बरेच दिवस लटकून पडले होते. याबाबतही शिवसेनेचा शब्द होता. मराठवाडा हा औरंगजेबाप्रमाणे निजामाच्या टाचांखाली भरडलेला प्रदेश आहे. एका मोठ्या संघर्षातून मराठवाडा निर्माण झाला. औरंगाबादचे संभाजीनगर व उस्मानाबादचे धाराशीव करणे ही मराठवाडय़ातील मुक्तिसंग्रामात ज्यांनी हौतात्म्य पत्करले, त्याग केला त्या सर्व वीरांसाठी मानवंदनाच ठरेल. हा निर्णय दोन्ही बाजूंनी विनयाने स्वीकारावा, तरच हिंदुत्वाची बूज राहील व राष्ट्रभक्तीचा कस लागेल. माथी भडकवण्याचे उद्योग याप्रश्नी होतील, पण शेवटी औरंगाबादचे संभाजीनगर करणे हा निर्णय शिवरायांच्या महाराष्ट्राने केलाय व ही तर श्रींची म्हणजे हिंदुहृदयसम्राटांची इच्छा होती."
"जसे औरंगाबादचे संभाजीनगर , उस्मानाबादचे धाराशीव झाले व देशभरातील प्रखर धर्माभिमानी जनतेची इच्छा ठाकरे सरकारने पूर्ण केली त्याच पद्धतीने नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानळास स्व . दि. बा. पाटील यांचे नाव देण्याबाबतचा प्रस्तावदेखील मंजूर केला. शिवसेना ही भूमिपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी स्थापन झाली. शिवरायांच्या विचारांचा भगवा तिने जगात फडकवला. महाराष्ट्राच्या स्वाभिमानास तिने नख लागू दिले नाही, लोकभावनेचा आदर शिवसेनेने सदैव केला. संभाजीनगर , धाराशीव आणि 'दि . बां .' च्या निर्णयाने महाराष्ट्रातील अस्मितेला तेज प्राप्त झाले आणि ठाकरे सरकार उजळून निघाले. विरोधकांकडे आता बोलायला काय राहिले?" , असं सामान अग्रलेखात म्हटलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :