Maharashtra Police : शांतता! पोलिस तपास सुरु आहे; जयदीप आपटे सापडेना, विशाळगड दंगलीतील मुख्य आरोपी सुद्धा अजूनही 'मोकाट'!
शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा अवघ्या आठ महिन्यांमध्ये कोसळल्यानंतर हा पुतळा करणारा शिल्पकार जयदीप आपटे फरार झाला आहे. त्याचा सुद्धा थांगपत्ता लागलेला नाही.

Maharashtra Police : गंभीर गुन्हे केल्यानंतर फरार होऊन मोकाटच राहायचं का? शांतता! पोलिस तपास सुरु आहे असंच सांगत राहायचं का? असा सवाल उपस्थित झाला आहे. दीड महिन्यांपूर्वी म्हणजेच 14 जुलै रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडाच्या (Vishalgad Riots) पायथ्याशी गजापुरात झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी पुण्यातील रवींद्र पडवळ (Ravindra Padval) आणि कोल्हापुरातील बंडा साळोखे (Banda Salokhe) अजूनही मोकाट आहेत. त्यांचा अजूनही तपास लागलेला नाही. दंगलीनंतर कोल्हापूर पोलिसांची पथके दोघांच्या शोधासाठी रवाना करून सुद्धा पोलिसांच्या हाताला काहीही लागलेलं नाही. विशाळगड दंगलीमुळे (Vishalgad Riots) कोल्हापूर जिल्ह्याला (Kolhapur) एक वर्षात दुसऱ्यांदा दंगलीचा डाग लागला होता.
हे प्रकरण ताजे असतानाच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा अवघ्या आठ महिन्यांमध्ये कोसळल्यानंतर हा पुतळा करणारा शिल्पकार जयदीप आपटे सुद्धा फरार झाला आहे. त्याचा सुद्धा थांगपत्ता लागलेला नाही. त्यामुळे ज्या दोन घटनांमुळे महाराष्ट्रात समाजमन ढवळून निघालं आहे आणि आरोपींवर तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत असतानाच ते अजूनही फरार झाल्याने शांतता! पोलिसांचा तपास सुरू आहे असेच म्हणायची वेळ आली आहे. दरम्यान, राजकोट पुतळा प्रकरणातील आरोपी कोल्हापूरचा चेतन पाटील सुद्धा फरार झाला होता. मात्र, त्याच्या मुसक्या आवळण्यात कोल्हापूर पोलिसांना यश आलं आहे. त्याला आज सिंधुदुर्गमध्ये न्यायालयात हजर केलं जाणार आहे.
जयदीप आपटे सुद्धा फरार
दुसरीकडे, शिवाजी महाराजांचा पुतळा बनवणाऱ्या जयदीप आपटेचा (Jaydeep Apte) पोलिस अजूनही शोध घेत आहेत. पुतळा कोसळण्याच्या घटनेच्या दिवसापासून तो कल्याणमधील घरातून फरार झाला आहे. पोलिसांनी जयदीप आपटेसह चेतन पाटील विरोधात एफआयआर दाखल केला आहे. चेतन पाटील स्ट्रक्चरल कन्सल्टंट असून तो कोल्हापूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. पोलिसांनी एकूण 7 पथके तयार केली आहेत. यामध्ये 2 टीम तांत्रिक विश्लेषणासाठी तर 5 टीम मुंबई, कल्याण, ठाणे, कोल्हापूर आणि गोवा येथे वेगवेगळ्या ठिकाणी आरोपींचा शोध घेत आहेत. पोलिस त्यांच्या विविध ठिकाणी छापे टाकत आहेत, मात्र कोणताही सुगावा लागलेला नाही.
कोण आहे जयदीप आपटे?
जयदीप आपटे हा 25 वर्षीय तरुण असून तो मुंबईला लागून असलेल्या कल्याण परिसरात राहतो. तो मुंबईच्या जेजे स्कूल ऑफ आर्ट्सचा विद्यार्थी आहे. जवळीक असल्यानेच हे कंत्राट मिळाल्याचा आरोप आहे. यापूर्वी अशी भव्य शिल्पे बनवण्याचा जयदीपला विशेष अनुभव नव्हता. नौदलाच्या मदतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यात येईल, असे आश्वासन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असले तरी या मुद्द्यावरून विरोधक सातत्याने सरकारवर हल्लाबोल करत आहेत. या घटनेच्या निषेधार्थ विरोधी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी निदर्शने केली आहेत.
दरम्यान, विशाळगड दंगल प्रकरणात माजी खासदार संभाजी राजे छत्रपती विशाळगडावर पोहोचण्यापूर्वीच पायथ्याला गजापुरात हिंसाचार झाला होता. दुसरीकडे, विशाळगड दंगली प्रकरणी माजी खासदार संभाजी राजे छत्रपती यांच्यावर सुद्धा गुन्हा नोंदवणार असल्याचे कोल्हापूर पोलिसांनी सांगितले होते. मात्र त्यांच्यावर कोणत्या कलमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला, त्यांच्यावर गुन्हा खरोखरच नोंदवला आहे की नाही? याबाबत पोलिसांनी अजूनही स्पष्टता दिलेली नाही विशाळगड दंगलीचा आरोप ठेवत संभाजीराजे यांच्या अटकेची मागणी कोल्हापूरमधून करण्यात आली होती. पोलिसांकडून पुण्याच्या रवींद्र पडवळ, कोल्हापूरचे बंडा साळोखे यांच्यासह 500 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पडवळ, बंडा साळोखेकडून दंगलीसाठी चिथावणी
विशाळगड अतिक्रमण मुक्तीसाठी हाक दिलेल्या माजी खासदार संभाजीराजे छत्रपती समर्थकांसह विशाळगडाच्या पायथ्याला पोहोचण्यापूर्वीच हिंदू बांधव समिती आणि सेवाव्रत प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी गडाच्या पायथ्याला प्रचंड तोडफोड केली होती. जमावबंदी लागू असल्याने आंदोलन करू नये, असे आवाहन पोलिसांनी केले होते. त्याकडे दुर्लक्ष करून तोडफोड करण्यात आली होती. दुसरीकडे, कोल्हापुरातील सेवाव्रत संघटनेचे बंडा साळोखे यांनी सोशल मीडियात व्हिडिओ व्हायरल करून कार्यकर्त्यांना गडावर येण्याचे आवाहन केले होते. त्यांनीच गडावरील आणि पायथ्याच्या तोडफोडीसाठी चिथावणी दिल्याचे काही व्हिडिओतून समोर आले होते. त्यामुळे पोलिसांनी पडवळ आणि साळोखे यांच्यावर दंगलीला कारणीभूत ठरल्याचे गुन्हे दाखल केले आहेत. याशिवाय प्रत्यक्ष घरांची तोडफोड करणाऱ्यांवर दरोड्याचे गुन्हे दाखल केले आहेत.
दरम्यान, झालेल्या हिंसाचारात तोडफोडीत फोटोंमध्ये दिसणाऱ्या सात जणांचा जामीन अर्ज जिल्हा न्यायाधीश (4) ए. पी. गोंधळेकर यांनी 6 ऑगस्ट रोजी फेटाळल होता. उर्वरित 17 संशयितांचा जामीन मंजूर झाला होता. जामीन मंजूर न झालेले सात जण उच्च न्यायालयात दाद मागणार आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
