(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Breaking News LIVE Updates पहिला लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
Gunratna Sadavarte : अॅड. गुणरत्न सदावर्तेंना पुन्हा कोठडी की जामीन? आज निर्णय
Gunratna Sadavarte Latest News : अॅड. गुणरत्न सदावर्ते यांची दोन दिवसांची पोलीस कोठडी आज संपत आहे. आज त्यांना पुन्हा मुंबई मुख्य महानगरदंडाधिकारी कोर्टापुढे हजर केलं जाणार आहे. त्यामुळं त्यांना कोठडी वाढवून मिळणार की जामीन होणार याकडे लक्ष लागून आहे. दरम्यान काल गुणरत्न सदावर्तेंच्या घरी मुंबई पोलिसांचे पथक दाखल झालं होतं. त्यांच्या घराची झडती घेतली असल्याची माहिती आहे. यावेळी या ठिकाणचे सीसीटीव्ही, रजिस्टर तपासण्यात येत असून सदावर्तेंना भेटायला कोण-कोण आलं होतं याची माहिती घेतली असल्याची माहिती आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या घरासमोर आंदोलन झाल्यानंतर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यासोबतच इतर 109 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना भेटायला यापैकी कोणी एसटी कर्मचारी आला होता का किंवा इतर स्वरुपाची माहिती आणि पुरावे गोळा करण्याचे काम मुंबई पोलीस करत आहेत.
Shiv Sena vs MNS : मशिदीवरील भोंग्याबाबत मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलनात्मक पवित्रा घेतला आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी काल (रविवारी) शिवसेना (Shiv Sena) भवनासमोर भोंगा लावून हनुमान चालीसा पठण केलं. याबाबत शिवसेनेचे नेते आणि मंत्री आदित्य ठाकरे यांनी संपलेल्या पक्षाला मी उत्तर देत नाही, स्टंटबाजीला मी भाव देत नाही, असा टोला लगावला होता. यानंतर मनसे नेते देखील आदित्य ठाकरे विरोधात मैदानात उतरले आहेत. मनसे आमदार राजू पाटील यांनी आम्ही पक्ष जगवण्यासाठी कुणाच्या दाढीला बांधलेला नाही, असा टोला आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांना ट्वीटच्या माध्यमातून लगावला आहे. त्यामुळे आता भोंगाच्या मुद्द्यावरून शिवसेना मनसेमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्यानं राजकारण चांगलंच तापल्याचं दिसून येतं आहे.
Yavatmal News Update : यवतमाळ येथील शिवाजीनगर परिसरातील सर्जिकल हॉस्पिटलला आग, मशनरी आणि इतर साहित्य जळून खाक
Yavatmal News Update : यवतमाळ येथील शिवाजीनगर परिसरातील सर्जिकल हॉस्पिटलला आग लागली आहे. रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान शॉर्टसर्किट होऊन सिलेंडरने पेट घेतल्यामुळे ही आग लागली. आग भडकल्यामुळे रुग्णांना तत्काळ दुसरीकडे हलविण्यात आले. या घटनेत जीवितहानी झाली नाही. परंतु, रूग्णालयातील मशनरी आणि इतर साहित्य जळून खाक झाले.
Raigad News Update : जेएनपीटी बंदरातील शॅलो जेट्टीनजीक स्फोट , एका कामगाराचा मृत्यू
Raigad News Update : रायगडमधील जेएनपीटी बंदरातील शॅलो जेट्टीनजीक स्फोट झाला असून यात एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. तर या स्फोटात एक कामगार जखमी झाला आहे. त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तीन कामगार समुद्राच्या पाण्यात कोसळले होते. यावेळी दोघांना वाचविण्यात यश आले.
Gunratan Sadavarte : एसटी आंदोलनात कर्मचाऱ्यांकडून अवैधपणे पैसे जमा केल्याबद्दल अकोला जिल्ह्यातील अकोट शहर पोलिसांत गुणरत्न सदावर्तेंसह चार जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल
Gunratan Sadavarte : एसटी आंदोलनात एसटी कर्मचाऱ्यांकडून अवैधपणे पैसे जमा केल्याबद्दल अकोला जिल्ह्यातील अकोट शहर पोलिसांत गुणरत्न सदावर्तेंसह चार जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. गुणरत्न सदावर्ते, पत्नी जयश्री पाटील, पैसे जमा करणारा औरंगाबादचा अजयकुमार गुजर आणि अकोटच्या प्रफुल्ल गावंडे यांचा यामध्ये समावेश आहे. शिवसेना प्रणीत महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष विजय मालोकार यांनी 8 जानेवारी 2022 रोजी याबाबत तक्रार दाखल केली होती.
Solapur News Update : जिम प्रशिक्षणाच्या नावाखाली महिला आणि मुलींची प्रशिक्षकाडून छेडछाड
Solapur News Update : जिम प्रशिक्षणाच्या नावाखाली प्रशिक्षकाकडून महिला आणि मुलींची छेडछाड केल्याचा धक्कादायक प्रकार पंढरपुरात समोर आला आहे. या प्रकरणी जीम प्रशिक्षक श्रीकांत गायकवाड याच्यावर गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
Anil Parab : सदावर्ते हेच पवारांच्या घरावरील हल्ल्यासाठी जबाबदार
सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांकडून अवैधपणे पैसे जमा केल्याचा आरोप राज्याचे मंत्री अनिल परब यांनी केला आहे. आता या सर्व प्रकरणाचा तपास करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. पवारांच्या घरावरील हल्ल्यासाठी सदावर्ते हेच जबाबदार असल्याचं अनिल परब म्हणाले.