Manoj Jarange : 'टाइम बॉण्ड दिला नाही तर सोडणार नाही'; जरांगे पाटलांचा राज्य सरकारला इशारा
Manoj Jarange : मनोज जरांगे यांनी त्यांचं दुसऱ्या टप्प्यातील उपोषण सोडताना राज्य सरकारकडून टाइम बॉण्डचं आश्वासन देण्यात आलं होतं. परंतु अद्यापही सरकारने टाइम बॉण्ड दिले नसल्यामुळे जरांगे पाटलांनी आक्रमक पवित्रा घेतलाय.
मुंबई : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगेंनी (Manoj Jarange) पुन्हा त्यांच्या महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात केलीये. पण यावेळी जरांगे पाटलांनी केवळ दौरा सुरुच केला नाही तर सरकारने टाईम बॉण्ड दिला नाही तर सोडणार नसल्याचा इशारा देखील त्यांनी दिलाय. राज्यात मागील अनेक महिन्यांपासून मनोज जरांगे नावाचं वादळ तयार झालंय. पण आता हे वादळ दिवसागणिक अधिक आक्रमक होत असल्याचं चित्र आहे. याला कारण ठरलंय ते सरकारने दिलेलं टाइम बॉण्डचं आश्वासन.
मनोज जरांगेंनी त्यांचं दुसऱ्या टप्प्यातील उपोषण हे 2 नोव्हेंबर रोजी स्थगित केलं. पण त्यावेळी सरकारने टाइम बॉण्ड लिहून देण्याच्या आश्वासनावर जरांगेंनी आपलं उपोषण सोडलं होतं. मात्र सरकारने अजूनही टाइम बॉण्ड लिहून दिला नसल्यामुळे जरांगे पाटील अधिकच आक्रमक होत चालल्याचं पाहायला मिळतंय. सरकारने टाइम बॉण्ड दिला नाही तर मागेच लागेन असा इशारा यावेळी मनोज जरांगेंनी दिलाय.
मुख्यमंत्र्यांवर विश्वास - बावनकुळे
दरम्यान जरांगे पाटलांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सगळ्या नोंदी तपासून काम करत असल्याचं म्हटलं. तसचे मुख्यमंत्री शिंदेंवर विश्वास असून ते आरक्षणाचा तिढा लवकरच सोडवतील असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त करत सरकारची पाठराखण केली.
राज ठाकरेंची टीका
एकीकडे मनोज जरांगे आरक्षणाच्या मुद्यावर आक्रमक असताना आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील या मुद्द्यावर भाष्य केलंय. मनोज जरांगे यांनी भेटून सांगितलं होतं, असं कोणतचं आरक्षण कधीही मिळणार नाही, मुळात त्यांच्या मागे कोण आहे, कोण बोलायला सांगत आहेत, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असे जातीय तणाव होत आहेत, हे लवकरच समोर येईल, असं राज ठाकरे यांनी म्हटलं.
जरांगे पाटलांचं प्रत्युत्तर
दरम्यान, यावेळी बोलतांना जरांगे म्हणाले की, "खरच यामागे कोण आहे हे राज ठाकरेंनी शोधून काढावं. तसेच लवकर याबाबत स्पष्ट देखील करावं. यामागे कोण आहे याबाबत आम्हाला देखील ऐकायचं आहे. यापूर्वी सर्वांनी शोधलं आहे, आता तुम्ही देखील शोधावं. तसेच याबाबत आम्हाला देखील सांगावं, कारण याबाबतचा आम्हाला देखील अजून शोध लागला नाही. मराठा समाजातील मुलांचं कल्याण व्हायला लागलं की, अशा खोट्या पुड्या सोडल्या जातात. मात्र, मराठा समाज आता कुणाचही ऐकणार नाही. मराठ्यांना आरक्षण मिळणार आणि आम्ही ते मिळवणारच हे आता समाजाला माहित झालं आहे, असे मनोज जरांगे म्हणाले.
सध्या मनोज जरांगे हे तिसऱ्या टप्प्यातील महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. राज्यभर दौरे सुरु असताना जरांगे पाटलांनी सरकारला हा इशारा दिलाय. त्यामुळे आता जरांगे पाटील आणि सरकार नेमकी कोणती भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
हेही वाचा :
मराठ्यांचं कल्याण व्हायला लागलं की, पुड्या सोडल्या जातात; राज ठाकरेंच्या टीकेला मनोज जरांगेंच उत्तर