मोठी बातमी! मविआच्या मराठवाड्यातील जागावाटपाचं 'गणित' ठरलं?; पाहा कोणाकडे कोणती जागा
Maha Vikas Aghadi : ठाकरे गटाला 4 जागा, काँग्रेसला 3 जागा आणि शरद पवार गटाला 1 जागा देण्याचा निर्णय अंतीम टप्यात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Maha Vikas Aghadi : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) अनुषंगाने सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. दरम्यान, महाविकास आघाडीत (Maha Vikas Aghadi) जागावाटपाच्या घडामोडींना अधिक वेग आल्याचे चित्र आहे. अशात मराठवाड्यातील (Marathwada) 8 जागांबाबत महाविकास आघाडीत सुरु जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. मराठवाड्यातील आठ जागांपैकी सर्वाधिक जागा उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) शिवसेनेला मिळणार आहे. ज्यात ठाकरे गटाला 4 जागा, काँग्रेसला (Congress) 3 जागा आणि शरद पवार (Sharad Pawar) गटाला 1 जागा देण्याचा निर्णय अंतीम टप्यात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे हिंगोली लोकसभा मतदारसंघावर (Hingoli Lok Sabha Constituency) तीनही पक्षांनी दावा केल्याने पुढील महाविकास आघाडीच्या बैठकीत यावर निर्णय होणार आहे.
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीत जागावाटपावरून सुरु असलेल्या चर्चेत 2019 मध्ये ज्या पक्षाने जी जागा जिंकली होती, 2024 मध्येही त्याच पक्षाने ती जागा लढावी असा तिनही पक्षात ठरले आहेत. जेथे जागा जिंकली नसेल, तेथे दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या पक्षाच्या वाट्याला ती जागा जाईल असे सूत्र ठरवण्यात आले आहे. विशेष म्हणजे ठाकरे गटाकडे मराठवाड्यात 2 विद्यमान खासदार आहेत. तर, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 2019 मध्ये मराठवाड्यात एकही जागा जिंकता आली नव्हती.
ठाकरे गटाला मिळणाऱ्या जागा...
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला महाविकास आघाडीत एकूण 4 जागा मिळणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. परभणी लोकसभा मतदारसंघ आणि धाराशिव लोकसभा मतदारसंघ ही दोन्ही मतदारसंघात ठाकरेंचे विद्यमान खासदार असल्याने या दोन्ही जागा त्यांना मिळणार आहेत. सोबतच छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून माजी खासदार चंद्रकांत खैरे सलग चार वेळ निवडून आले आहेत. गेल्यावेळी मात्र मताचे विभाजन झाल्याने खैरेंचा पराभव करत इम्तियाज जलील यांनी विजयाचा झेंडा फडकावला. मात्र, खैरेंना दुसऱ्या क्रमाकांची मते होते. त्यामुळे ही जागा देखील उद्धव ठाकरे यांच्याकडे असणार आहे. तसेच, मागील 30 वर्षांपासून जालन्यात काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागत असल्याने यंदा ही जागा महाविकास आघाडीत ठाकरेंकडे जाणार असून, त्या बदल्यात काँग्रेसला दुसरी जागा दिली जाणार आहे.
काँग्रेसकडे तीन मतदारसंघ...
महाविकास आघाडीत काँग्रेसकडे तीन मतदारसंघ असणार आहे. नांदेड जिल्ह्यात अशोक चव्हाण यांची ताकद असून, नांदेड लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडे असणार आहे. सोबतच लातूर लोकसभा मतदारसंघ देखील काँग्रेसकडे असणार असून, याची जबाबदारी अमित देशमुख यांच्याकडे असणार आहे. सोबतच, काँग्रेसची जालन्याची जागा ठाकरे गटाला दिली जाणार असून, त्या बदल्यात हिंगोली लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला दिला जाण्याची शक्यता आहे.
शरद पवार गटाला एकच जागा...
शरद पवार यांचा मराठवाड्यात मोठा प्रभाव आहे, असे म्हटले जाते. पण पक्षफुटीनंतर तो ओसरल्याचा निष्कर्ष महाविकास आघाडीत काढला जात आहे. त्यामुळे, शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीला फक्त बीड हा एकमेव मतदारसंघ दिला जाण्याची शक्यता आहे. या सर्व चर्चा अंतिम टप्प्यात असून, फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात याची घोषणा होण्याची शक्यता आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
मविआतील जागा वाटपाच्या निर्णयाची 'डेडलाईन' ठरली; कसा असेल फार्म्युला?