(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Amol Kolhe: लाडकी बहीण योजनेचे 32 लाख अर्ज आले, केवळ 19 अर्जच मंजूर, अमोल कोल्हेंनी बीडमध्ये आकडे दाखवले
Amol Kolhe on Ladki Bahin Yojana : अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे पोर्टल दाखवत यामध्ये एकूण आलेल्या अर्जांची संख्या आणि मंजूर अर्जांची संख्या दाखवत महायुती सरकारवरती हल्लाबोल केला आहे.
Amol Kolhe: राज्याच्या अर्थसंकल्पात महायुती सरकारकडून महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना (Ladki Bahin Yojana) राबवण्यात आली आहे. काही ठिकाणी महिलांना त्यांच्या खात्यात याचे पैसे सुध्दा मिळाले आहेत. राज्यातील लाखोंच्या घरात महिलांनी या योजनेसाठी फॉर्म भरले आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा (Ladki Bahin Yojana) आतापर्यंत 80 लाख महिलांना लाभ मिळाल्याची माहिती आहे. तर सर्व पात्र महिलांच्या खात्यात लाभ हस्तांतरण केला जातो आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला 32 लाख महिलांच्या खात्यात रक्कम जमा केली जाणार असल्याची माहिती आहे. तर या योजनेवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी बीडमध्ये आकडे दाखवत हल्लाबोल केला आहे.(Amol Kolhe on Ladki Bahin Yojana)
यावेळी बोलताना अमोल कोल्हे (Amol Kolhe) म्हणाले, अंधभक्त सोशल मिडीयावर टाकत आहेत. आले का तीन हजार म्हणून, तुम्हाला गम्मत बघायची आहे का तीन हजारांची असं म्हणत अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे (Ladki Bahin Yojana) पोर्टल दाखवत यामध्ये एकूण आलेल्या अर्जांची संख्या 32 लाख इतकी आहे. तर पोर्टलवरती 32 लाख पैकी मंजूर अर्जांची संख्या ही 19 इतकी आहे. ही माहिती सरकारच्या पोर्टलवरती देण्यात आले आहेत. अंधभक्त सोशल मिडीयावर टाकत आहेत पैसे आल्याचं असं म्हणत कोल्हेंनी (Amol Kolhe) हल्लोबोल केला आहे.
तर ही लाडकी बहिण योजना (Ladki Bahin Yojana) नाही तर लाडकी पडदा योजना आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. आम्ही आत्तापर्यंत ऐकलं होतं, चप्पल खरेदी करता येते, सुपारी खरेदी करता येते, कपडे खरेदी करता येतात. पण, या महाराष्ट्राने कधीही ऐकलं नव्हतं आमदार आणि मंत्री देखील खरेदी करता येतात. ते या भारतीय जनता पक्षांने महाराष्ट्रात खरेदी करून दाखवलं. आठवतंय ना पन्नास खोके आणि एकदम ओके, हे विसरू नका. हे कायम लक्षात ठेवा, असंही अमोल कोल्हेंनी (Amol Kolhe) म्हटलं आहे.
दोन अडीच वर्षांपूर्वी हातावर तीर्थ मिळायचं तसाच हाताच्या मनगटावर चूना टाकला आहे. पन्नास खोके आणि एकदम ओके म्हणून आणि जेव्हा पक्ष फोडले जातात, गद्दारी केली जाते, चिन्ह आणि नाव पळवलं जातं, या सगळ्यावर पडदा टाकण्यासाठी अशा योजना आणल्या जातात. त्यातून यावर पडदा टाकला जाईल या भ्रमात हे महायुती सरकार आहे. या महायुतीच्या नेत्यांना वाटतं लोक सगळं विसरून जातील. काल झालं ते आज विसरून जातील. पण या महाराष्ट्राचा इतिहास आहे. ज्या माणसाने मातीत गद्दारी कशी गाडायची असते ती दाखवून दिली, त्या माणसाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज आहे, असंही अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे.