...म्हणून मराठी समाजाने कितीही अभिमान बाळगला तरी तो कमीच : जावेद अख्तर
महाराष्ट्रीयन संस्कृतीत इतर ठिकाणांपेक्षा महिलांसाठी अधिक अभिमान आणि आदर असल्याचे जावेद अख्तर यांनी यावेळी नमूद केले.
94 marathi sahitya sammelan : नाशिकः जेष्ठ गीतकार आणि लेखक जावेद अख्तर (javed akhtar)यांनी काल नाशिक येथे भरलेल्या 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात( 94 marathi sahitya sammelan) भाषण केले. या भाषणात त्यांनी अनेक महत्वपूर्ण मुद्दे मांडले. यावेळी त्यांनी मराठी साहित्य आणि महाराष्ट्राचे कोैतुक केले. संपूर्ण जगामध्ये सर्वात आधी साहित्यात आलेली महिला महाष्ट्रातील आहे याचा मराठी समाजाने कितीही अभिमान बाळगला तरी कमीच पडेल असे म्हणत आठशे वर्षापूर्वी मुक्ताबईंनी कविता लिहिल्याचे सांगितले.
कालपासून नाशिक (nashik)येथे 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरूवात झाली आहे. संमेलनामध्ये महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपऱ्यातून साहित्यिकांसह साहित्य रसिकांनी हजेरी लावली आहे. संमेलनाच्या पहिल्या दिवशी अनेक मान्यवरांची भाषणे झाली. यामध्ये जावेद अख्तर यांनीही भाषण केले. आपल्या भाषणात अख्तर यांनी अनेक मुद्यांना हात घालत जगातील पहिली स्त्री लेखिका महाराष्ट्रात जन्मल्याचा अभिमान असून मराठी समाजाने याचा कितीही अभिमान केला तरी कमी पडेल असे सांगितले.
आपल्या भाषणात अख्तर म्हणाले, "18 व्या आणि 19 व्या शतकात फ्रान्समध्ये खूप मोठी महिला कादंबरीकार जॉर्ज सँड या पुरुषाच्या नावाने साहित्य लिहित असत. इंग्लंडमध्ये एक महिला जॉईज इलिएट नावाने साहित्य लिहित होती. त्यावेळी मोठ- मोठ्या लेखिका असूनही त्यांना पुरुषांच्या नावाने लिहावे लागत होते. कारण बाई कसे लिहू शकते असा विचार २००-२५० वर्षांपूर्वी युरोपमध्ये होता. परंतु, तब्बल आठशे वर्षापूर्वी जगभरात कोठेच महिला साहित्यिक नसताना आमच्याकडे कवयित्री होती, ती म्हणजे ज्ञानेश्वरांची बहीण मुक्ताबाई. आठशे वर्षापूर्वी मुक्ताबाई कविता लिहित होती.
''आपल्याकडे आठशे वर्षापूर्वी महिला साहित्यिक होती ही सामान्य गोष्ट नाही. मुक्ताबाईनंतर बहिणाबाईसुद्धा महिला साहित्यिक म्हणून पुढे आल्या. त्यांच्याआधी म्हणजे चारशे वर्षापूर्वी मीराबाईंनी अनेक रचाना केल्या आहेत. जगातील पहिली महिला साहित्यिक महाराष्ट्रात जन्माला आली याबरोबरच भारताची पहिला महिला डॉक्टर देखील महाराष्ट्राचीच होती ही महाष्ट्रासाठी अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. महाराष्ट्रीयन संस्कृतीत इतर ठिकाणांपेक्षा महिलांसाठी अधिक अभिमान आणि आदर असल्याचे जावेद अख्तर यांनी यावेळी नमूद केले.
मला खुर्चीवरून खाली पडल्यासारखं वाटलं
जावेद अख्तर यांनी शांतता कोर्ट चालू आहे हे नाटक पाहिल्यानंतर आपले डोळे उघडल्याची एक आठवण सांगितली. ते म्हणाले, माझा जन्मच साहित्यित कुटुंबात झाला. त्यामुळे मी हिंदी, उर्दू, बंगाली भाषांतरीत आणि युरोपीयन साहित्य वाचलं होतं. त्यामुळे मला सर्व मला माहित आहे, माझ्यासारखा कोणीच नाही असे मला वाटायचे. याचवेळी मी वयाच्या 19 व्या वर्षी मुंबईत 'शांतता कोर्ट चालू आहे' हे नाटक पाहिले. हे नाटक पाहिल्यानंतर कोणीतरी माझ्या तोंडात मारली आणि मी खुर्चीवरून खाली पडल्यासारखं वाटलं. मला स्वत:चीच लाज वाटली. हे नाटक पाहूनच खऱ्या अर्थाने माझे डोळे उघडले. यानंतर मी विजय तेंडुलकरांची इतर सर्व नाटकं पाहिली आणि समजून घेतली. मी असा लेखक पाहिला नव्हता आणि माझे डोळे उघडले असे अख्तर यांनी सांगितले.
संबंधित बातम्या