नाशिकमध्ये असूनही देवेंद्र फडणवीस साहित्य संमेलनात जाणार नाहीत, ट्वीट करत सांगितलं कारण
Akhil Bhartiy Marathi Sahitya Sammelan : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) नाशिकमध्ये असले तरी ते 94 व्या मराठी साहित्य संमेलनाला जाणार नाहीत. ट्वीट करुन फडणवीसांनी ही माहिती दिली.
Akhil Bhartiy Marathi Sahitya Sammelan : कालपासून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला नाशिकमध्ये सुरुवात झालं. साहित्यिकांसह साहित्य रसिकांच्या उपस्थितीत सारस्वतांचा मेळा आणखी दोन दिवस चालणार आहे. संमेलन आणि राजकारण होणं हे सूत्र ठरलेलं आहे. यंदाही संमेलनावरुन भरपूर राजकारण झालं आहे. यात आज आणखी भर पडली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस नाशिकमध्ये असले तरी ते 94 व्या मराठी साहित्य संमेलनाला जाणार नाहीत. ट्वीट करुन फडणवीसांनी ही माहिती दिली. नाशिकातील संमेलनस्थळाला कुसुमाग्रज आणि वीर सावरकरांच्या नावावरुन झालेल्या वादावरही त्यांनी भाष्य केलं आहे.
त्यांनी म्हटलं आहे की, नाशिक ही स्वातंत्र्यवीरांची जन्मभूमी आणि कर्मभूमी सुद्धा. अ.भा. मराठी साहित्य संमेलन, अ. भा. मराठी नाट्य संमेलन आणि मराठी पत्रकार संघाच्या अधिवेशनाचे अध्यक्षपद सुद्धा त्यांनी भूषविलेले. असे तिन्ही बहुमान मिळालेले कदाचित ते एकमेव! या नगरीला कुसुमाग्रजांचे नाव दिले, याचे स्वागतच. पण केवळ स्वातंत्र्यवीरांचे नाव न देण्याच्या अट्टाहासातून त्यांचे नाव देण्यातून या दोन्ही महनियांची उंची आपण कमी करीत नाही का? असो,आमचे आदर्श, प्रेरणास्थान स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे व्यक्तिमत्त्व अजरामर आणि प्रत्येकाच्या मनात आहे, असं फडणवीसांनी म्हटलं आहे.
मराठी सारस्वतांचा पूर्णत: सन्मान आणि आदर आहे.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 4, 2021
त्यांना मी अभिवादन करतो.
अ.भा. मराठी साहित्य संमेलनाला सुद्धा शुभेच्छा आहेतच.
पण… जेथे आमचे आदर्शच अपमानित होत असतील, त्यांचा यथोचित सन्मान होणार नसेल, तर तेथे जाऊन तरी काय करायचे? #साहित्यसंमेलन
फडणवीसांनी म्हटलं आहे की, मराठी सारस्वतांचा पूर्णत: सन्मान आणि आदर आहे. त्यांना मी अभिवादन करतो. अ.भा. मराठी साहित्य संमेलनाला सुद्धा शुभेच्छा आहेतच. पण… जेथे आमचे आदर्शच अपमानित होत असतील, त्यांचा यथोचित सन्मान होणार नसेल, तर तेथे जाऊन तरी काय करायचे?असा सवाल त्यांनी केला आहे.
आधीही झाला होता वाद
साहित्य संमेलन आणि वाद हे समीकरण आता सर्वांच्या परिचयाचे झाले आहे. यंदा नाशिकमध्ये होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाबाबत (Akhil Bhartiy Marathi Sahitya sammelan) देखील सुरुवातीपासून वाद सुरु आहेत. अपेक्षेप्रमाणे मानापमान नाट्य रंगलं. साहित्य संमेलनाच्या निमंत्रण पत्रिकेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, नाशिकमध्ये वास्तव्यास असणाऱ्या केंद्रीय राज्य मंत्री भारती पवार यांची नावं नसल्यानं महापौर सतिश कुलकर्णी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर फडणवीसांच्या नावाचा समावेश पत्रिकेत केला असून ते संमेलनात सहभागी होणार असल्याचं स्वागताध्यक्ष छगन भुजबळांनी सांगितलं आणि या वादावर पडदा पडला.
महाविकास आघाडीच्या नेत्यांना स्थान- भाजपचा आरोप
भाजप नेत्यांनी आरोप लावत म्हटलं होतं की, साहित्य संमेलन एकतर्फी होत आहे. संमेलनात केवळ राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनाच्या नेत्यांना स्थान देण्यात आले आहे. भाजपच्या नेत्यांना निमंत्रण न देता जाणुन बुजून डावलण्यात आल्याचा गंभीर आरोप महापौरांनी केला होता. या आधी संमेलन गीतात सावरकरांचे नाव नसल्यानं मनसेनं उठवला आवाज होता. मनसेच्या इशारानंतर सावरकरांच्या नावाचा गीतामध्ये समावेश केला आहे.
संबंधित बातम्या
Akhil Bhartiy Marathi Sahitya Sammelan LIVE : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, पाहा प्रत्येक अपडेट